चालू घडामोडी : २१ मे

पूर्णिमादेवी बर्मन आणि संजय गुब्बी यांना व्हिटले पुरस्कार

  • आसामच्या पक्षी संवर्धन कार्यकर्त्यां पूर्णिमादेवी बर्मन आणि कर्नाटकचे वन्यजीव संवर्धन कार्यकर्ते संजय गुब्बी या भारतीयांना पर्यावरण क्षेत्रातील मानाचा व्हिटले पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • पर्यावरण क्षेत्रात दरवर्षी ब्रिटनमधील ‘दी व्हिटले फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या वतीने व्हिटले पुरस्कार दिले जातात. त्यांना ग्रीन ऑस्कर या नावाने ओळखले जाते.
  • एकूण ६६ देशांतील अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांतून विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना ३५ हजार पौंडांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 पूर्णिमादेवी बर्मन 
  • पूर्णिमा या हार्गिला म्हणजे ग्रेटर अ‍ॅडज्युटंट स्टॉर्क या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत.
  • आसाममधील पाणथळ जागेत आढळणारे हार्गिला पक्षी निसर्गाचे स्वच्छता दूत असतात. सध्या या पक्ष्यांची जगातील संख्या १२०० असून त्यातील ७५ टक्के आसाममध्ये आहेत.
  • त्यांनी आसामात कामरूप जिल्ह्य़ातील दादरा, पंचारिया, हिंगिमारी खेडय़ांमध्ये या पक्ष्यांसाठी मोठे काम केले आहे.
  • या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी बर्मन यांनी २००९ पासून ‘अरण्यक’ ही संस्था चालवली असून त्यात फक्त महिलांचा समावेश आहे.
  • त्यामुळे त्या भागात बर्मन यांना स्टॉर्क सिस्टर म्हणजे स्थानिक भाषेत हार्गिला बैदू म्हणून ओळखले जाते.
  • आसामी महिलांनी स्कार्फ व साडय़ा विणून त्यांची विक्री केली व त्या निधीतून या संस्थेसाठी पैसा उभा केला आहे.
  • यापूर्वी बर्मन यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा अर्थ हिरो पुरस्कार मिळाला होता.
 संजय गुब्बी 
  • कर्नाटकातील वन्यजीव संरक्षक कार्यकर्ते संजय गुब्बी यांनी वाघांचा वावर असलेल्या मार्गिकांचे संरक्षण केले.
  • गुब्बी यांनी निसर्ग व वन्यजीवांसाठी विद्युत अभियंत्याच्या नोकरीचा त्याग केला. २०१२मध्ये त्यांनी कर्नाटक सरकारच्या मदतीने व्याघ्र संवर्धनाचे क्षेत्र वाढवले.
  • वन्यजीव व माणूस यांचे परस्पर संबंध सौहार्दाचे असले पाहिजेत त्यामुळेच वाघांबरोबर स्थानिक लोकांचे रक्षणही ते कर्तव्य मानतात.
  • कर्नाटकात सध्या सर्वाधिक बंगाल टायगर्स आहेत व २०१५मध्ये ही संख्या १० ते १५  होती. पुढील काही वर्षांत ती १०० पर्यंत नेण्याचा त्यांचा विचार आहे.
  • व्याघ्र अधिवास क्षेत्रातील जंगलतोड कमी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कारण वाघांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित अधिवास मिळाला पाहिजे.
  • त्यांनी कँटरबरी येथील केन्ट विद्यापीठातून मास्टर्स इन कन्झर्वेटिव्ह बायॉलॉजी ही पदवी घेतली आहे.

श्रीनिवास कुलकर्णी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कार

  • भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • ‘फ्युचर’ प्रवर्गात त्यांची आश्वासक वैज्ञानिक म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये जन्मलेले श्रीनिवास कुलकर्णी पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ओळखले जातात.
  • दिल्लीच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी १९७८मध्ये भौतिकशास्त्रात एमएस पदवी घेतली.
  • सध्या ते पासाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (कॅल्टेक) खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
  • अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशाने त्यांनी केलेले सर्वेक्षण जगभरात वाखाणले गेले आहे.
  • ‘रेडिओ पल्सर’ (खगोल प्रकाशस्त्रोत) या ताऱ्यासंदर्भात त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी भरीव संशोधन केलेले आहे.
  • रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेट्स अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलँडस अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचे ते सदस्य आहेत.
  • त्यांना यापूर्वी अ‍ॅलन वॉटरमन पुरस्कार, हेलन वॉर्नर पुरस्कार व जॅन्सकी पुरस्कार मिळाले आहेत.
 डॅन डेव्हिड पुरस्कार 
  • तेल अवीव विश्वविद्यालयातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनतर्फे हा मानाचा पुरस्कार दिला जातो. १० लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • हा पुरस्कार विज्ञान, मानवता आणि नागरी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
  • दरवर्षी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन विभागांमध्ये डॅन डेव्हिड पुरस्कार देण्यात येतो.
  • दिवंगत उद्योजक डॅन डेव्हिड यांनी या पुरस्कारांना प्रारंभ केला होता. यंदा या पुरस्कारांचे १६वे वर्ष आहे.
  • यापूर्वी लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव या भारतीयांना हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.

भारताच्या अंशूचा ५ दिवसांत दोनवेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम

  • अरुणाचल प्रदेशातील अंशू जामसेनपा या महिला गिर्यारोहकाने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट ५ दिवसांत दोनवेळा सर करून इतिहास घडविला.
  • पाच दिवसांत दोन वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला बनण्याचा मान तिने मिळविला आहे.
  • याशिवाय पाच वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी अंशू जामसेनपा पहिली भारतीय महिला ठरली आहे.
  • तिने याआधी २०११मध्ये दहा दिवसांच्या कालावधीत दोनदा आणि त्यानंतर २०१३मध्ये एकदा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती.
  • अंशूने १६ मे रोजी सकाळी सव्वानऊ वाजता एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर २१ मे रोजी ती पुन्हा एव्हरेस्टवर पोहोचली. 
  • याआधी एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्टवर पोहोचण्याचा विक्रम छुरिम शेरपा या नेपाळी महिलेने सन २०१२ मध्ये केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा