चालू घडामोडी : १३ सप्टेंबर

बिना अगरवाल यांना बालझान फाऊंडेशन पुरस्कार

  • प्रख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ बिना अगरवाल यांना यंदाचा ‘बालझान फाऊंडेशन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
  • नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. ७ लाख ९० हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • बिना अगरवाल यांनी सैद्धांतिक आर्थिक विचार थेट वंचितांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी वापरला, यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • ग्रामीण अर्थव्यवस्था हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. सध्या त्या ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठात विकास अर्थशास्त्र व पर्यावरण या विषयाच्या प्राध्यापक आहेत.
  • जमीन, रोजीरोटी, मालमत्ता हक्क, पर्यावरण, विकास व लिंगभावाधारित राजकीय अर्थशास्त्र, गरिबी व असमानता, कायद्यातील बदल, कृषी व तांत्रिक स्थित्यंतरे अशा अनेक विषयांत त्यांचा अभ्यास आहे.
  • दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. केम्ब्रिज विद्यापीठातून त्या बीए व एमए झाल्या.
  • हार्वर्ड, प्रिन्स्टनसह अनेक नामवंत विद्यापीठांत त्या प्राध्यापक होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संस्थांत त्यांनी काम केले आहे.  
  • अर्थतज्ज्ञ स्टिगलिट्झ यांच्या नेतृत्वाखालील कमिशन फॉर मेजरमेंट ऑफ इकॉनॉमिक परफॉर्मन्स अ‍ॅण्ड सोशल प्रोग्रेस या समितीत काम करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
  • ‘अ फील्ड ऑफ वन्स ओन- जेंडर अ‍ॅण्ड लॅण्ड राइट्स इन साऊथ एशिया’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे.
  • या पुस्तकासाठी त्यांना कुमारस्वामी, एडगर ग्रॅहम, के एच भतेजा असे तीन पुरस्कारही मिळाले होते.
  • २००५मध्ये त्यांनी हिंदू वारसा कायद्यातील लिंगभाव समानतेबाबत दुरुस्तीसाठी मोहीम सुरू केली होती. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना २००८मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत व बेलारुसदरम्यान १० करार

  • बेलारुसचे अध्यक्ष ए जी लुकाशेंको दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
  • दोन देशांमध्ये आर्थिक भागीदारी वाढविण्यावर भर देणे, हा या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता.
  • यावेळी भारत व बेलारुसदरम्यान संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याविषयी १० करार करण्यात आले.
  • संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास करण्याबाबतच्या एका सामंजस्य करारावरही उभय देशांमध्ये एकमत झाले आहे.

घटस्फोटासाठीची ६ महिन्यांची अट शिथिल

  • नवरा आणि बायको दोघेही परस्पर सामंजस्याने एकामेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास यापुढे त्यांना औपचारिकपणे घटस्फोट मिळण्यासाठी ६ महिने थांबण्याची गरज पडणार नाही.
  • नवरा आणि बायको दोघांचीही घटस्फोटाला मान्यता असेल तर आठवड्यातच घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या जोडप्याला घटस्फोट हवा असेल, तर त्यासाठी अर्ज केल्यानंतर किमान ६ महिन्यांचा कालावधी दोघांना दिला जातो.
  • समुपदेशनासाठी हा कालावधी राखीव ठेवला जातो. त्यानंतरही घटस्फोटाचा निर्णय कायम राहिल्यास संबंधित जोडप्याच्या घटस्फोटाला कायदेशीरपणे मंजुरी दिली जाते.
  • हिंदू विवाह कायद्यातील कलम १३(ब)२ नुसार ६ ते १८ महिन्यांच्या कालावधीत नवरा आणि बायको या दोघांनीही घटस्फोटासाठीचा आपला अर्ज मागे घेतला नाही, तर अशा स्थितीत न्यायालय त्यांना घटस्फोट मंजूर करून एकमेकांपासून विभक्त करू शकते.
  • एखाद्या जोडप्याने घाईगडबडीत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊ नये. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
  • या काळात दोघांनीही परस्परांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे अपेक्षित आहे. समुपदेशनाचाही यासाठी दोघांना उपयोग होऊ शकतो.
  • पण १२ सप्टेंबर रोजी यासंदर्भात दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,
    • जर एखादे जोडपे घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीही वर्षभरापासून विभक्तपणे राहत असेल.
    • त्याचबरोबर घटस्फोट घेण्याला नवरा आणि बायको या दोघांचीही मंजुरी असेल.
    • तसेच अपत्याचे पालकत्व कोणाकडे असेल, यावरही दोघांमध्ये सहमती असेल.
  • तर अशा स्थितीत सहा महिन्यांच्या कालावधीची अट शिथिल केली जाऊ शकते. अशा जोडप्याला आठवड्यातच घटस्फोट दिला जाऊ शकतो.

लवकरच शंभर रुपयांचे नाणे चलनात

  • दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त सरकारने शंभर आणि पाच रुपयाचे नवे नाणे आणण्याची घोषणा केली आहे.
  • यातील शंभर रुपयाच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम तर ५ रुपयाच्या नाण्याचे वजन ५ ग्रॅम असेल.
  • नाण्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के कॉपर, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल.
  • सध्या बाजारात १,२, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात आहेत. आगामी काळात यात १०० रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे.
  • एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी १९७२मध्ये ‘द्रविड मुन्नेतत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अखिल भारतीय अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती.
  • एमजीआर यांनी १९७७, १९८० तसेच १९८४मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. १९८९मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा