चालू घडामोडी : २४ एप्रिल

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान शहीद

  • छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले.
  • तसेच काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
  • सीआरपीएफच्या ७४व्या बटालियनमधील ९० जवानांची तुकडी नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या काम करत होती.
  • बुरकापाल चिंतागुफा दरम्यानच्या परिसरात हे काम चालू असताना ३०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
  • नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीत सीआरपीएफचे २६ जवान शहीद झाले तर ५ नक्षलवादी मारले गेले आहेत.
  • गेल्यावर्षी सुकमा जिल्ह्यात कोट्टाचेरू येथील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २१९व्या बटालियनचे १२ जवान शहीद झाले होते.
  • यापूर्वी २०१०मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. हा भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात भीषण हल्ला होता.

कसिनाधुनी विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  • प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्वनाथ यांना २०१६चा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सुवर्ण कमळ, शाल व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्वनाथ यांना ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • विश्वनाथ यांना आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यांना दहा वेळा फिल्मफेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.
  • ‘स्वाथी मुथायम’ हा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ५९व्या अकादमी पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी पाठविण्यात आला होता.
  • याशिवाय, संकरभरणम या त्यांच्या चित्रपटासदेखील भारतासहित जगभरातून वाखाणण्यात आले होते.

नवज्योतसिंग सिद्धू यांची शेतकऱ्यांना २४ लाखांची मदत

  • नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतीचे नुकसान भरुन काढण्यासाठी स्वत:च्या उत्पनातून शेतकऱ्यांना २४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • पंजाबमधील ओठीया परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये ३०० हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले होते.
  • सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सिद्धूनीं स्वत:च्या खिशातून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
  • यापूर्वी आगीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
  • काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू पंजाबच्या अमृतसर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.

अफगाणच्या संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमूखांचा राजीनामा

  • अफगाणिस्तानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमूख कादम शाह शाहीम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • उत्तर अफगाणिस्तानमध्ये मझर-इ-शरिफ या शहराजवळील लष्करीतळावर १० सशस्त्र दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी हल्ला केला होता.
  • तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात १६०हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.
  • सैन्याचे जवान नमाज अदा करत असताना हा हल्ला झाल्याने जीवितहानीचे प्रमाण जास्त होते. यामध्ये नव्याने सैन्यात भरती झालेल्या जवानांचे प्रमाणही लक्षणीय होते.
  • हा हल्ला ज्या तळावर झाला त्यानंतर तळावरील कमांडर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
  • या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे काबूल दौऱ्यावर दाखल झाले आहेत.
  • अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळावर मोठा बॉम्ब हल्ला करुन अनेक दहशतवादी ठार केले होते. या कारवाईनंतर तालिबानी संघटनेने हा हल्ला केला होता.
  • अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष: अश्रफ घनी

रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना

  • ऑनलाइन एज्यूकेशन स्टार्ट अपचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी आता ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना केली आहे. आशिया खंडात अशा स्वरुपाचा निधी सुरु केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • भारतीय तरूणांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करणे, हे या  उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
  • भविष्यात डिजिटल क्षेत्रातील वाढत्या संधी आणि महत्त्व लक्षात घेता भारतीय तरूणांना त्यासाठी मदत तयार करण्यासाठीही या उपक्रमाची मदत होईल.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला १०० कोटी आणि भविष्यात ३०० ते ४०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा स्क्रूवाला यांचा मानस आहे.
  • भारतात उच्चशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्या तुलनेत देशात उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण नगण्य आहे.
  • कमी वयात नोकरीला लागल्याने अनेकांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना आता रॉनी स्क्रूवाला यांनी मदतीचा हात दिला आहे.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून २५ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • शिष्यवृत्तीसाठी पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नोकरी लागल्यानंतर त्यांना हे कर्ज फेडता येईल.
  • याशिवाय, आर्थिक गरज असलेल्यांना या निधीतून मदत पुरवली जाईल. मात्र, ही शिष्यवृत्ती देताना गुणवत्ता हाच प्रमुख निकष असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा