चालू घडामोडी : १३ ऑगस्ट

‘पवनहंस’च्या विक्रीला मंजुरी

  • सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवनहंस लिमिटेड’ची विक्री करण्यासाठी सरकारने वित्त व्यवहार, कायदेशीर सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाची नेमणूक केली आहे.
  • पवनहंस ही सरकारी कंपनी असून, नफा कमावत आहे. तिच्यात धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्यास अर्थव्यवहार मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी तत्त्वत: मान्यता दिली होती.
  • मंत्रिमंडळ समितीने पवन हंसमधील सरकारच्या हिस्सेदारीची १०० टक्के विक्री करण्यास परवानगी दिली आहे. धोरणात्मक खरेदीदार ही हिस्सेदारी विकत घेऊ शकेल.
  • मात्र, आतापर्यंत नफ्यात असलेल्या पवनहंस या कंपनीच्या निर्गुंतवणुकीस संसदीय समितीने आक्षेप घेतला आहे.
  • हेलिकॉप्टरची सेवा पुरविणारी पवन हंस ही कंपनी केंद्र सरकार आणि सरकारी मालकीची ओएनजीसी ही कंपनी यांच्या संयुक्त मालकीची आहे. १९८५ मध्ये पवनहंसची स्थापना करण्यात आली होती.
  • या कंपनीमध्ये ९०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ४५० कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. उरलेले कर्मचारी हंगामी स्वरूपाचे आहेत.

बाबा रामदेववर आधारित पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती

  • योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित ‘गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव’ या पुस्तकाच्या विक्रीला दिल्लीमधील न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
  • प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तर जगरनॉट बुक्सने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
  • या पुस्तकामध्ये बाबा रामदेव यांचा हरियाणामध्ये जन्म घेण्यापासून ते एक यशस्वी व्यवसायिक होण्यापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला आहे. यामध्ये त्यांचे सहकारी बाळकृष्ण तसंच इतरांबद्दलही सांगण्यात आले आहे. 
  • न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीला स्थगिती दिल्याने प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानच्या मदर तेरेसा डॉ. रुथ फाऊ यांचे निधन

  • पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्टर रुथ फाऊ यांचे वयाच्या ८५व्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • त्या ८५ वर्षाच्या होत्या. तसेच पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.
  • डॉ. फाऊ या १९६०मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून, त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.
  • नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी १९६२मध्ये कराचीमध्ये ‘मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर’ स्थापन केले आणि या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत. 
  • त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले.
  • त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज १९७९मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार १९८९मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना २०१५मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा