स्थावर मालमत्ता कायदा (रेरा) २०१६

  • बहुप्रतीक्षित स्थावर मालमत्ता कायदा (रेरा) १ मेपासून पूर्ण देशात अमलात येत असून आतापर्यंत १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी या कायद्यातील नियम अधिसूचित केले आहेत.
  • नवीन कायद्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात  कुणाची गळचेपी होणार नाही तर योग्य ते नियम  लागू केले जातील.
  • स्थावर मालमत्ता नियमन व विकास कायद्यात या क्षेत्रातील व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व व कार्यक्षमता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
  • या कायद्यामुळे यापुढील काळात घरे विकत घेणारे ग्राहक व प्रामाणिक खासगी व्यावसायिक यांना या  कायद्यातून संरक्षण मिळणार आहे.
  • स्थावर मालमत्ता नियमन व विकास विधेयक गेल्यावर्षी मार्चमध्ये संसदेने मंजूर केले होते. या कायद्यात एकूण ९२ कलमे आहेत.
  • हा कायदा नऊ वर्षांनंतर प्रत्यक्षात येत आहे. २००८मध्ये त्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली होती.
  • RERA: Real Estate Regulation Act, 2016

रेरा कायद्यातील तरतुदी

  • ५०० चौरस मीटरच्या किंवा आठ अपार्टमेंटच्या प्रकल्पांना हा कायदा लागू असेल. तसेच निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांनाही हा कायदा लागू असेल. ग्राहक व विक्रेते या दोघांनाही हा कायदा फायद्याचा आहे.
प्रकल्पाची नोंदणी बंधनकारक
  • प्रत्येक विकसकाला नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक.
  • नोंदणीनंतर विकसकाला नोंदणी क्रमांक आणि स्वतंत्र वेबपेज देण्यात येईल. नोंदणी क्रमांक जाहिरातीत नमूद करणे विकसकाला सक्तीचे आहे.
  • नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिरात केल्यास संबंधित विकसकावर कारवाई करण्यात येईल.
इस्टेट एजंटांना दंड
  • इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी करावी लागेल. नोंदणीशिवाय त्यांना प्रकल्पातील सदनिका, भूखंड खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत.
  • एजंटने नोंदणी केली नसल्यास त्याला १० हजारांचा दंड होईल. हा दंड नोंदणी नसलेल्या दिवसापासून नोंदणी करेपर्यंतच्या कालावधीपर्यंतचा असेल.
निर्णयाविरोधात तक्रार करता येणार
  • ज्या प्रकल्पाची प्राधिकरणाकडे नोंदणी झालेली आहे अशा प्रकल्पाबाबत कोणतीही बाधित व्यक्ती प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवू शकेल.
  • प्राधिकरणाच्या निकालाने समाधान न झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणासमोर अपील करता येईल.
  • त्याचप्रमाणे अपिलीय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीला उच्च न्यायालयात दाद मागता येईल.
विकसकांसाठी कठोर बंधने
  • सदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या खर्चाच्या १० टक्क्यांहून अधिक रक्कम आगाऊ रक्कम म्हणून अर्जासह विक्रीच्या लेखी कराराची नोंदणी केल्याखेरीज विकसक स्वीकारू शकणार नाही.
  • ग्राहकांनी प्रकल्पासाठी भरलेली ७० टक्के रक्कम विकसकाला शेड्युल्ड बॅंकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात जमा करावी लागेल.
  • ही रक्कम संबंधित प्रकल्पासाठीच वापरावी लागणार असल्याने विकसकाला ती दुसऱ्या प्रकल्पात गुंतवता येणार नाही.
  • प्रकल्पाच्या प्रगतीनुसार खात्यातून विकसकाला पैसे काढता येतील. त्यासाठी प्रगतीचे व खर्चाचे प्रमाणपत्र, प्रकल्पाचे अभियंता, वास्तुविशारद आणि कार्यरत सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
प्रकल्पाची माहिती संकेतस्थळावर
  • विकसकाला प्रकल्पाची सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर टाकावी लागेल.
  • सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली योजना, योजनेचा तपशीलवार आराखडा, वैशिष्ट्ये, नकाशा, प्रस्तावाची मांडणी, संपूर्ण प्रकल्पासाठी वापरला जाणारा चटई क्षेत्र निर्देशांक अशी सर्व माहिती संकेतस्थळावर टाकणे आवश्यक.
विकसक-ग्राहकांमधील वादावर तोडगा
  • विक्री करारातील अटींनुसार काम करण्यात विकसक असमर्थ ठरल्यास दर महिन्याला ग्राहकांना व्याज द्यावे लागेल.
  • विलंबामुळे ग्राहकाने घर नाकारल्यास त्याने दिलेली सर्व रक्कम सव्याज परत करावी लागेल.
  • इमारतीतील ५१ टक्के सदनिका विकल्याच्या नोंदी झाल्यापासून तीन महिन्यांत विकसकाला सहकारी संस्था, भागीदारी संस्था, संघटना, फेडरेशन इत्यादी सक्षमपणे स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करावी लागेल.

रेरा आणि महाराष्ट्र

  • केंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार महाराष्ट्र सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम (रेरा) अधिवेशनात मंजूर केला आहे.
  • या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिन म्हणजेच १ मेपासून  करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.
  • या कायद्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
  • नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. त्याचे मुख्यालय मुंबईत असेल.
  • प्राधिकरणावर एक अध्यक्ष आणि तीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • RERA: Real Estate Regulation Act, 2016

1 टिप्पणी: