चालू घडामोडी : ३० डिसेंबर

पशुधन संजीवनी योजना

 • प्रत्येक नागरिकासाठी विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडी) देण्याच्या धर्तीवर आता दुधाळ जनावरांसाठीही यूआयडी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कृषी खात्याच्या पशुधन संजीवनी योजनेतून हे यूआयडी दिले जातील.
 • दुधाळ जनावरे रोगमुक्त ठेवणे आणि दुग्धोत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
 • त्यासाठी प्रत्येक जनावराचा तपशील हाताशी असावा आणि त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
 • सुमारे साडेआठ कोटी पशूंची माहिती यातून संग्रहीत केली जाणार असून, प्रत्येक दुधाळ जनावरासाठी हेल्थ कार्ड (आरोग्यविषयक तपशिलांच्या नोंदी असलेले कार्ड) दिले जाईल.
 • त्यामध्ये जनावराची जात, वय, लसीकरण, आहार यांसारख्या नोंदी असतील. ही संपूर्ण माहिती राष्ट्रीय पातळीवरील डाटाबेसमध्ये जमा केली जाईल.
 • देशभरातील सर्व दुधाळ जनावरांच्या नोंदी घेऊन त्यांना यूआयडी देण्याची प्रक्रिया आगामी दोन वर्षांत (२०१९ पर्यंत) पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 • या पाहणीतून उपलब्ध होणारी आकडेवारी, जनावरे खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांसाठीही लाभदायक ठरणार आहे.

एलईटीचे दोन नेते जागतिक दहशतवादी घोषित

 • अमेरिकेने पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या संघटनेच्या मोहम्मद सरवर आणि शाहीद महमूद दोन नेत्यांना ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले आहे.
 • अमेरिकेच्या अर्थ खात्याने यांना जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. लष्करचे हे दोन्ही नेते सध्या पाकिस्तानात वास्तव्याला आहेत.
 • एलईटीचा वरिष्ठ अधिकारी असलेला मोहम्मद सरवर हा १० वर्षांहून अधिक काळ लाहोरमध्ये असून त्याने संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत.
 • शाहीद महमूद हा दीर्घकाळापासून कराचीमध्ये एलईटीचा वरिष्ठ सदस्य असून २००७पासून त्याचा या संघटनेशी संबंध आहे.
 • त्याने एलईटीची निधी गोळा करणारी शाखा असलेल्या ‘फलह-इ-इन्सानियत फाऊंडेशन’ (एफआयएफ)चा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
 • याशिवाय एलईटीच्या ‘अल मुहम्मदिया स्टुडंट्स’ या विद्यार्थी संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना जाहीर केले आहे.
 • लोकांची भरती करण्यासाठी आणि युवकांचे संघटनात्मक कार्यक्रम आयोजित ही एलईटीची संघटना काम करते.
 • लष्कर-ए-तोयबाला अमेरिकेने डिसेंबर २००१मध्येच दहशतवादी संघटना घोषित केले होते.

अ‍ॅना इव्हानोव्हिक आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त

 • सर्बियाची टेनिसपटू २९ वर्षीय अ‍ॅना इव्हानोव्हिकने प्रकृतीच्या कारणास्तव आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
 • जुलै २०१६मध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिकने जर्मनीचा माजी फुटबॉलपटू बॅस्टियन श्वेनस्टायगरशी विवाह केला होता.
 • फ्रेंच खुली स्पर्धा जिंकल्यानंतर इव्हानोव्हिकने १२ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले होते.
 • परंतु त्यानंतर आठ वर्षांत तिला एकदाच अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आले. सध्या ती जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानावर आहे.
 • तिने कारकीर्दीत एकूण १५ डब्लूटीए व ५ आयटीएफ जेतेपदांना गवसणी घातली आहे.

पाकिस्तानच्या अणुऊर्जाप्रकल्पाचे उद्घाटन

 • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ३४० मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जाप्रकल्पाचे २८ डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
 • पाकिस्तानातील मिआनवली जिल्ह्यात या अणुप्रकल्पाचे ठिकाण असून चष्मा ३ असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.
 • पाकिस्तान ऍटोमिक एनर्जी कमिशन (पीएईसी) व चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून हा अणुऊर्जा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
 • आगामी वर्षामध्ये चष्मा ३च्या धर्तीवर सी ४ प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा