चालू घडामोडी : ११ ऑक्टोबर

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर

  • ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
  • विद्यमान चेअरमन गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी या वर्षी मार्चमध्ये संपला होता. त्यांची जागा आता अनुपम खेर घेतील.
  • चौहान यांचा अध्यक्षपदाविरोधात विद्यार्थ्यांनी, तेथील शिक्षकांनी आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध केला होता व १३९ दिवसांचा संप पुकारला होता.
  • अनुपम खेर हे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पदवीधर झाले आहेत. सन १९८२मध्ये त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
  • त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी ५००हून अधिक चित्रपट व अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.
  • त्यांचे कर्मा, चायना गेट, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है असे चित्रपट विशेष गाजले होते.
  • यापूर्वी खेर यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक म्हणून आणि ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेंसॉर बोर्ड)चे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
  • चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री (२००४) आणि पद्मभूषण (२०१६) या पुरस्कारांनी गौरवले आहे.

डोकलाम वादाच्या अभ्यासासाठी संसदीय समिती

  • चीनबरोबरचा ७३ दिवसांचा डोकलाम वाद व रोहिंग्या शरणार्थीचा प्रश्न या दोन्ही मुद्दय़ांचा अभ्यास परराष्ट्र खात्याअंतर्गत नेमण्यात आलेली संसदीय समिती करणार आहे.
  • या समितीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश असून, या समितीचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करीत आहेत.
  • या समितीची बैठक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. यात परराष्ट्र धोरणातील अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे.
  • चीन व भारत यांच्यातील सीमा प्रश्न व डोकलाम मुद्दयावरून असलेले वाद, तसेच म्यानमारशी संबंध व रोहिंग्या शरणार्थीचा भारतातील प्रवेशाचा मुद्दा यावर यात विचार केला जाणार आहे.
  • याबरोबरच अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क, युरोपीय समुदायातील ब्रेक्झिटमुळे असलेला पेच तसेच त्याचे भारतावर परिणाम, पासपोर्ट प्रणाली यावरही त्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • भारत व चीन यांच्यात ऑगस्टमध्ये एक समझोता झाला असून त्यानुसार दोन्ही देशांनी सैन्य डोकलाममधून माघारी घेतले आहे.
  • चीनमधील ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार होते त्या आधी चीनने सैन्य माघारी घेतले व तो भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जातो.
  • तरी नंतर पुन्हा चीनने कुरापती काढण्यास सुरूवात केली असून रस्ते बांधणीचे काम पुन्हा सुरू केल्याच्या बातम्या आहेत.

सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी टुंडाला जन्मठेप

  • हरयाणातील सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने टुंडाला दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
  • सोनीपतमध्ये २८ सप्टेंबर १९९६ रोजी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये १२ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचे समोर आले होते.
  • टुंडा हा ‘लष्कर- ए- तोयबा’ या संघटनेचा दहशतवादी असून १९९४ ते १९९८ या कालावधीत दिल्लीसह भारतातील विविध शहरांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये टुंडा सहभागी झाला होता.
  • टुंडाचा एकूण ३३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. त्याच्याविरोधात दिल्लीत २२ तर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ११ खटले प्रलंबित आहेत.
  • दिल्लीत १९९७ साली झालेल्या दोन वेगवेगळ्या बाँबस्फोटांप्रकरणी अब्दुल करीम टुंडाला दोन वर्षांपूर्वी दोषमुक्त करण्यात आले होते.
  • स्फोटके तयार करण्यात पटाईत असलेल्या टुंडाने १९८५मध्ये आयएसआयमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्याला ऑगस्ट २०१३मध्ये दिल्ली पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केली होती.
  • अब्दुल करीम टुंडा हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा निकटचा साथीदार म्हणून ओळखला जातो.

तेलगु नाटककार हरनाथा राव यांचे निधन

  • साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित तेलुगुतील सामर्थ्यशाली लेखक, नाटककार, चित्रपट कथालेखक व अभिनेते एम. व्ही. एस. हरनाथा राव यांचे ९ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
  • आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे २७ जुलै, १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कारकून होते, तर आई सत्यवती देवी यांनी कर्नाटक संगीतात पदविका घेतलेली होती.
  • लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. तिसऱ्या इयत्तेत असताना त्यांनी एका नाटकात काम केले आणि तरुणपणी नाट्यलेखनास सुरुवात केली.
  • चित्रपट निर्माते टी. कृष्णा यांच्या माध्यमातून ते चित्रपट क्षेत्रात आले व सुरुवातीला पटकथा व संवादलेखक म्हणून काम केले. ‘रक्षासुडू’ व ‘स्वयमकृषी’ चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला.
  • त्यांनी ‘प्रतिघटना’, ‘भारत नारी’, ‘अमायी कापूरम’ अशा जवळपास दीडशे चित्रपटांसाठी संवादलेखन करून तेलुगु चित्रपटसृष्टीवर छाप स्वतःची पाडली. एकूणच त्यांचे लेखन हे आधुनिकतेकडे झुकणारे होते.
  • ‘रक्ताबाली’ हे त्यांचे पहिले नाटक चांगलेच गाजले. त्यांच्या ‘कन्यावर सुल्कम’ या नाटकास आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार मिळाला.
  • ‘क्षीरसागर मंथनम’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • आंध्रातील प्रतिष्ठेचा नंदी पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाला होता. आंध्र नाट्य परिषदेच्या स्पर्धेत १९८०मध्ये त्यांच्या ४ नाटकांना २० पुरस्कार मिळाले होते.
  • ‘अंचम कडीडी आरंभम’, ‘यक्षगानम’, ‘रेडलाइट एरिया’, ‘मी परिमिती’, ‘प्रजाकवी वेमना’, ‘जगन्नाथ रथ चक्रालू’ ही त्यांची इतर नाटके.
  • त्यांच्या ‘लेडी चंपिना पुली नेटुरू’ व ‘अरण्य रोदनम’ या दोन नाटकांचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले.
  • राव हे डाव्या विचारसरणीकडे झुकणारे लेखक होते. त्यांनी समकालीन स्त्रियांची पात्रे व्यवस्थेविरोधात बंडखोरी करताना दाखवली.
  • ते एक चांगले नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने या क्षेत्रातील पुरोगामी चळवळीला धक्का बसला आहे.

तृतीयपंथी व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड

  • ट्रान्सजेंडरर्सच्या (तृतीयपंथी) हक्कांसाठी लढणाऱ्या दिल्लीच्या जोइता मंडल या तृतीयपंथीची पश्चिम बंगालमधील इस्लामपूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे.
  • यामुळे शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये या एका नव्या प्रयत्नाची भर पडली आहे.
  • जुलै महिन्यात लोक अदालतीसाठी इस्लामपूरच्या सब डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीतर्फे जोईता मंडल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • याच लोक अदालतीसमोर २०१०साली जोईता यांना त्या ट्रान्सजेंडर असल्याच्या कारणावरून एका हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार देण्यात आला होता व त्यांना रात्र फूटपाथवर काढावी लागली होती.
  • या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी दिली. या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जोईता यांनी मग पुढे तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढा सुरू केला
  • त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांना न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले.
  • ट्रान्स वेल्फेअर इक्विटीच्या संस्थापक अभीना यांच्यामते, या समाजघटकातील एका व्यक्तीला असा मान मिळण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा