चालू घडामोडी : ३० जानेवारी

बीसीसीआय अध्यक्षपदी विनोद राय

  • सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांची नियुक्ती केली आहे.
  • तसेच रामचंद्र गुहा, डायना एडलजी आणि विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या चार सदस्यीय प्रशासकीय समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डायना एडलजी या भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आहेत तर विक्रम लिमये हे आयडीएफसीचे अध्यक्ष आहेत.
  • रामचंद्र गुहा इतिहासकार व स्तंभलेखक म्हणून देशभरात ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे गांधीनंतरचा भारत हे गाजलेले पुस्तक आहे.
  • पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि क्रिकेट या विषयात त्यांचा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने या प्रशासकीय समितीच्या सदस्यरूपात क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना सहभागी करून घेण्याची केंद्र सरकारची मागणी फेटाळली आहे.
  • न्यायालयाने बीसीसीआयमध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पद न सांभाळण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयासंदर्भात हा निर्णय दिला आहे.
  • तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी न्यायालयाने आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांची नियुक्ती केली आहे.
 पार्श्वभूमी 
  • सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारीला अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन तर अजय शिर्के यांना सचिवपदावरुन हटवले होते.
  • न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत वारंवार चालढकल केल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.
 विनोद राय 
  • ते १९७२च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००८ ते २०१३ पर्यंत ते भारताचे ११वे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) राहिले आहेत.
  • दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर लोकप्रशासन विषयात हॉवर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
  • त्यांच्या कार्यकाळातच टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळा बाहेर आला.
  • वर्ष २०१६मध्ये नागरी सेवेत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते रेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे मानद सल्लागारही आहेत.

फ्रान्सची आयरीस मिटेनेअर ‘मिस युनिव्हर्स’

  • फिलिपीन्समध्ये झालेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत फ्रान्सची सुंदरी आयरीस मिटेनेअरने २०१६चा 'मिस युनिव्हर्स किताब मिळविला.
  • या स्पर्धेत मिस हैती राक्वेल पेलिसीएरने दुसरे, तर मिस कोलंबिया अॅँड्रिया तोवारने तिसरे स्थान पटकावले.
  • ‘मिस युनिव्हर्स’च्या या ६५व्या जागतिक स्पर्धेत एकूण ८६ देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता.
  • आयरीस ही दंतवैद्यक शास्त्राची विद्यार्थिनी आहे. तिने यापूर्वी ‘मिस फ्रान्स’ हा किताब मिळविलेला आहे.
  • या स्पर्धेत रोश्मिता हरिमूर्ती भारताचे प्रतिनिधीत्व करत होती. परंतु तिला अंतिम १३मध्ये स्थान मिळविता आले नाही.
 मिस युनिव्हर्स 
  • मिस युनिव्हर्स ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा मानली जाते.
  • मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
  • १९५२साली कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली.
  • आजवर सुष्मिता सेन (१९९४) व लारा दत्ता (२०००) ह्या दोन भारतीय सुंदरींनी ही स्पर्धा जिंकली आहे.
  • पिया वुर्त्झबाख (फिलिपिन्स) हिने २०१५ची तर पॉलिना व्हेगा (कोलंबिया) हिने २०१४ची मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ

  • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ झाला असून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे.
  • भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची (आयआयपीबी) स्थापना करण्यात आली आहे.
  • माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची ही संकल्पना होती. या बॅंकांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येऊ शकेल.
  • भारती एअरटेल आणि पेटीएम या दोन कंपन्यानंतर आयआयपीबी ही तिसरी संस्था आहे जी पैसे ठेवीच्या रुपाने स्वीकारू शकते. परंतु या बॅंका कर्ज देऊ शकणार नाहीत.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे हंगामी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे ए. पी. सिंह आहेत. ते निर्गुंतणूक विभागाचे सह सचिव होते.
  • २०१५मध्ये आरबीआयने ११ संस्थांना पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती.
  • त्यापैकी टेक महिंद्रा, सन फार्मा, आयडीएफसी, टेलेनॉर, चोलामंडलम इनवेस्टमेंट फायनान्स अॅंड कं. या कंपन्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.
  • तर पेटीएम, भारती एअरटेल आणि आयआयपीबीने मात्र पेमेंट बँका सुरु केल्या आहेत.
  • आदित्या बिरला, फिनो पे टेक, नॅशनल सेक्युरिटीज डिपॉजिटरी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडस, व्होडाफोन एम-पेसा या कंपन्या पेमेंट बँक स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत.

रिलायन्स डिफेन्सला संरक्षण मंत्रालयाचे ९१६ कोटींचे कंत्राट

  • संरक्षण मंत्रालयाकडून ‘रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग'ला ९१६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
  • या कंत्राटाअंतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी १४ 'फास्ट पेट्रोल वेसल्स' तयार करण्यात येणार आहेत.
  • रिलायन्स डिफेन्स ही पूर्णपणे रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चरच्या मालकीची उपकंपनी आहे.
  • भारतीय सशस्त्र दलाचे एवढे मोठे कंत्राट ‘रिलायन्स डिफेन्स'च्या रुपाने प्रथमच खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळाले आहे.

आयएनएसव्ही तारिणी विश्वसंचारासाठी सज्ज

  • भारतीय नौदलाचे ५६ फुट उंच असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे.
  • फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते विश्वसंचार मोहिमेला सुरुवात करणार आहे.
  • या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असून कॅप्टन वर्तिका जोशी यांच्याकडे या महिला टीमचे नेतृत्व आहे.
  • विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती.
  • आयएनएसव्ही तारिणीचे बांधणीचे काम अ‍ॅक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ११ महिन्यांत पूर्ण केले. यासाठी ४ कोटींचा खर्च आला आहे.
 आयएनएस म्हादई 
  • भारतीय नौदलाचे पहिले प्रशिक्षण जहाज असलेल्या म्हादईने गेल्या आठ वर्षांत २ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.
  • ते १२ फेब्रुवारी २००९ रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. म्हादईने दोनदा एकल पृथ्वी प्रदक्षिणा, तीन वेळा रिओ रेसमध्ये सहभाग, आग्नेय आशिया मोहीम, मॉरिशस मोहीम यशस्वी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा