चालू घडामोडी : ५ ऑक्टोबर

कझुओ इशिगुरो यांना साहित्यातील नोबेल

  • जपानी वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार, साहित्यिक कझुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या या पुस्तकातून केला.
  • नोबेल पुरस्काराच्या रुपात इशिगुरो यांना सुमारे ११ लाख डॉलर इतकी रक्कम प्राप्त होणार आहे. भारतीय चलनात याची किंमत सहा कोटी रुपयांहून अधिक आहे.
  • इशिगुरो यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९५४ ला जपानमधील नागासाकी येथे झाला. १९६०मध्ये त्यांचे कुटुंब ब्रिटनला स्थलांतरीत झाले. १९८२मध्ये त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.
  • इशिगुरो यांनी केंट विद्यापीठातून इंग्रजी आणि तत्वज्ञान या विषयात बीएची पदवी संपादन केली. पुढे इस्ट विद्यापीठातून त्यांनी क्रिएटीव्ह रायटिंगमध्ये एमएची पदवी मिळवली.
  • इशिगोरो यांनी आठ पुस्तके लिहीली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सिनेमा आणि टिव्ही कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे.
  • २००५मध्ये जगप्रसिद्ध टाईम या मासिकाने ‘नेव्हर लेट मी गो’ या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट शंभर इंग्रजी लेखकांमध्ये इशिगुरो यांना स्थान दिले होते.
  • याशिवाय २००८मध्ये १९९५ पासूनच्या सर्वोत्कृष्ट ५० ब्रिटिश लेखकांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता.
  • त्यांच्या ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या जगप्रसिद्ध कादंबरीसाठी त्यांना यापूर्वी मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे.
  • गेल्यावर्षी साहित्याचे नोबेल गायक, गीतकार बाब डिलन यांना जाहीर करुन नोबेल समितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
  • ‘गितांजली’साठी रविंद्रनाथ टागोर यांना १९१३साली नोबेल पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले रविद्रनाथ हे एकमेव भारतीय साहित्यिक आहेत.
 इशिगुरो यांच्या कादंबऱ्या: 
  • अ पेले व्ह्यू ऑफ हिल्स (१९८२)
  • अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड (१९८६)
  • द रिमेन्स ऑफ द डे (१९८९)
  • द अनकन्सोल्ड (१९९५)
  • व्हेन वी वेअर ऑर्फन्स (२०००)
  • नेव्हर लेट मी गो (२००५)
  • द ब्युरिड जायंट (२०१५) 

डब्लूएचओच्या उपमहासंचालकपदी डॉ. सौम्या स्वामिनाथन

  • प्रसिध्द भारतीय बालरोगतज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) उपमहासंचालक या अत्यंत जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १४ देशांतील विविध प्रतिनिधींनी डॉ. सौम्या यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या मानाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेत एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय आहेत.
 कोण आहेत डॉ. सौम्या स्वामिनाथन? 
  • भारतीय हरितक्रांतीचे जनक व कृषी वैज्ञानिक डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्या त्या कन्या आहेत.
  • त्या भारतातील नामांकित बाल रोग विशेषज्ञ आहेत. त्यांच्याकडे क्लिनिकल केयर आणि रिसर्च क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव आहे.
  • त्यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएसची पदवी उच्च श्रेणीत संपादन केली.
  • दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना लॉज एन्जेलिस येथील नामांकित रुग्णालयाची फेलोशिप मिळाली.
  • काही वर्षे ब्रिटन, कॅलिफोर्नियामध्ये नोकरी केल्यानंतर संशोधन करण्यासाठी त्या भारतात परतल्या.
  • सर्व जगाला भेडसावणाऱ्या एचआयव्ही आणि क्षयरोग यावर त्यांनी केलेले संशोधन विश्वभरात मान्यता पावलेले आहे.
  • त्यांच्या पुढाकाराने अनेक शहरांतून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची मोहीम राबवण्यात आली व ती यशस्वीही ठरली.
  • सध्या त्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक आहेत. त्या भारतीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिवही आहेत.
  • जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न विविध सल्लागार समित्यांच्या त्या सदस्य आहेत.
  • त्यांनी २००९ ते २०११ दरम्यान यूनिसेफसाठी को-ऑर्डिनेटर म्हणून देखील काम केले आहे.
  • त्यांना लाहिरी सुवर्णपदक, कनिष्का पुरस्कार, इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड सायन्सचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भारतात मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत

  • फोर्ब्ज मॅगझिनने जाहीर केलेल्या भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी सलग दहाव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • या यादीमध्ये अझीम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर लक्ष्मी मित्तल चौथ्या स्थानावर आहेत.
यादीतील पहिले दहा व्यक्ती
क्र. नाव संपत्ती (अब्ज डॉलर)
१. मुकेश अंबानी ३८
२. अझीम प्रेमजी १९
३. हिंदुजा बंधू १८.४
४. लक्ष्मी मित्तल १६.५
५. पालोनजी मिस्त्री १६
६. गोदरेज कुटुंब १४.२
७. शिव नाडर १३.६
८. कुमार बिर्ला १२.६
९. दिलीप संघवी १२.१
१०. गौतम अदानी ११

‘सपा’च्या अध्यक्षपदी पुन्हा अखिलेश यादव

  • अखिलेश यादव यांची एकमताने पुढील पाच वर्षांसाठी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.
  • पक्षावर आपली पकड घट्ट करीत अखिलेश यांनी वडील मुलायमसिंह यादव आणि चुलते शिवपाल यादव यांना बाजूला सारत पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
  • त्यामुळे २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका समाजवादी पक्षाकडून अखिलेश यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा