चालू घडामोडी : ७ मार्च

हैदराबाद विमानतळ जगात सर्वोत्तम

  • हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमानतळाने २०१६मधील जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत प्रथम स्थान गाठले आहे.
  • प्रतिवर्ष ५० लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात हैदराबादने बाजी मारली आहे.
  • तर प्रतिवर्ष ४ कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दक्षिण कोरियातील विमानतळानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) विमानतळावर मिळणाऱ्या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी: एएसआय) आधारे दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची निवड केली जाते.
  • यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.

नर्मदा नदीवर देशातील सर्वाधिक लांब केबल ब्रिज

  • गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७ मार्च रोजी करण्यात आले.
  • १३४४ मीटर लांब व २०.८ मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम २ वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी ३७९ कोटींचा खर्च झाला आहे.
  • या चार लेनच्या पुलावरील वाहतूक सुरू होताच, मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.
  • मुंबईतल्या वरळी-वांद्रे येथील सी लिंक पुलासारखा दिसणारा हा भव्य केबल ब्रिज १८ मीटर्स उंचीच्या इंग्रजी वाय आकाराच्या १० स्तंभावर उभा असून प्रत्येक स्तंभ आहे.
  • स्ट्रेच तंत्रज्ञानानुसार एकुण २१६ केबल्स या पुलासाठी वापरल्या आहेत. प्रत्येक केबलची लांबी २५ ते ४० मीटर्सच्या दरम्यान आहे.
  • १७.४ मीटर रुंदीच्या ४ लेन रस्त्यासह ३ मीटर्स रुंदीचे भव्य फुटपाथ पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत. पुलावर ४०० पेक्षा अधिक एलईडी दिव्यांची सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यात आली आहे.

ट्रम्प यांची सुधारित प्रवेशबंदी अध्यादेशावर स्वाक्षरी

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ मार्च रोजी सहा मुस्लिम देशातील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणाऱ्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
  • या सुधारित अध्यादेशातून इराकला वगळण्यात आले आहे. पूर्वी या प्रतिबंधित देशांच्या यादीत इराकसह सात देशांचा समावेश होता.
  • अमेरिका सध्या इराकमधील इस्लामिक स्टेटच्या विरोधात व्यापक मोहीम आखण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण निर्माण व्हावे म्हणून इराकवरील ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सीरिया, इराण, इराक, लीबिया, सुदान, येमेन आणि सोमालिया या सात मुस्लिम देशातून येणाऱ्या मुस्लिम शरणार्थींवर बंदी घातली होती.
  • त्यांच्या या निर्णयाचे पडसाद जगात तसेच अमेरिकेतही उमटले होते. त्यानंतर अमेरिकेतील न्यायालयानेही त्यांच्या या निर्णयाला विरोध केला होता.
  • नव्या अध्यादेशानुसार आता येमेन, सीरिया, इराण, सुदान, लीबिया आणि सोमालिया या मुस्लिम देशांतील नागरिकांना नव्वद दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्क ओप्पोकडे

  • चीनची मोबाइल निर्माती कंपनी ओप्पो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत.
  • बीसीसीआयने ओप्पोसोबत पुढील पाच वर्षांसाठी करार केला असून येत्या १ एप्रिल २०१७पासून या कराराला सुरूवात होणार आहे.
  • बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सशीपसाठी पायाभूत किंमत (बेस प्राईस) यावेळी सुमारे ५३८ कोटी इतकी ठेवली होती.
  • याआधी भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे अधिकार स्टार इंडियाकडे होते. स्टारसोबतचा करार मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे.

रिलायन्स कॅपिटलकडून पेटीएममधील भागिदारीची विक्री

  • अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलने मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएममधील भागिदारी चीनच्या अलिबाबा समुहाला विकली आहे.
  • लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या पेटीएममधील १ टक्का हिस्सेदारीची सुमारे २७५ कोटींना विक्री करण्यात आली आहे.
  • रिलायन्स कॅपिटलने पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सकडून १ टक्का भागिदारी खरेदी केली होती. त्यात फक्त १० कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
  • नोटबंदीनंतर बाजारात चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्याचा फायदा पेटीएमच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचाला झाला आहे.
  • जानेवारी महिन्यात कंपनीच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचावरुन सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले होते.

उत्तर कोरिया आणि मलेशियामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता

  • उत्तर कोरियाने मलेशियन नागरिकांना देश सोडण्यास मनाई केल्यानंतर आता मलेशियानेही त्यांच्या देशातील उत्तर कोरियन नागरिकांना देश सोडण्यास मनाई केली आहे.
  • यामुळे या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून, आगामी काळात या दोन्ही देशांमधील संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
  • मलेशियातील क्लालालांपूर विमानतळावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊनचा सावत्र भाऊ किम जाँग नामची हत्या करण्यात आली होती.
  • ओ ईथाइल एस २ डायसोप्रोपिल अमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट या रसायनाच्या मदतीने किम जाँग नामवर विषप्रयोग झाला होता.
  • किम जाँग नामच्या हत्येप्रकरणी मलेशियन पोलिसांनी उत्तर कोरियाच्या काही नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
  • मलेशियन पोलिसांच्या तपासावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन संतापला आहे आणि त्याने उत्तर कोरियातील मलेशियन नागरिकांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
  • मलेशियानेही उत्तर कोरियाच्या उच्चायुक्तांना पुन्हा मायदेशी जाण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच मलेशियामधील उत्तर कोरियाच्या नागरिकांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.

क्रिकेटमध्येही रेड कार्ड

  • येत्या १ ऑक्टोबर २०१७पासून फुटबॉलप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी आता हा रेड कार्डचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • त्यामुळे बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना मिळणार आहे.
  • डिसेंबरमध्ये पार पडलेल्या एमसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत क्रिकेटच्या सुधारित नियमांना मंजुरी देण्यात आली होती. ते १ ऑक्टोबर २०१७पासून लागू करण्यात येणार आहेत.

एअर इंडियाकडून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

  • एअर इंडियाने जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशासह परदेशातील दहापेक्षा अधिक ठिकाणांना जोडणाऱ्या विमानांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करत महिला सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे.
  • २६ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत एअर इंडियाच्या ११ फेऱ्यांमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • यासोबतच हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित असलेल्या, मात्र कधीही विमान प्रवास न केलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एअर इंडियाने ८ मार्च रोजी दिल्ली ते आग्रा अशा हवाई प्रवासाचे आयोजन केले आहे.
  • काही दिवसांपूर्वीच संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली हे अंतर यशस्वीपणे कापत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.
  • याआधी फक्त महिलांचा समावेश असलेल्या कोणत्याही विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली नाही. या विक्रमी कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनी करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा