चालू घडामोडी : १३ व १४ जून

भारताच्या दिशादर्शक उपग्रहातील स्वयंचलित घड्याळे बंद

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘आयएनआरएसएस-१ ए’ या दिशादर्शक उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडली आहेत.
  • युरोपमधून खास मागवण्यात आलेल्या या घड्याळांमुळे भारतातील ठिकाणांची अचूक माहिती पुरवण्यात मदत होणार होती.
  • परंतु या घड्याळांशिवाय ठिकाणांबद्दलची अचूक माहिती मिळवणे शक्य होणार नाही. ही घड्याळे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न इस्त्रोद्वारे सुरु आहेत.
  • भारतीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीमध्ये एकूण नऊ उपग्रहांचा समावेश असून, यापैकी सात उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. तर दोन उपग्रह प्रक्षेपणाच्या टप्प्यात आहेत.
  • या संपूर्ण प्रणालीसाठी १४२० कोटींचा खर्च आला आहे. या प्रकल्पातील प्रत्येक उपग्रह १० वर्षे काम करू शकतो.
  • दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील शेवटचा उपग्रह ‘आयएनआरएसएस-१ जी’ गेल्यावर्षी २८ एप्रिलला ‘पीएसएलव्ही-सी३३’ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने अवकाशात सोडण्यात आला होता.
  • या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे दळणवळणासाठी स्वतंत्र उपग्रह व्यवस्था असलेल्या देशांच्या विशेष गटात भारताला स्थान मिळाले होते. अमेरिकास्थित जीपीएसच्या धर्तीवरील ही यंत्रणा आहे.
  • इस्रोचे अध्यक्ष: ए एस किरणकुमार

ज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन

  • ज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी यांचे १२ जून रोजी निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावाने प्रसिद्ध होते.
  • रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते. त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ञही होते.
  • रेड्डी यांचा जन्म २९ जुलै १९३१ रोजी करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता. ‘तेलुगूतील आधुनिक परंपरा’ या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती पदवी घेतली.
  • १९६२मध्ये ते तेलुगू चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी ‘गुलबकावली कथा’ या चित्रपटातील सगळी गाणी लिहिली व ती लोकप्रिय ठरली.
  • रेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह ८० साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली आहेत.
  • १९९७ मध्ये ते राज्यसभेवर गेले. त्यांना १९७७मध्ये पद्मश्री, तर १९९२मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • त्यांच्या ‘विश्वंभरा’ या काव्यसंग्रहास १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेलुगूला हा पुरस्कार मिळवून देणारे ते विश्वनाथ सत्यनारायण यांच्यानंतरचे दुसरे साहित्यिक ठरले.
  • ‘कला प्रपूर्ण’ ही आंध्र विद्यापीठाची मानद पदवी, राजलक्ष्मी पुरस्कार, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे सन्मान त्यांना मिळाले.

पनामाचे चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित

  • मध्य अमेरिकेतील पनामा देशाने तैवानशी राजनैतिक संबंध तोडून जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनशी नव्याने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत.
  • चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी व त्यांच्या पनामातील समपदस्थ इसाबेल सेंट मालो डे अलव्हाडरे या संबंधित एका करारावर बीजिंगमध्ये स्वाक्षऱ्या केल्या.
  • तैवानशी इतकी वर्षे पनामाचे संबंध होते पण आता त्यांनी चीनच्या ‘वन चायना’ धोरणास मान्यता दिली आहे.
  • तैवानने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यामुळे तैवान व चीन यांच्यातील संबंध आणखी बिघडणार आहेत.
  • तैवानमध्ये स्वयंशासन असले तरी त्याला विलीन करून घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तैवानला जगातील वीस देशांची मान्यता असून त्याचा दर्जा हा नेहमी संवेदनशील विषय राहिला आहे.

लंडनमधील ग्रेनफेल टॉवरला भीषण आग

  • पश्चिम लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर या २७ मजली इमारतीला १४ जून रोजी लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला असून, ७४ जण जखमी झाले.
  • लॅटीमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेटमध्ये असलेल्या ग्रेनफेल टॉवरला आग लागली, त्यावेळी इमारतीतील १२० सदनिकांमध्ये ६०० रहिवासी होते.
  • गेल्या तीन दशकांतील ब्रिटनमधील आगीची ही सर्वाधिक भीषण दुर्घटना आहे. आगीची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा