चालू घडामोडी : ४ नोव्हेंबर

कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ पुरस्कार

  • साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ५३वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे.
  • साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • आतापर्यंत वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कारकीर्द
  • पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२५ रोजी सोबती यांचा जन्म झाला.
  • सुरुवातीचे शिक्षण दिल्ली व शिमला इथे झाले. पुढे लाहोर येथे उच्चशिक्षण घेत असतानाच भारताची फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून दिल्लीत परतले.
  • आधी राजस्थानच्या सिरोही संस्थानात काही काळ नोकरी केलेल्या सोबती यांनी लवकरच पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले.
  • स्त्रीवादाची चर्चाही नसण्याच्या काळात त्यांनी स्त्रीवादी लेखन केले. त्या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
  • हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
  • कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या जिंदगीनामा, ऐ लडकी, मित्रो मरजानी यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या.
  • नफिसा, सिक्का बदल गया, बादलोंके घेरे, बचपन या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या.
  • त्यांची ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान तक’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी यावर्षीच प्रकाशित झाली आहे.
  • ‘मित्रो मरजानी’ ही कादंबरी त्यांनी १९६६मध्ये लिहिली. या कादंबरीत विवाहित स्त्रीच्या लैंगिक भावनांचे चित्रण होते त्यामुळे ही कादंबरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती.
  • दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेचे लेखनही त्यांनी केले होते.
  • सोबती यांच्या हिंदी लिखाणात पंजाबी आणि उर्दू शब्द सर्रास यायचे. त्यांच्या कादंबरीत किंवा कथांमध्ये सामान्यांना समजेल अशी भाषा आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके आणि कादंबऱ्या गाजल्या.
साहित्यसंपदा
  • डार से बिछुडी, मित्रो मरजानी, यारों के यार, तिन पहाड़, बादलों के घेरे, जैनी मेहरबान सिंह, सूरजमुखी अंधेरे के, जिंदगीनामा, ए लडकी, दिलोदानिश, हम हशमत, समय सरगम इत्यादी
पुरस्कार
  • १९८०मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली आहे.
  • देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून २ वर्षांपूर्वी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार व फेलोशिपही परत केली होती.
  • २०१०मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला.
  • याबरोबरच कृष्णा सोबती यांचा हिंदी अकादमी, दिल्लीने २०००-२००१ या वर्षीचा शलाका पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
  • हिंदी भाषेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या लेखिकेला आता साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे.

स्त्री-पुरुष समानतेत भारताची पीछेहाट

  • स्त्री-पुरुष आर्थिक समानतेत निर्देशांकात भारताची घसरण झाली असून, १४४ देशांत भारत १०८व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी भारत ८७व्या क्रमांकावर होता.
  • ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने (WEF) जारी केलेल्या या जागतिक लैंगिक असमानता निर्देशांकात (ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०१७) भारताचे स्थान यंदा २१ अंकांनी घसरले आहे.
  • या यादीत आइसलँड, नॉर्वे व फिनलँड या देशांनी अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.
  • त्याखालोखाल रवांडा (४), स्वीडन (५), निकाराग्वा (६), स्लोवेनिया (७), आयर्लंड (८), न्यूझीलंड (९) आणि फिलिपिन्स (१०) या देशांनी स्थान पटकाविले आहे.
  • या यादीत भारताची घसरण ही ‘आरोग्य आणि जीवनमान’ आणि ‘महिलांचा आर्थिक सहभाग आणि त्यांना उपलब्ध संधी’ या दोन निर्देशांकांमुळे झाली आहे.
  • स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलाच्या जन्माचा आग्रह आरोग्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष असमानतेत भारत १४१व्या स्थानावर म्हणजे शेवटून चौथा आहे.
  • महिलांच्या आर्थिक सहभागासंबंधातील निर्देशांकात भारत १३६व्या स्थानावरून १३९व्या स्थानावर आला आहे.
  • भारतात कामाचे स्वरूप आणि परिश्रम या दोन्हीत समानता असूनही स्त्रीला कमी मेहनताना मिळतो, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
  • या बाबतीत भारताचे स्थान केवळ प्रचंड लैंगिक विषमता असणाऱ्या इराण, येमेन, सौदी अरेबिया, पाकिस्तान व सीरिया यांच्या वरती आहे.
  • राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक आणि तांत्रिक मनुष्यबळामध्ये महिलांचे प्रमाण वाढण्याची आवश्यकताही नमूद करण्यात आली आहे.
  • या यादीत भारत शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि चीनपेक्षाही मागे आहे. यादीत बांगलादेश ७४व्या स्थानी असून, चीन १००व्या क्रमांकावर आहे. फक्त दक्षिण आशियाचा विचार करता बांगलादेश सर्वात वरच्या स्थानावर आहे.
  • २००६पासून ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जेंडर गॅपचे निकष निर्धारित करून जगभरातील देशांची यादी तयार करण्यास सुरुवात केली. २००७मध्ये जेव्हा पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी भारत ९८व्या क्रमांकावर होता.

वर्ल्ड फूड इंडियाचे दिल्लीमध्ये आयोजन

  • केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे इंडिया गेट येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
  • या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ञ सहभागी झालेले आहेत.
  • ३ दिवसांच्या या प्रदर्शनात महाराष्ट्रासह अन्य राज्येही सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध राष्ट्र तसेच जगभरातील २००० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

डीआरडीओच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी यशस्वी

  • रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणाऱ्या ग्लाइड बॉम्बची डीआरडीओकडून ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे स्मार्ट वेपन डीआरडीओने विकसित केले आहे. या ग्लाइड अस्त्रामुळे भारताची चीन-पाकिस्तानविरोधात क्षमता अधिक वाढणार आहे.
  • हवाई दलाच्या लढाऊ विमानाने ग्लाइड बॉम्ब टाकल्यानंतर या बॉम्बने प्रीसिशन नेवीगेशन सिस्टिमच्या आधारे ७० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
  • हे स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन आहे. ग्लाइन बॉम्बच्या आतापर्यंत घेण्यात आलेल्या तीन चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.
  • २०१३मध्ये अशा प्रकारचा बॉम्ब विकसित करायला मंजुरी मिळाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात डीआरडीओने जॅग्वार विमानातून या बॉम्बची पहिली चाचणी केली होती.
  • ग्लाइड बॉम्बचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा बॉम्ब ठरलेल्या टार्गेटवर वरुन टाकावा लागत नाही. काही अंतरावरुन डागल्यानंतरही हा बॉम्ब शत्रूच्या तळांचा अचूक वेध घेतो.
  • जागतिक महायुद्धामध्ये सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर झाला होता. आता नवीन बदलांमुळे हे अस्त्र अधिक प्रभावी बनले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा