चालू घडामोडी : ३ सप्टेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

  • पंतप्रधान मोदींनी ३ सप्टेंबर रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर ४ राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे.
  • आगामी लोकसभा निवडणूक आणि सरकारची आतापर्यंतची कामगिरी या दोन निकषांच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार निर्णायक ठरला.
  • मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल करताना मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.
  • माजी केंद्रीय मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण विभागाची धूरा देण्यात आली होती.
 फेरबदलानंतर कॅबिनेट मंत्री 
  • निर्मला सीतारामन: संरक्षणमंत्री
  • नितीन गडकरी: दळणवळण, शिपिंग, जलसंपदा, नदीविकास, गंगा स्वच्छता
  • धर्मेंद्र प्रधान: पेट्रोलियम, कौशल्य विकास मंत्रालय
  • पियुष गोयल: रेल्वे आणि कोळसा मंत्रालय
  • स्मृती इराणी: माहिती, प्रसारण, वस्त्रोद्योग खातं
  • मुक्तार अब्बास नक्वी: अल्पसंख्याक मंत्री
  • उमा भारती: पेयजल आणि स्वच्छता मंत्री
  • सुरेश प्रभू: वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
 फेरबदलानंतर राज्यमंत्री 
  • डॉ.वीरेंद्र कुमार: महिला, बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्री
  • अनंतकुमार हेगडे: कौशल्य विकास राज्यमंत्री
  • विजय गोयल: संसदीय कार्य राज्यमंत्री
  • अश्विनीकुमार चौबे: आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री
  • अल्फोन्स कन्नथानम: पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
  • महेश शर्मा: पर्यावरण, सांस्कृतिक राज्यमंत्री
  • सत्यपाल सिंह: मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
  • शिवप्रतापसिंह शुक्ल: अर्थ राज्यमंत्री
  • आर.के. सिंह: ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
  • गजेंद्र शेखावत: कृषी राज्यमंत्री
 निर्मला सीतारामन यांच्याबद्दल 
  • निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्येच त्यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले.
  • दिल्लीमधील जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी परराष्ट्र संबंधात पीएचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी बीबीसीमध्ये काही काळ काम केले.
  • निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत.
  • २००६साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. २०१४पासून त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री आहेत.
  • त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत. सीतारामन या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
  • सीतारामन यांच्यापुर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी १९७५ साली २० दिवसांसाठी व १९८० ते ८२ अशी दोन वर्षे देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले होते.
  • मात्र फक्त संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला आहे.
 इतर देश आणि महिला संरक्षण मंत्री 
  • १९६०साली श्रीलंकेत सीरीमावो बंदारनायके या जगातील पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून काम करु लागल्या.
  • १९६० ते १९६५ अशी ५ वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. नंतर पुन्हा १९७० ते १९७७ अशी सात वर्षे त्या संरक्षण मंत्री पदावर होत्या.
  • त्यांची मुलगी चंद्रिका कुमारतुंगा यांनीही १९९४ ते २००१ इतका प्रदिर्घ काळ श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रीपद भूषविले.
  • पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो १९८८ ते १९९० या दोन वर्षांसाठी संरक्षणमंत्री होत्या.
  • बांगलादेशात १९९१ पासून संरक्षणमंत्रीपद महिलेकडेच आहे. बेगम खालिदा झिया यांनी बांगलादेशात संरक्षणमंत्री होण्याचा सर्वात प्रथम मान १९९१ ते ९६ या काळासाठी मिळवला.
  • त्यानंतर ५ वर्षे शेख हसिना या पदावर होत्या. पुन्हा ५ वर्षे झिया संरक्षणमंत्री झाल्या व २००९ पासून गेली ८ वर्षे शेख हसिना पुन्हा संरक्षण मंत्रालय सांभाळत आहेत.
  • नेपाळमध्ये विद्यादेवी भंडारी यांनी २००९ ते २०११ अशी दोन वर्षे संरक्षण मंत्रीपदी काम केले आहे.
  • याबरोबरच सध्या दुबईला पळून गेलेल्या थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा एका वर्षासाठी थायलंडचे संरक्षण मंत्रीपद सांभाळत होत्या.

ओल्टमन्स यांची हॉकी प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी

  • भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांची हॉकी इंडियाने खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
  • भारतीय संघाच्या पुढील वाटचालीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे हॉकी इंडियाकडून सांगण्यात येत आहे.
  • ओल्टमन्स यांच्या जागी उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन हे हंगामी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत.
  • २०१२ साली भारताचा संघ लंडन ऑलिम्पिकमध्ये १२व्या स्थानी होता. पण त्यानंतर ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१६साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ८वे स्थान पटकावले होते.
  • जानेवारी २०१३मध्ये ओल्टमन्स यांनी उच्च कामगिरी संचालक म्हणून भारतीय संघातील जबाबदारी स्वीकारली होती.
  • त्यानंतर जुलै २०१५मध्ये पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गतवर्षी झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल

  • आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती.
  • या नियमांना आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली आहे.
  • त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून खेळवल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रिकेट सामन्यात नवीन नियम लागू होणार आहेत.
 नवीन नियम 
  • एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत (LBW) असल्याचे अपील केले, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली रिव्ह्यू (DRS)ची संधी गमावणार नाही. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची (DRS)ची संधी संपून जायची.
  • कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर (DRS)च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.
  • वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRSचा वापर करण्यात येणार आहे.
  • DRSमध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणे अनिवार्य होणार आहे.
  • प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमी, खोली ६७ मिमी तर बॅटची कडा ही ४० मिमी इतकी असणे बंधनकारक असणार आहे.
  • फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.
  • एखाद्या फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये पोहचल्यानंतर जर हवेत उचलली गेली तरीही त्याला धावबाद (RUN OUT) ठरवता येणार नाही. मात्र स्टम्प्स उडत असताना फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये नसेल तर तो बाद ठरवला जाणार आहे.

ज्येष्ठ गायिका रजनी करकरे-देशपांडे यांचे निधन

  • सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे-देशपांडे यांचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले.
  • श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे ३ ऑगस्टपासून खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्यांचे निधन झाले.
  • रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले.
  • तीस वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली आदी केंद्रावरून गायनाचे कार्यक्रम सादर केले.
  • विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी मैफिली सादर केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. वरात, हे दान कुंकवाचे, दैवत, आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
  • १९८४मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गेली ३० वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या.
  • सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग १६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी चालविले.

११ वर्षीय दिव्याला सुवर्णपदक

  • नागपूरच्या ११ वर्षीय दिव्या देशमुख हिने ब्राझिलमध्ये झालेल्या १२ वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला आहे.
  • मुलींच्या श्रेणीमध्ये झालेल्या ११ पैकी ११ फेऱ्यांमध्ये दिव्या अपराजित राहिली आणि तिने ९.५ गुण मिळवले. तिने एकूण ८ सामने जिंकले तर ३ सामने अनिर्णित राहिले.
  • अमेरिकेच्या नतास्जा मेटस या खेळाडूपेक्षा एक गुण जास्त मिळवत दिव्या प्रथम स्थानावर राहिली.
  • या स्पर्धेमध्ये १९ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. दिव्याच्या खालोखाल भारताच्या रक्षिता रावीने आठवे स्थान मिळवले.
  • यापूर्वी दिव्याने आशियाई युथ चँपियनशिप स्पर्धेत कास्यपदक तर, गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
  • २०१४मध्ये तिने १० वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा