चालू घडामोडी : २३ मे

अंतराळातल्या जीवाणूला डॉ. कलामांचे नाव

  • नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीरांना आढळलेल्या एका नव्या जीवाणूला प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे.
  • अवकाश संशोधनातील कार्यासाठी ओळखले जाणारे कलाम यांच्या नावावरून ‘सोलिबॅसिलस कलामी’ असे या जीवाणूचे नामकरण करण्यात आले आहे.
  • कलाम यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी १९६३मध्ये ‘नासा’मध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर केरळमधील थुंबा या लहानशा गावात त्यांनी भारतातील पहिली रॉकेट प्रक्षेपण यंत्रणा उभारली.
  • हा जीवाणू पृथ्वीबाहेरील नसून, तो सामानासोबत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आला असावा आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिला, असा अंदाज आहे.

जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे रॉजर मूर यांचे निधन

  • सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर (वय ८९ वर्षे) यांचे कर्करोगाने २३ मे रोजी स्वित्झर्लंड येथे निधन झाले.
  • रॉजर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ अशा सात सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते.
  • ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती.
  • रॉजर मूर यांनी जेम्स बॉण्ड सिनेमांशिवाय ‘दि सेंट’ या टीव्ही मालिकेमध्ये सायमन टेंपलर व्यक्तिरेखा साकारली होती.
  • त्यांना अभियन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांना सामाजिक कार्यासाठी ‘नाईटहुड’ची उपाधी देण्यात आली होती.

ब्रिटनमध्ये आयसिसचा आत्मघाती हल्ला

  • ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे २२ मे रोजी पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५९हून अधिक जण जखमी झाले.
  • मँचेस्टर एरिना युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर सभागृह आहे. १९९५पासून येथे मोठमोठे कॉन्सर्ट आणि खेळांचे आयोजन केले जाते.
  • ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. अरियानाच्या प्रवक्त्याने ती सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
  • या स्फोटामुळे ब्रिटनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मँचेस्टर एरिना जवळील रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले असून सर्व रेल्वेही रद्द करण्यात आले आहेत. 
  • या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. याप्रकरणी ब्रिटन पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली आहे.
  • ७ जुलै २००५ रोजी लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरचा हा ब्रिटनमधील सर्वात मोठा हल्ला आहे.  

रोम मास्टर्स टेनिस स्पर्धा २०१७

  • जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
  • झ्वेरेवचे हे ‘मास्टर्स १०००’चे पहिलेच विजेतेपद आहे. मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद कमी वयात पटकावणारा २० वर्षीय झ्वेरेव जोकोविच नंतर पहिलाच खेळाडू आहे. जोकोविचने १९व्या वर्षी पहिले मास्टर्स जेतेपद मिळविले होते.
  • या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने रोमानियाच्या सिमोना हॅलेपला पराभूत करत विजेतेपद मिळविले.
  • एलिनाचे हे मोसमातील चौथे विजेतेपद ठरले आहे. या मोसमात एलिनाने तैवान ओपन, दुबई चॅम्पियनशिप, इस्तंबुल कप आणि आता रोम स्पर्धा जिंकल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा