चालू घडामोडी : १ ऑगस्ट

पनगढिया निती आयोग उपाध्यक्ष पदावरून पायउतार

  • निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी त्यांच्या आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते ३१ ऑगस्टपर्यंत सेवेत राहणार आहेत.
  • निती आयोगाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पनगढिया अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठामध्ये अध्यापन करणार आहेत.
  • देशाच्या विकास प्रक्रियेची दिशा ठरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नियोजन आयोग बरखास्त करुन निती (नॅशनल इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) आयोगाची  स्थापना केली होती. 
  • ही संस्था सरकारचा ‘थिंक टॅंक’ म्हणून काम करत असून, देशाला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणे हे निती आयोगाचे मुख्य काम आहे. 
  • पंतप्रधान मोदी हे निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तर २०१५मध्ये या आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अरविंद पनगढिया यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणारे अरविंद पनगढिया पनगढिया जगातील अनुभवी अर्थतज्ज्ञांपैकी आहेत.
  • त्यांनी आशियाई विकास बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना या संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

मुकेश अंबानी आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

  • ब्लूमबर्ग इंडेक्सच्या नुसार, देशातले दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • मुकेश अंबानी यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांना मागे टाकले आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात १२.१ अब्ज डॉलर एवढी वाढ झाली आहे.
  • आता त्यांची एकूण संपत्ती ३४.८ अब्ज डॉलर झाली आहे. तर ली का शिंग यांची एकूण संपत्ती ३३.३ अब्ज डॉलर एवढी आहे.
  • ‘अलिबाबा’चे फाऊंडर आणि सीईओ जॅक मा हे आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेचे निर्बंध

  • बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचे सांगत त्यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.
  • व्हेनेझुएलाच्या संविधानात बदल करुन स्वतःला अनिर्बंध अधिकार प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने निकोलस मादुरो यांनी ३० जुलै रोजी निवडणुका घेतल्या.
  • या निवडणुकीदरम्यान व्हेनेझुएलात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यात १४ लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे ४०० जण जखमी झाले.
  • याशिवाय या निवडणुकांच्या विरोध प्रदर्शनात गेल्या ४ महिन्यांमध्ये १२० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
  • यामुळे मादुरो यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे. 
  • अमेरिकेची ही कारवाई उन्मत्त आणि बेकायदेशीर असल्याचं निकोलस मादुरो यांनी म्हटले आहे.

शाहिद अब्बासी पाकिस्तानचे १८वे पंतप्रधान

  • शाहिद खाकन अब्बासी यांची पुढील ४५ दिवसांसाठी पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • अब्बासी हे पाकिस्तानचे १८वे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी पिपल्स पार्टीच्या नवीद कमर यांचा पराभव केला. 
  • संसदेच्या नव्या नेत्याची निवड करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीची बैठक बोलावली होती.
  • पाकिस्तानच्या ३४२ सदस्यांच्या संसदेत पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या १८८ जागा आहेत.
  • पीएमएल-एन पक्षाने नवाज शरीफ यांचे भाऊ शहबाज या पदावर बसण्यायोग्य होईपर्यंत अब्बासी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून मान्यता दिली.

ड्रेसेलला जागतिक जलतरण स्पर्धेत ७ सुवर्णपदके

  • अमेरिकेच्या कॅएलेब ड्रेसेलने जागतिक जलतरण स्पर्धेत एकाच सत्रात सलग तीन सुवर्णपदके पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
  • अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलतरणपटू ठरला असून, त्याच्या कामगिरीमुळे अमेरिकेला या स्पर्धेत सर्वाधिक ३८ पदकांची कमाई करता आली.
  • याशिवाय ड्रेसेलने एका जागतिक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळविण्याच्या मायकेल फेल्प्सच्या कामगिरीशी बरोबरीही केली.
  • फेल्प्सने अशी कामगिरी २००७मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत केली होती. ड्रेसेलने या स्पर्धेत ३ वैयक्तिक आणि ४ रिले शर्यतीची सुवर्णपदके मिळविली. 
  • पुरुषांच्या ५० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात ड्रेसेलने २१.१५ सेकंदाची विश्वविक्रमी वेळ देत सुवर्णपदकावर नाव कोरले.

ऑलिम्पिक २०२८ लॉस एंजलिसमध्ये

  • अमेरिकेतल्या लॉस एंजलिस या शहराला २०२८च्या ऑलिम्पिक खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळणार आहे.
  • आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसोबत झालेल्या करारानूसार पॅरिस शहराला २०२४सालच्या ऑलिम्पीक खेळांचे यजमानपद मिळाले आहे.
  • २०१६साली ब्राझीलच्या रिओ दी जनेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पिकनंतर आगामी २०२० ऑलिम्पिक जपानच्या टोकीयो शहरात होणार आहेत.
  • ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी या दोन्ही शहरांना आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती १.८ दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये आगामी काळात गरजेनूसार २ दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा