चालू घडामोडी : ३ ऑक्टोबर

भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर

  • रेनर वेईस, बॅरी बॅरीश, कीप थॉर्न या संशोधकांना गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.
  • वैद्यकशास्त्रापाठोपाठ भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले तिन्ही संशोधक हे अमेरिकेचे आहेत.
  • १९१६मध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी गुरुत्त्वीय लहरी अस्तित्त्वात असाव्यात, असे व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या आधारे म्हटले होते.
  • गेली अनेक वर्षे सर्व जगभरामध्ये गुरुत्वीय लहरींच्या शोधाच्या दिशेने प्रयत्न चालविले होते त्याला सप्टेंबर २०१५मध्ये अमेरिकेत लायगो (लेसर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी) प्रकल्पामध्ये यश मिळाले.
  • यामध्ये दोन कृष्णविवरांच्या टकरीतून गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्याची नोंद लायगोमध्ये झाली होती. फेब्रुवारी २०१६मध्ये या लहरी सापडल्याची घोषणा करण्यात आली होती.
  • लायगोच्या ज्या उपकरणाद्वारे या लहरींचा शोध लावण्यात आला ती उपकरणे अमेरिकेमध्ये लिविंगस्टन, लुझियाना आणि हॅनफोर्ड, वॉशिंग्टन या ठिकाणी उभी करण्यात आली आहेत.
  • लायगोच्या लायगो सायंटिफिक कोलॅबोरेशन या संशोधन प्रकल्पामध्ये गेली सुमारे ३० वर्ष काम करणाऱ्या १४ देशांमधील हजाराहून अधिक संशोधकांनी या संशोधनात योगदान दिले आहे.
  • १९८०साली संशोधक रायनेर वाएस, रिचर्ड फेइन्मन, किप थॉर्न यांनी लायगोची कल्पना मांडली होती. या कल्पनेतून विकसीत झालेल्या एल आकाराच्या उपकरणाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे अस्तित्व शोधले. 
  • या तिघांनी हे संशोधन पूर्णत्वास नेले आणि शेवटी गुरुत्वीय लहरींवर शिक्कामोर्तब झाले. यासाठी तिघांना नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.
 या संशोधनातील भारतीयांचे योगदान 
  • भारतामधील ९ संस्थांमधील एकूण ३७ भारतीय वैज्ञानिकांनी हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  • यामध्ये पुणे शहरामधील खगोलविज्ञान व खगोलभौतिक या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या ‘आयुका’ संस्थेमधील वैज्ञानिकांचा सिंहाचा वाटा आहे.
  • आयुकामधील सुमारे १२ भारतीय वैज्ञानिक या संशोधनासाठी लिहिण्यात आलेल्या पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक होते.
  • आयुका संस्थेतील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे.

ओबीसीमधील जातींच्या वर्गीकरणासाठी आयोग स्थापन

  • केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणाऱ्या सर्व जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली आहे.
  • ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत हा या आयोगाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.
  • हा आयोग राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४०अन्वये नेमण्यात आला असून दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी हे या आयोगाचे अध्यक्ष असतील.
  • भारतीय वंशशास्त्रीय सर्वेक्षण संचालक व जनगणना महानिबंधक हे या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे सहसचिव आयोगाचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.
  • याखेरीज डॉ. ए.के. बजाज यांची आयोगाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तीन महिन्यात आयोगाने सरकारला अहवाल देणे अपेक्षित आहे.
 आयोगाची कार्यकक्षा 
  • ओबीसीआरक्षणाचे लाभ त्यातील विविध जातींना व पोटजातींना कसे अन्याय्य पद्धतीने मिळतात याचा अभ्यास करणे.
  • ‘ओबीसीं’मध्ये मोडणाऱ्या पोटजातींचे वर्गीकरण करणे.
  • आरक्षणाचे लाभ त्या सर्व जातींना समन्यायी पद्धतीने देण्यासाठी कोणते निकष व पद्धत वापरावी याची शिफारस करणे.

पीएमएलच्या अध्यक्षपदी पुन्हा नवाझ शरीफ

  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ताधारी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ)च्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानातील नवीन कायद्यानुसार अयोग्य घोषित करण्यात आलेला लोकप्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतो. त्यामुळेच शरीफ यांना पुन्हा पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे.
  • पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणात शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले होते.
  • जुलैमध्ये शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तसेच सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझचे अध्यक्षपदही सोडावे लागले होते.

मल्ल्याला लंडनमध्ये अटक व जामीन

  • बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी लंडनमध्ये अटक करण्यात आली.
  • अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याला जामीनदेखील मंजूर करण्यात आला. सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या विनंतीनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
  • विजय मल्ल्याला अटक करण्यात येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी १३ जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती.
  • भारताने विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. मात्र त्यावेळीही अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला होता.
  • मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून सुमारे ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा