चालू घडामोडी : ८ मे

मनरेगाच्या समान मजुरीसाठी समितीची स्थापना

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) मजुरीची पुनर्रचना करण्याचा विचार सरकार करत आहे.
  • या योजनेंतर्गत ज्या निकषांवर मजुरांना मजुरी दिली जाते त्या निकषांवर आता पुनर्विचार करण्यात येणार आहे.
  • केंद्राने निश्चित केलेली मनरेगाची मजुरी आणि अनेक राज्यांकडून देण्यात येत असलेली मजुरी यात अंतर असल्याचे दिसून येते. राज्यांच्या किमान मजुरी दरापेक्षाही मनरेगाचे मजुरी दर कमी आहेत.
  • मजुरीतील हे अंतर दूर करण्यासाठी सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.
  • ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मनरेगाच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या मजुरीत आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
  • ओडिशात २ रुपये तर पश्चिम बंगालमध्ये ४ रुपये वाढ करण्यात आली आहे. केरळ आणि हरियाणा या राज्याने मनरेगा अंतर्गत सर्वाधिक १८ रुपयांची मजुरी वाढविली आहे.
  • यावर्षी मनरेगाच्या मजुरीत २.७ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात यात ५.७ टक्के वाढ झाली होती. १ एप्रिलपासून मजुरीचे नवे दर लागू झालेले आहेत.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी ही ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार दिली जाते.
  • प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील मजुरांना या माध्यमातून काम दिले जाते. केंद्र सरकारच्या एका समितीने मनरेगाच्या किमान मजुरीची शिफारस केली होती.
 मनरेगा 
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील अकुशल कामगारांना वर्षाला किमान १०० दिवस रोजगार देण्याची ही योजना आहे.
  • दहा कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला या माध्यमातून काम दिले जाते.
  • हरियाणात मनरेगाची सर्वाधिक मजुरी २७७ रुपये प्रति दिवस एवढी आहे. तर, बिहार आणि झारखंडमध्ये सर्वात कमी १६८ रुपये प्रति दिवस एवढी मजुरी आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात युवा अध्यक्ष

  • युरोप समर्थक एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला आहे.
  • ३९ वर्षीय मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. मॅक्रॉन यांनी या निवडणुकीत नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ले पेन यांचा पराभव केला.
  • प्राथमिक अंदाजानुसार इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ६५.५ ते ६६.१ टक्क्यांदरम्यान तर मेरी ले पेन यांना ३३.९ ते ३४.५ टक्क्यांदरम्यान मते मिळाली.
  • मॅक्रॉन हे उदारमतवादी विचारांचे प्रतिनिधित्व करत असून ले पेन या उजव्या राष्ट्रवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात.
  • गेल्या महिन्यात पार पडलेल्या  निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मॅक्रॉन यांनी ले पेन यांच्या विरोधात ६२ टक्के विरुद्ध ३८ टक्के अशी मतांची आघाडी होती.
  • फ्रान्स आणि युरोपसमोरील राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांना करावा लागणार आहे.
  • उत्तर फ्रान्समध्ये २१ डिसेंबर १९७७ रोजी जन्मलेल्या मॅक्रॉन यांनी २००४मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती.
  • २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • नंतर २०१४ ते २०१६ या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते. २०१६च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.  

श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे निधन

  • सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व असलेले श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कराची येथे निधन झाले.
  • रईस खान यांचा जन्म १९३९मध्ये इंदोर येथे झाला. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते.
  • रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले.
  • वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम मुंबईत केला. सततचा रियाझ व चिंतन यामुळे त्यांनी सतारवादनावर प्रभुत्व मिळवले.
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील असंख्य सुमधूर गाण्यांसाठी रईस खान यांनी सतारवादन केले आहे.
  • रईस खान सन १९६८मध्ये पाकिस्तानला वास्तव्यासाठी गेले. गेले काही दिवस ते आजारी होते. ६ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

हिंदुजा बंधू ब्रिटनमध्ये सर्वाधिक श्रीमंत

  • भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील २०१७ वर्षातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे.
  • हिंदुजा समूहाची संपत्ती १६.२ अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
  • हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील १००० प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये ४० अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
  • ‘द संडे टाइम्स रिच लिस्ट’ने ही यादी प्रसिद्ध केली असून ब्रेक्झिटचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे द संडे टाइम्सने म्हंटले आहे.
  • याउलट ब्रिटनमधील अब्जाधीशांची संपत्ती १४ टक्क्यांनी वाढली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • भारतीय वंशाचे डेव्हीड व सिमॉन रूबेन गेल्यावर्षी या यादीत अग्रस्थानी होते. सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असलेले लक्ष्मी मित्तल आता चौथ्या स्थानी आहेत.
  • ब्रिटनमधील १००० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ११० दशलक्ष डॉलर्स आहे. ही संपत्ती २०१६ मध्ये १०३ दशलक्ष पौंड होती.

सोहील महमूद भारतातील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त

  • भारतातील पाकिस्तानचे सध्याचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याजागी सोहील महमूद यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • महमूद हे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असून, त्यांनी याआधी अनेक ठिकाणी तणावाच्या परिस्थितीत काम केलेले आहे.
  • महमूद हे १९८५मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते. अधिकारी म्हणून ते अतिशय मुत्सद्दी असल्याने उच्चायुक्तपदी चांगल्या पद्धतीने काम करु शकतात, असे पाकिस्तान प्रशासनाने म्हटले आहे.
  • १९९१ ते १९९४ या कालावधीत महमूद यांनी तुर्कीचे उच्चायुक्त पद सांभाळले आहे. तर २००९ ते २०१३ दरम्यान त्यांनी थायलंडमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • याशिवाय त्यांनी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा