चालू घडामोडी : १५ फेब्रुवारी

१०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत इस्रोचा नवा विक्रम

  • १५ फेब्रुवारी रोजी एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) इतिहास रचला आहे.
  • आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल सी-३७ (पीएसएलव्ही सी-३७) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • यापूर्वी एकाच उड्डाणातून रशियाने सर्वाधिक ३७, तर अमेरिकेने २९ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. मात्र हे सर्व विक्रम इस्रोने मोडीत काढले आहेत.
  • भारताने अवकाशात सोडलेल्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि ३ भारतीय उपग्रह होते. यामध्ये अमेरिका, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या ६ देशांच्या उपग्रहांचा समावेश होता.
  • या उपग्रहांमध्ये अमेरिकेच्या ९६ उपग्रहांसह इस्त्राईल, कझाकस्तान, नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या इस्त्रोच्या पाच आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पाच उपग्रहांचा समावेश होता.
  • एकाचवेळी सुमारे १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रो ही जगातील सर्वात यशस्वी अंतराळ संस्था ठरली आहे. यासोबतच १०१ उपग्रहांचे प्रक्षेपण करुन इस्रो सर्वाधिक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करणारी संस्था ठरली आहे.
  • यापूर्वी इस्त्रोने एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. जानेवारी महिन्यात  एकाचवेळी ८३ उपग्रह अंतराळात सोडण्याचा इरादा होता. मात्र, ही मोहीम पुढे ढकलण्यात आली.
  • इस्त्रोने आपल्या ॲन्ट्रीक्स या व्यावसायिक शाखेद्वारे आतापर्यंत १८० विदेशी उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यामधील १०४ उपग्रह भारताने १५ फेब्रुवारी रोजी अवकाशात सोडले.
 भारताचे उपग्रह 
  • पीएसएलव्ही सी-३७कडून प्रक्षेपित करण्यात आलेल्या १०४ उपग्रहांमध्ये भारताच्या कार्टोसॅट-२डी (वजन ७३० किलो), आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (वजन प्रत्येकी ३० किलो) या तीन उपग्रहांचा समावेश होता.
  • यापैकी कार्टोसॅट-२डी हा उपग्रह सर्वात मोठा होता. कार्टोसॅट मालिकेतील हा पाचवा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
  • रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आणि अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे पाठविण्यासाठी मुख्यत्त्वेकरून कार्टोसॅट-२डी चा वापर केला जाईल. या माहितीचा उपयोग मॅप अॅप्लिकेशन्स, नागरी व ग्रामीण विकास आणि सुविधा व्यवस्थापनासाठी केला जाईल.
  • याशिवाय अंतराळात सोडण्यात आलेले आयएनएस-१ए व आयएनएस-१बी हे भारताचे आणखी दोन लघुउपग्रह (नॅनो सॅटेलाइट) दिशा निर्देशनासाठी उपयोगी पडणार आहेत.
 प्रक्षेपण खर्च कमी 
  • अंतराळात उपग्रह सोडणे हे जगात वेगाने वाढणारे व्यावसायिक क्षेत्र आहे. विश्वासार्ह तांत्रिक क्षमता व स्पर्धात्मक खर्च हे या व्यवसायातील यशाचे गमक आहे.
  • एका अग्निबाणाने जेवढे जास्त उपग्रह सोडले जातील, तेवढा प्रत्येक उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च कमी असे हे गणित आहे. म्हणूनच ‘इस्रो’चे यश लक्षणीय आहे.
 पीएसएलव्ही-३७ 
  • या  प्रक्षेपणासाठी वापरला गेलेला पीएसएलव्ही-३७ हा इस्रोचा टप्प्याटप्प्याने उन्नत केलेला सर्वात यशस्वी असा अग्निबाण आहे. पीएसएलव्हीचे हे ३९वे उड्डाण होते.
  • सन २००८मध्ये भारताचे पहिले चांद्रयान पाठविण्यासाठी त्याचा सर्वप्रथम वापर केला व तेव्हापासून त्याने प्रत्येक वेळी १०० टक्के यश संपादन केले आहे.

व्ही के शशिकला तुरुंगात शरण

  • बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला बंगळुरुतील तुरुंगात शरण आल्या असून तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी जयललिता आणि एमजीआर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले.
  • सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती प्रकरणात जयललिता यांच्या संभाव्य वारसदार शशिकला दोषी असल्याचा निकाल देत त्यांना चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती.
  • या निर्णयानंतर लगेचच शशिकला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यासह त्यांच्या १९ समर्थकांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करत, ए के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली होती.
  • त्यानंतर पलानीस्वामी यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्तेसाठी दावा सादर केला. आपल्या समर्थक आमदारांची यादीही त्यांनी राज्यपालांना सादर केली.

‘नेत्र’ भारतीय हवाई दलात दाखल

  • भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले अॅवॉक्स टेहळणी विमान ‘नेत्र’ भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे.
  • नेत्र मुळे हवाई दलाच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असून, हवाई युध्दात हे विमान उपयुक्त ठरणार आहे.
  • नेत्रमुले जमीन, पाणी आणि हवेमधून होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ माहिती मिळेल. शत्रूची क्षेपणास्त्रे, विमाने ३०० कि.मी. अंतरावर असताना नेत्रकडून नियंत्रण कक्षाला सूचना मिळेल. त्यामुळे हल्ला परतवून लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
  • डीआरडीओच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीमने महिला वैज्ञानिक जे मंजुला यांच्या नेतृत्वाखाली हे विमान विकसित केले आहे. महिला वैज्ञानिकांनी या विमानाच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

तिबेटचे नेते अर्किद गवांग थोंडुप यांचे निधन

  • तिबेटचे अत्यंत विद्वान, व्यासंगी लेखक व तिबेटींच्या हक्कांसाठी लढणारे राजकीय नेते अर्किद गवांग थोंडुप यांचे १३ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
  • १० मार्च १९५९ मध्ये तिबेटमध्ये झालेल्या उठावातील ते अग्रणी होते. दलाई लामांसोबत तिबेटीच्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्याबद्दल त्यांना परागंदा व्हावे लागले होते.
  • थोंडुप हे तत्कालीन ल्हासा सरकारच्या सेवेत होते. या काळात दलाई लामा यांच्या खासगी कार्यालयात तसेच तिबेटींच्या केंद्रीय कार्यालयात त्यांनी विविध पदे सांभाळली.
  • नंतरचा काही काळ ते अध्यापनाच्या क्षेत्रात रमले. अमेरिका आणि जपानमधील विद्यापीठांत ते प्राध्यापक होते.
  • १९८४ ते २००४ या काळात ते दलाई लामांचे अधिकृत चरित्रकार होते. त्यानंतर २००५ पासून दलाई लामा यांच्या कार्यालयात तिबेटी भाषा आणि साहित्य या क्षेत्रांत ते सल्लागार म्हणून कार्यरत होते.
  • तिबेटी टंकलेखनाचे जनक ही त्यांची एक महत्त्वाची ओळख होती. १९४८मध्ये थोंडुप यांनी तिबेटी भाषेतील रेमिंग्टन रॅण्ड हे टंकलेखन मशीन विकसित केले.
  • विजनवासातील तिबेटी सरकारमध्ये थोंडुप सहभागी झाले होते. विजनवासातील तिबेटी संसदेचे ते दोन वर्षे महासचिव तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे आठ वर्षे ते महासचिव होते.
  • नंतर १९८० मध्ये मिशिगन विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली. २००९मध्ये मिशिगन विद्यापीठाने थोंडुप यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली.

तोशिबा कॉर्पच्या अध्यक्षांचा राजीनामा

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील जपानची तंत्रज्ञान कंपनी तोशिबा कॉर्पचे अध्यक्ष शिगेनोरी शिगा पदत्याग केला असल्याचे जाहीर केले.
  • अणुऊर्जा व्यवसायातील ७१३ अब्ज येन (साधारण ४२,००० कोटी रुपये) इतक्या कंपनीच्या तोटय़ाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला.
  • हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीला आपल्या नफ्यातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील मालमत्ता विकाव्या लागण्याचीही शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा