चालू घडामोडी : १२ एप्रिल

पुलित्झर पुरस्कार २०१७

  • पुलित्झर पुरस्कार समितीने १० एप्रिल रोजी १०१व्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये द न्यूयॉर्क टाईम्सला सर्वाधिक तीन पुरस्कार मिळाले.
  • कोल्सन व्हाइटहेड यांच्या ‘अंडरग्राऊंड रेलरोड’ या कादंबरीला ‘फिक्शन’ वर्गातील पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. याच पुस्तकाला यंदाचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कारही मिळाला होता.
  • ‘इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या संघटनेला आणि मॅकक्लॅची व मियामी हेरल्ड या अमेरिकी प्रसारमाध्यमांना यंदाचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला.
  • यांनी ‘पनामा पेपर्स’च्या माध्यमातून जगातील विविध राजकारणी आणि उद्योगपतींच्या बेहिशेबी गुंतवणुकीला वाचा फोडली होती.

 विविध विभागांमधील पुरस्कार विजेत्यांची यादी: 
  • समाजसेवा करणारी पत्रकारिता: द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रॉपब्लिका
  • त्यांनी न्यूयॉर्क पोलिसांवर एक संयुक्त मालिका केली होती. या मालिकेला सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. समाजसेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • ब्रेकिंग न्यूज वार्तांकन: ईस्ट बे टाईम्स, ऑकलंड
  • घोस्टशिप अग्निकांडाच्या अथक वृत्तांकनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये ३६ लोकांना जीव गमवावा लागला होता. यामधून अग्निशमन दलाशी संबंधित त्रुटी प्रकाशझोतात आल्या होत्या.
  • शोधपत्रकारिता: डब्ल्यू व्ही के एरिक आयर, चार्स्टटन गॅजेट-मेल, चार्ल्सटन
  • अमेरिकेत वेस्ट व्हर्जिनियामध्ये अतिसेवनाचे सर्वाधिक बळी जातात. याबद्दल प्रचंड विरोधाला सामोरे जाऊन सखोल वृत्तांकन केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. साहसी पत्रकारितेचा हा गौरव असल्याचे पुलित्झर पुरस्कार समितीने म्हटले आहे.
  • व्याख्यात्मक पत्रकारिता: इंटरनेशनल कनसार्सियम ऑफ इन्वेस्टिगेशन जर्नलिस्ट, मॅकक्लाची ऍण्ड मियामी हेराल्ड
  • सहा खंडातील ३०० पत्रकारांशी परदेशांमध्ये लपवला जाणाऱ्या काळ्या पैशांचे वृत्तांकन केले. पनामा पेपर्सशी संबधित असलेल्या वृत्तांचा यामध्ये समावेश होता.
  • स्थानिक वृत्तांकन: द सॉल्ट लेक ट्रिब्यूनचे कर्मचारी
  • ब्राईगम यंग विद्यापीठातील लैंगिक अत्याचार पीडितांच्या व्यथांना वाचा फोडल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • राष्ट्रीय पत्रकारिता: डेव्हिड ए फाहरेंथोल्ड, द वॉशिंग्टन पोस्ट
  • राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पारदर्शी वृत्तांकनासाठी पुरस्कार देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प समाजसेवी संस्थांबद्दल उदार असल्याच्या राजकीय प्रचारामागील सत्य उजेडात आणल्याबद्दल गौरव करण्यात आला.
  • आंतरराष्ट्रीय पत्रकारिता: द न्यूयॉर्क टाईम्सचे कर्मचारी
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत:च्या देशाला सामर्थ्यवान देश म्हणून जगासमोर आणण्यासाठी मोहिम राबवली. पुतीन यांच्याकडून करण्यात येणाऱ्या हत्या, ऑनलाइन छळ आणि विरोधकांविरोधात पुरावे तयार करणे, याबद्दलच्या वृत्तांकनासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
 पनामा पेपर्स 
  • आयसीआयजे या पत्रकारांच्या प्रसारमाध्यमांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने एप्रिल २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मोठा गैरप्रकार उघडकीस आणला.
  • त्यांनी पनामा येथून कार्यरत ‘मोझॅक फॉन्सेका’ नावाच्या बोगस कंपन्या स्थापन करून देऊन बेहिशेबी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे उघड केली होती.
  • ही माहिती त्यांनी जगभरातील १००हून अधिक प्रसारमाध्यमांमध्ये वाटली. जगाच्या सहा खंडांवर विखुरलेल्या सुमारे ३०० पत्रकारांनी आपापल्या देशांसंबंधी कागदपत्रांची कसून छाननी केली.
  • एप्रिल २०१६मध्ये एकाच दिवशी जगातील सर्व प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिली. ही कागदपत्रे ‘पनामा पेपर्स’ म्हणून ओळखली गेली. जगाच्या इतिहासातील एकत्रित शोधपत्रकारितेचे हे सर्वात मोठे उदाहरण होते.
  • जगभरातील अनेक राजकारणी, उद्योगपती आणि बडय़ा नागरिकांनी पनामा येथील या कंपनीच्या माध्यमातून बोगस कंपन्या स्थापन करून करोडो रुपयांच्या बेहिशेबी उलाढाली केल्या होत्या.
  • या प्रकरणाने जागतिक पातळीवर मोठा गदारोळ माजला. भारतासह अन्य देशांत या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले.
  • पनामा पेपर्समध्ये नामोल्लेख असल्याच्या कारणाने ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि आइसलँडचे पंतप्रधान सिग्मंदूर डॅव्हियो गुनलॉगसन यांना राजीनामा द्यावा लागला.
  • अर्जेटिनामाध्ये सरकारविरोधी निदर्शने झाली. अझरबैजानमध्ये या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी एक छोटे युद्ध झाले.
  • या प्रकरणात रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना २ अब्ज डॉलरचा लाभ झाल्याचे दिसून येत होते. तेथेही सरकारविरोधी राळ उडाली. 
  • तसेच मोझॅक फॉन्सेका कंपनीचे संस्थापक जुर्गन मोझॅक आणि रॅमन फॉन्सेका यांना अटक झाली.
 पुलित्झर पुरस्कार 
  • पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङमय आणि सांगीतिक रचनेसाठी देण्यात येणारा अमेरिकेतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
  • पुलित्झर पुरस्कार सर्वप्रथम १९१७मध्ये देण्यात आला होता. अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी हा पुरस्कार सुरू केला.
  • अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो.
  • १५ हजार अमेरिकन डॉलर आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय समाजसेवा स्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही देण्यात येते.

सर टीम बर्नर्स ली यांना प्रतिष्ठेचा ए एम टय़ुरिग पुरस्कार

  • वर्ल्ड वाइड वेब या माहितीच्या महाजालाचा शोध लावून जगाला स्तिमित करणाऱ्या ब्रिटनचे ‘सर’ टीम बर्नर्स ली यांना असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी या जागतिक संस्थेचा प्रतिष्ठेचा ए एम टय़ुरिग पुरस्कार मिळाला आहे.
  • हा पुरस्कार म्हणजे संगणक विज्ञानातील नोबेल मानला जातो. बर्नर्स ली यांना वर्ल्ड वाइड वेबच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्या वेब ब्राऊजरच्या निर्मितीचे श्रेयही ली यांनाच जाते.
  • सर्न या संस्थेच्या मोठा आवाका असलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने बर्नर्स ली यांनी हे वर्ल्ड वाइड वेब निर्माण केले. 
  • मार्च १९८९मध्ये त्यांनी माहिती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रस्ताव मांडला होता, सध्या ते वर्ल्ड वाइड वेब फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. एनक्वायर हे वर्ल्ड वाइड वेबचे आधीचे रूप होते.
  • लंडनमध्ये जन्मलेले ली जून ते डिसेंबर १९८०दरम्यान जीनिव्हातील सर्नच्या प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान कंत्राटदार बनले. तेथे त्यांनी वर्ल्ड वाइड वेबची निर्मिती केली. या संशोधनाचे ‘पेटंट’ मात्र त्यांनी घेतले नाही.
  • ली यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर किताब देऊन २००४मध्ये गौरवले. २०१३मध्ये त्यांना पहिला राणी एलिझाबेथ पुरस्कार मिळाला.
  • चार्लस बॅबेज पुरस्कार, पॉल इव्हान्स पीटर पुरस्कार, सर फ्रँक व्हिटल पदक, जपान प्राइज, राष्ट्रकुल पुरस्कार, नील्स बोहर सुवर्णपदक असे अगणित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
  • ते ब्रिटिश रॉयल सोसायटीचे, तसेच अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसचे फेलो आहेत. दहापेक्षा अधिक मानद डॉक्टरेट त्यांना मिळाल्या आहेत. इंटरनेट हॉल ऑफ फेममध्येही ते झळकले आहेत.

हरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७चा सदिच्छादूत

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १ जून ते १८ जूनदरम्यान पार पडणार असून, या स्पर्धेसाठी एकूण ८ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • यामध्ये हरभजन सिंग याच्यासोबत शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), हबिबूल बशर (बांगलादेश), इयान बेल (इंग्लंड), शेन बॉण्ड (न्यूझीलंड), माईक हसी (ऑस्ट्रेलिया), कुमार संगकारा (श्रीलंका) आणि ग्रॅमी स्थिम (दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे.
  • या आठ सदिच्छादूतांनी एकूण १७७४ वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय त्यांनी ४८ शतकांसह ५१,९०६ धावा केल्या असून ८३८ विकेट्स घेतल्या आहेत.
  • हे सर्व सदिच्छादूत चॅम्पिअन्स ट्रॉफी टूरचा भाग असतील. तसंच हे आठ क्रिकेटर्स आयसीसीच्या एडिटोरिअल टीमचाही सहभाग असतील.
  • या स्पर्धेचा पहिला सामना द ओवल मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान पार पडणार आहे. 

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यात अपयशी

  • पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ २०१९साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यात अपयशी ठरले आहेत.
  • आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिल्याने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही.
  • तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत.
  • आता विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत अन्य १० संघांसोबत खेळतील.
  • विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी संघांची १ मे २०१४ ते  १ मे २०१७ या काळातील कामगिरी विचारात घेण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा