चालू घडामोडी : १३ मार्च

मणिपुरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस

  • गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने राज्यपालांकडे ३२ आमदारांची यादी सादर करत बहुमताचा दावा केला आहे.
  • तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनीदेखील बहुमत असल्याचा दावा केला आहे.
  • मणिपूरमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला विधानसभेच्या ६० जागांपैकी सर्वाधिक २८ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने काँग्रेसला कडवी झूंज देत २१ जागांवर विजय मिळवला आहे.
  • मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी ३१ आमदारांची आवश्यकता असून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत.
  • मणिपूरच्या राज्यपाल: नजमा हेपतुल्ला

आरबीआयकडून बॅंकांमधील फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत यादी सादर

  • रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) अर्थ मंत्रालयाला एप्रिल ते डिसेंबर २०१६ या नऊ महिन्यांच्या काळात बॅंकेत घडलेल्या विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत एक यादी सादर केली आहे.
  • दिलेल्या आकडेवारीनुसार, या नऊ महिन्यांच्या काळात १७,७५०.२७ कोटींची एकूण ३८७० फसवणुकीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
  • यामध्ये खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक सर्वात आघाडीवर आहे. तर, त्यापाठोपाठ देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेचा (एसबीआय) क्रमांक आहे.
  • या माहितीनुसार आयसीआयसीआय बँकेमध्ये १ लाख रुपयांहून अधिक रक्कमेचे ४५५ फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत.
  • त्यापाठोपाठ स्टेट बँक (४२९), स्टँडर्ड चार्टर्ड (२४४), एचडीएफसी बँक (२३७) अॅक्सिस बँक (१८९), बँक ऑफ बडोदा (१७६) आणि सिटी बँक (१५०) यांचा क्रमांक आहे. 
  • फसवणुकीची रुपयांमध्ये तुलना करावयाचे झाल्यास एसबीआयमध्ये २,२३७ कोटींची, पंजाब नॅशनल बँकेत २,२५० कोटी आणि अॅक्सिस बँकेत १,९९८ कोटींचे फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
  • या यादीनुसार, फसवणुकीच्या काही गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध बँकांमधील सुमारे ४५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • या घटनांमध्ये सर्वाधिक एसबीआयचे ६४ कर्मचारी, एचडीएफसी बॅंकेचे ४९ तर अॅक्सिस बँकेच्या ३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वेदालंकार यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार

  • वेदकुमार वेदालंकार यांच्या ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने पुरस्कार जाहीर केला आहे.
  • या पुस्तकात वेदकुमार यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या तीन नाटकांच्या संहितांचा अनुवाद आणि त्यातील १८० पद्यांचा पद्यानुवाद वेदकुमार केला आहे.
  • डॉ. वेदालंकार मूळचे लातूरचे असून त्यांचे मूळ नाव वेदकुमार रघुत्तमदास डुंबरे आहे. १९५४मध्ये हरिद्वार येथील कांगडी गुरुकुलाने त्यांना वेदालंकार ही पदवी बहाल केली.
  • मराठी भाषा पुन्हा शिकून तसेच. हिंदी व संस्कृत या विषयांत पारंगत होऊन डॉ. वेदालंकार यांनी ३६ वर्षे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्य केले. ते उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.
  • निवृत्तीनंतर त्यांनी मराठी साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध व्हावे यासाठी अनुवादाचे काम सुरू केले. शिवाजी सावंत हे वेदालंकारांचे मित्र होते. त्यांनी लिहिलेल्या छावा कादंबरीचा हिंदी अनुवाद हा वेदालंकारांचा पहिला अनुवाद होता.
  • त्यानंतर वेदालंकार यांनी मराठीतील तीसहून अधिक ग्रंथ हिंदीत अनुवाद करून प्रसिद्ध केले आहेत.
  • अनुवाद व आंतरभारती कार्यासाठी त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीतर्फे गजानन माधव मुक्तिबोध हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
 वेदालंकार यांनी अनुवादित केलेली काही पुस्तके 
  • श्रीमान योगी (रणजित देसाई)
  • पाचोळा (रा. रं. बोराडे)
  • फकिरा (अण्णा भाऊ साठे)
  • पु.ल. देशपांडे यांच्या काही निवडक कथा.
  • संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा.
  • गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीयरत्न (महात्मा जोतिबा फुले)
  • संत गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा या कवींच्या अभंगांचाही हिंदी पद्यानुवाद.
  • यजुर्वेद आणि सामवेदाचे मराठीत भाषांतर.

पाकिस्तानमध्ये १९ वर्षांनी जनगणना होणार

  • पाकिस्तानमध्ये १९९८नंतर सुमारे १९ वर्षांनी जनगणना होणार आहे. या जनगणनेसाठी पाकिस्तान लष्कराची मदत घेण्यात येणार आहे.
  • १५ मार्चपासुन या जनगणनेला सुरुवात होणार असून २५ मेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये हि जनगणना पुर्ण केली जाणार आहे. त्यासाठी सुमार १,८५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • जवळपास दोन लाख पाकिस्तानी सैनिकांची मदत यावेळी घेतली जाणार आहे. जनगणनेदरम्यान घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या माहीतीची नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत किमान एक सैनिक असणार आहे.
  • कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असणारे हे सैनिक त्यांना माहीती गोळा करण्यासाठी मदतही करणार आहेत.
  • या जनगणनेसाठी पाकिस्तान सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • जनगणनेमध्ये चुकीची माहिती देणाऱ्यास पन्नास हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे.

जमात उद दवाचे नेतृत्व अब्दुल रेहमान मक्कीकडे

  • पाकिस्तानमधील जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचे नेतेपद आता हफीझ सईद याचा मेहुणा असलेल्या अब्दुल रेहमान मक्की याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
  • मुंबईमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील (२६/११) मुख्य सूत्रधार असलेल्या सईद याला पाकिस्तानमधील पंजाब सरकारने नजरकैदेत ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर मक्की हा जमातचा नवा नेता बनला आहे.
  • पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायदा १९९७अंतर्गत ३० जानेवारी रोजी सईद आणि अन्य चौघांना ९० दिवस नजरकैदेत ठेवले आहे.
  • या चौघांमध्ये जेयूडी व फलाह-ए-इन्सानियत (एफआयएफ) या संघटनेच्या सदस्यांना समावेश आहे. तसेच या दोन्ही संघटनांवर बारकाईने नजरही ठेवण्यात येत आहे.
  • सईदवरील कारवाईनंतर थोड्याच दिवसांत ‘जेयूडी’चे नाव बदलण्यात आले व ‘तेहरीक आझादी जम्मू अँड कश्मीर’ असे नामकरण करण्यात आले होते.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा निकाल

  • मलेशियाच्या चाँग वेइ ली याने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत त्याने चीनच्या शि युकीवर मात केली.
  • जागतिक क्रमवारीत चाँग वेइ ली अव्वल स्थानावर, तर शि यूकी दहाव्या क्रमांकावर आहे.
  • मिश्र दुहेरीत चीनच्या लू काइ व हुआंग याकीआँग यांनी विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत या जोडीने मलेशियाच्या पेंग सून चॅन व लियू यिंग गोह यांच्यावर मात केली.
  • महिला दुहेरीत कोरियाच्या यि ना चँग आणि सो ही ली यांनी विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी डेन्मार्कच्या कॅमिला रायटर जुहल-क्रिस्टिना पेडरसन यांचा पराभव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा