चालू घडामोडी : ३ मार्च

युपीएससीच्या सदस्यपदी अजित भोसले यांची नियुक्ती

  • मुळचे कोल्हापूरचे निवृत्त एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
  • हवाई दलात विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या भोसले यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या आयोगात होणार आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ८ जून १९७८ रोजी त्यांची हवाई दलाच्या उड्डाण (दिशादर्शन) शाखेत नेमणूक झाली.
  • डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असणाऱ्या भोसले यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून एम एस्सी तर कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
  • सेवा काळात त्यांनी जपानमधील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्समधून एमफिलची पदवी मिळविली आहे.
  • हवाई दलातील ३९ वर्षांच्या सेवाकाळात आघाडीवरील तळ आणि कार्यालयीन व्यवस्थेतील विविध पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
  • हवाई मोहिमांमध्ये सहभाग, भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षण, हेरगिरी रोखणे, प्रशिक्षण संस्थांची क्षमतावाढ, लष्करी सायबर सुरक्षितता व हवाई उड्डाणातील सुरक्षितता अशा नानाविध विषयांवर त्यांनी काम केले आहे.
  • पुण्याच्या हवाई दल केंद्राचे मुख्य व्यवस्थापक, नवी दिल्लीच्या हवाई दलाच्या मुख्यालयात गुप्तचर विभागाच्या प्रमुख व्यवस्थापकाची धुरा त्यांनी सांभाळली.
  • तब्बल पाच हजार २०० तास उड्डाणाचा अनुभव असणारे भोसले प्रथम श्रेणीतील प्रमाणित दिशादर्शन प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात.
  • त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने २००५मध्ये विशिष्ट सेवा पदकाने तर २०१०मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने भोसले यांना सन्मानित केले आहे.

गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय अध्यक्षपदाची कारकीर्द समाप्त

  • पुणे येथील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची वादग्रस्त १९ महिन्यांची कारकिर्द ३ फेब्रुवारी पूर्ण झाली.
  • विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळे चौहान यांच्या नियुक्तीचे प्रकरण देशभर गाजले होते. त्यांच्या नियुक्तीविरुद्ध केंद्र सरकारलाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
  • त्यामुळे एफटीआयआय अध्यक्षपदासाठी चौहान यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, लवकरच नव्या मंडळाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
  • चौहान यांची एफटीआयआय अध्यक्षपदी नियुक्ती ९ जून २०१५ रोजी ३ वर्षांच्या कालावधीसाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे ४ मार्च २०१४पासून होती.
  • तांत्रिकदृष्टय़ा चौहानांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला असला तरी प्रत्यक्षात त्यांना फक्त तेरा महिन्यांसाठीच संस्थेचे अध्यक्षपद भूषविता आले.
  • ज्या एफटीआयआयचे अध्यक्षपद श्याम बेनेगल, अदूर गोपाळकृष्णन, यू.आर. अनंतमूर्ती यासारख्या दिग्गजांनी भूषविले होते, त्यांच्या जागी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले.
  • भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी असलेल्या संबंधांमुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याचा विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने आरोप होता.
  • त्याची परिणती प्रदीर्घ आंदोलनात झाली. दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले. संसदेमध्ये गदारोळ झाला. आक्रमक विद्यार्थ्यांनी संस्थेला वेठीस धरले.
  • या सगळ्या गोंधळात संस्था बंद पडली होती. अखेपर्यंत केंद्र सरकार बधले नाही. शेवटी कंटाळून विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०१५मध्ये संप मागे घेतला होता.
  • एफटीआयआयमध्ये गेल्या ५५ वर्षांत ३९वेळा विद्यार्थ्यांनी नानाविध कारणांवरून केलेल्या संपांमुळे केंद्र सरकार त्रस्त आहे. त्यामुळे चौहानांना मुदतवाढ देऊन पुन्हा एकदा टीका ओढवून घेण्याचे टाळले.

अतिश्रीमंत लोकसंख्येच्या यादीत मुंबई २१वी

  • नाईट फ्रँक या कंपनीने जाहीर केलेल्या ‘संपत्ती अहवाल २०१७’नुसार वाढत्या अतिश्रीमंत लोकसंख्येच्या यादीत मुंबई शहराला २१वे स्थान मिळाले आहे.
  • वाढत्या संपत्तीबाबत भविष्यातील आशास्थान म्हणून जगातील ४० महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक ११ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • ८९ देशांतील सुमारे १२५ शहरांबाबत निरीक्षण करून जागतिक पातळीवरील मालमत्ता क्षेत्रातील हा अहवाल कंपनीने जाहीर केला आहे.
  • सर्वात महागडी मोक्याची निवासी मालमत्ता खरेदी करण्यामध्ये इस्तनाबूल, मेलबोर्न, दुबईपेक्षाही मुंबईचा क्रमांक वरचा आहे.
  • श्रीमंत भारतीयांकडून येत्या दोन वर्षांत निवासी मालमत्तांमध्ये ४० टक्के तर परदेशातील मालमत्तांमध्ये २५ टक्के गुंतवणूकही केली जाण्याची शक्यता असल्याचेही या अहवालात नमूद आहे.

२०५०पर्यंत भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश होणार

  • अमेरिकन थिंक टॅंक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल.
  • प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला असून, त्यानुसार जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या लोकसंख्येनंतर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा क्रमांक आहे.
  • जगातील अन्य धर्मीयांपेक्षा मुस्लिम धर्म वेगाने वाढत असून, यामुळे सन २०५०मध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असणार आहे.
  • २०१०च्या आकडेवारीनुसार जगातील लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्माची लोकसंख्या २३ टक्के (११६ कोटी) आहे. २०५०पर्यंत यात ७३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २८० कोटी होईल असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
  • इंडोनेशियामध्ये सध्या सर्वाधिक मुस्लिम नागरिक आहेत. तसेच भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व तुर्कीमध्येही मुस्लिमांची संख्या जास्त आहे. 
  • २०५०पर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकेल आणि भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या ३० कोटी होईल, असेही प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा