चालू घडामोडी : १० मार्च

महाबळेश्वर सैल यांना सरस्वती सन्मान

  • गोव्यातील कोकणी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांच्या ‘हावठण’ या कादंबरीची ‘सरस्वती सन्माना’साठी निवड झाली आहे.
  • मूळचे कर्नाटकचे असलेले महाबळेश्वर सैल हे माजी सैनिक असून ते १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात लढले होते. तसेच १९६३-६४मध्ये ते इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोचे शांतिसैनिक म्हणून गेले होते.
  • मराठीत त्यांची चार नाटके व एक कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणीत त्यांनी पाच लघुकथासंग्रह व सात कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
  • १९७२मध्ये सैल यांची पहिली कथा आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’मध्ये छापून आली होती. त्यानंतर चाळीस वर्षे त्यांचे लेखन सुरू आहे.
  • त्यांनी कोकणी भाषेत निसर्गसाहित्य नावाचा नवा प्रवाह रूढ केला. ‘काळी गंगा’ ही त्यांची पहिली कादंबरी आहे.
  • त्यांची ‘हावठण’ ही पुरस्कार विजेती कादंबरी मातीपासून भांडी बनवणाऱ्या नामशेष होत चाललेल्या कुंभार समाजाची सांस्कृतिक पार्श्वभूमी अधोरेखित करते.
  • त्यानंतर ‘तांडव’ ही कादंबरी मराठी व कोकणी अशा दोन्ही भाषांतून प्रकाशित झाली. त्यात त्यांनी गोव्यात पोर्तुगीजांच्या काळात झालेला धर्मच्छल व धर्मातर हा स्फोटक विषय हाताळला आहे.
  • कोकणीतील ‘युगसांवार’ व मराठीतील ‘तांडव’ या कादंबऱ्यांसाठी सैल यांनी १० वर्षे संशोधन केले.
  • ‘खोल खोल मुळा’, ‘निमाणो अश्वत्थामा’ (शेवटचा अश्वत्थामा), ‘नको जाळू माझं घरटं’, ‘विखार विळखो’, ‘अरण्यकांड’, ‘पालताडचो मुनिस’ (यावर त्याच नावाचा चित्रपट आहे) ही पुस्तके त्यांनी लिहिली.
  • साहित्य अकादमी पुरस्कार, विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार, गोवा कला अकादमी पुरस्कार, गोवा सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.
  • साहित्य अकादमी, कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी, गोवा कला अकादमी या संस्थांचे ते सदस्य होते व नंतर अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद २००५मध्ये त्यांनी भूषवले.

आयएनएस तिल्लनचांग नौदलात दाखल

  • ‘वॉटर जेट फास्ट अ‍ॅटेक क्राफ्ट’ प्रकारातील आयएनएस तिल्लनचांग नावाच्या जहाजाला भारतीय नौदलात दाखल करण्यात आले आहे.
  • कर्नाटकातील कारवार येथील नौदलाच्या मुख्यालयात हा समारंभ झाला. व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी तिल्लनचांगला नौदलाच्या ताफ्यात सामील केले.
  • दरम्यान, आयएनएस तिल्लनचांग हे या प्रकारातील तिसरे जहाज असून यापूर्वी आयएनएस तरमुगली व आयएनएस तिहायू या दोन जहाजांना सन २०१६मध्ये नौदलात दाखल करण्यात आले आहे.
  • सुमारे ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आयएनएस तिल्लनचांगला नौदलात दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना पदावरून हटवले

  • दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गेन-हुई यांना तेथील संसदीय न्यायालयाद्वारे पदावरुन हटवण्यात आले आहे.
  • दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची घटना घडली आहे. पार्क गेन या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
  • पार्क यांचे अधिकार डिसेंबरमध्येच काढून घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता.
  • मात्र आता भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमधील सहभाग सिद्ध झाल्याने त्यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे.
  • पार्क गेन-हुई यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्याने दक्षिण कोरियामध्ये खळबळ माजली आहे.
  • या प्रकरणात लक्षावधी डॉलर्सचा अपहार झाल्याने संपूर्ण यंत्रणाच सामान्य माणसाच्या विरोधात असल्याची भावना दक्षिण कोरियन समाजात निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा