चालू घडामोडी : १ जून

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेला मंजुरी

  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरू करण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी दरवर्षी ५० कोटी इतका निधी देण्यात येणार आहे.
  • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादने आणि खाद्यान्न व तेलबिया इत्यादी शेतमालासाठी अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापन करता येतील.
  • फळे व भाजीपाल्यासारख्या नाशवंत शेतमाल प्रक्रियेच्या प्रकल्पांना योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
  • ही योजना २०१७-१८ पासून पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार असून, त्यानंतर योजनेच्या मूल्यमापन करून ती पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
  • प्रक्रिया प्रकल्पासाठी करावे लागणारे बांधकाम यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ३० टक्के अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येईल. या अनुदानाची कमाल मर्यादा ५० लाख रुपये आहे.
  • त्याचप्रमाणे केंद्र व राज्य संस्थांकडून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण शुल्काच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
  • या योजनेवर नियंत्रण व देखरेखीसाठी कृषी व फलोत्पादन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
  • तसेच योजनेंतर्गत प्राप्त प्रकल्पांची छाननी करून त्यास मंजुरी देण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती राहणार आहे.
  • योजेनेचे प्रमुख तीन घटक
    • कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणी
    • अस्तित्वातील प्रकल्पांची गुणवत्ता वाढ व आधुनिकीकरण
    • मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना
  • योजेनेची प्रमुख उद्दिष्टे
    • शेतीमालाचे मूल्यवर्धन
    • उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ
    • शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे
    • ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण
    • प्रक्रिया केलेल्या उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन
    • ग्रामीण भागातील लघू व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन

भारत आणि रशिया दरम्यान पाच करार

  • चार देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह १८व्या भारत-रशिया परिषदेमध्ये सहभाग घेतला.
  • मोडी यांनी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे, तसेच ऊर्जा आणि व्यापारी संबंध वाढवण्यासह विविध विषयांवर चर्चा केली. 
  • मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांत पाच करार करण्यात आले. त्यात कुडनकुलमसंबंधी कराराचा समावेश आहे. 
  • या करारानुसार रशियाच्या सहकार्याने तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील अखेरच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटची निर्मिती करण्यात येणार आहे.
  • या दोन्ही युनिटची क्षमता प्रत्येकी एक हजार मेगावॉट असेल आणि त्यामुळे अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
  • भारताची न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि रशियाची अणु कार्यक्रम नियमाक रोसाटॉमची उपकंपनी अॅटोस्ट्रोयेक्स्पोर्ट या युनिटची उभारणी करणार आहेत.
  • अणुऊर्जेला चालना देणारा हा महत्त्वाचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यातील केंद्रबिंदू ठरला.

रामचंद्र गुहा यांचा बीसीसीआय प्रशासकीय समितीचा राजीनामा

  • इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिला आहे.
  • गुहा यांनी वैयक्तिक कारणावरुन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद रॉय यांच्याकडे राजीनामा सोपवत असल्याचे सांगितले.
  • भारतीय क्रिकेट बोर्डाने लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले होते.
  • भारतीय क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरुन हटवले होते.
  • त्यानंतर जानेवारी २०१७मध्ये माजी नियंत्रक व महालेखापरीक्षक विनोद रॉय यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.
  • रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांना या समितीचे सदस्यत्व देण्यात आले होते.

महाराष्ट्रातील दोन योजना आता उत्तर प्रदेशमध्येही

  • महाराष्ट्रात सवलतीच्या दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ पुरवणारी अस्मिता योजना आणि शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज देणारी सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण या योजना उत्तर प्रदेशमध्येही राबविण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्रातील किशोरवयीन मुलींकरिता सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकिन पुरवून त्यांचा वापर वाढविण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली आहे.
  • तसेच राज्यातील महिलांमध्ये उद्यमशीलता वाढावी, यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मोहिमेनुसार स्वयंसहायता समूहांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळावे, यासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यात येत आहे.
  • २०१६पासून सुरू झालेल्या या योजनांमुळे प्रभावित झालेल्या उत्तर प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री रिटा बहुगुणा यांनी या योजना उत्तर प्रदेशातही राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

काबूलमध्ये शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोट

  • अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ३१ मे रोजी झालेल्या शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोटात ८० लोक ठार, तर सुमारे ३५० जण जखमी झाले.
  • स्फोट झाला त्या भागात भारतासह अनेक देशांचे दूतावास आहेत. या हल्ल्यात  जपान, फ्रान्स आणि जर्मनीच्या दूतावासांचे नुकसान झाले.
  • शाळकरी मुली आणि स्फोटातून बचावलेले जखमी लोक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धावू लागल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.
  • या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यात आपला हात नसल्याचे ट्विट तालिबानने केले आहे.
  • या हल्ल्याची सूत्रे इस्लामाबादहून हलल्याची गुप्तचर संस्थांची माहिती असून, त्यामुळे आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे.
  • देशात तसेच बाहेर कुठेही पाकिस्तान क्रिकेट संघाशी सामने खेळण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा