चालू घडामोडी : ७ नोव्हेंबर

भारताच्या निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

  • भारताने स्वदेशी बनावटीची आणि दूरपर्यंत मारा करणारी ‘निर्भय’ या सुपर सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राच्या यापूर्वी झालेल्या ४ पैकी फक्त १ चाचणी यशस्वी झाली होती.
  • या क्षेपणास्त्राची १३ मार्च २०१३ रोजी पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी ती अयशस्वी ठरली होती. नंतर १७ मार्च २०१४ रोजी दुसरी चाचणी यशस्वी झाली.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूरच्या चाचणी केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.
  • या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून २०० ते ३०० किलोग्रॅमपर्यंत युद्धसामग्री घेऊन जाता येणार आहे. १ हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना हे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते.
  • या टू स्टेज क्षेपणास्त्राची लांबी ६ मीटर व रुंदी ०.५२ मीटर आहे. या क्षेपणास्त्राचे पंख २.७ मीटरपर्यंत पसरतात. या क्षेपणास्त्राचे वजन १५०० किलो असून, त्याचा वेग ०.६ ते ०.७ मॅक इतका आहे.
  • आण्विक क्षमतेने सुसज्ज अशा या क्षेपणास्त्रामध्ये लक्ष्य अचूक भेदण्यासाठी उच्च दर्जाची स्वदेशी दिशादर्शक प्रणाली असून ती आरसीआयने तयार केली आहे.
  • या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक संगणकीय प्रणालीही बसवण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणादरम्यान संगणकाच्या कमांडनुसार क्षेपणास्त्राचे पंख खुलतात.
  • हे क्षेपणास्त्र टबरेफॅन व टबरेजेट इंजिनसह चालते. क्षेपणास्त्राचे रॉकेट बूस्टर अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम लॅबोरेटरी यांनी तयार केले आहे.

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताला २० पदके

  • ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतासाठी सत्येंद्र सिंगने सुवर्ण आणि संजीव राजपूतने रौप्यपदक जिंकून दिले.
  • सत्येंद्र सिंग आणि संजीव राजपूत या दोघांनीही पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकारात पदके मिळवली.
  • ५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत सत्येंद्रने ४५४.२ गुण मिळवले. एका गुणाच्या फरकाने राजपूत (४५३.३ गुण) दुसऱ्या स्थानी राहिला.
  • या दोन पदकांसह भारताची या स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या २०वर गेली आहे. त्यात ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • या स्पर्धेतील भारताचे सुवर्णपदक विजेते नेमबाज:-
    • हिना सिधू (महिला १० मीटर एअर पिस्तूल)
    • पूजा घाटकर (महिला १० मीटर एअर रायफल)
    • अंकुर मित्तल (डबल ट्रॅप)
    • शाहझार रिझवी (१० मीटर एअर पिस्तूल)
    • प्रकाश नंजप्पा (५० मीटर पिस्तूल)
    • सत्येंद्र सिंग (५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स)

भारतामधील महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता

  • भारतामधील १५ ते ४९ वयोगटातील ५१ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याची माहिती ‘जागतिक पोषण आहार २०१७’ या अहवालातून समोर आले आहे.
  • गेल्यावर्षी याच अहवालानुसार, भारतात हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या महिलांचे प्रमाण ४८ टक्के होते. यंदा ते ३ टक्क्यांनी वाढून ५१ टक्के झाले आहे.
  • भारतासह १४० देशांमधील महिला आणि मुलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या आधारे, कुपोषणाच्या समस्येवर भाष्य करणारा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • या सर्वेक्षणात समाविष्ट असलेले तीन महत्वाचे मुद्दे म्हणजे
    • अविकसित आणि कुपोषित मुलांचे प्रमाण.
    • माता होण्याच्या काळात महिलांमध्ये दिसून येणारी रक्ताच्या कमतरतेची समस्या.
    • अधिक वजन असलेल्या वयोवृद्ध महिला.
 अहवालातील ठळक मुद्दे 
  • ५ वर्षांखालील ३८ टक्के मुलांची योग्य पद्धतीने वाढ झालेली नाही.
  • पोषक आहार न मिळाल्याने मुलांची उंची कमी राहण्याचे प्रमाणही जास्त.
  • पोषक आहाराअभावी मुलांच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम.
  • ५ वर्षांखालील जवळपास २१ टक्के मुलांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचे वजन कमी आहे म्हणजेच त्यांचा बॉडी मास इंडेक्स अयोग्य.
  • माता होण्याच्या वयातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता.
  • २२ टक्क्यांहून अधिक वयोवृद्ध महिलांचे वजन अधिक.
  • मागील वर्षी मे महिन्यात जिनेव्हा येथे जागतिक आरोग्य सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या १४० देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
  • नुकताच ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या वॉशिंग्टनस्थित संस्थेद्वारा ‘जागतिक भूक अहवाल २०१७’ प्रकाशित झाला.
  • त्यातही ११९ देशांच्या क्रमवारीत भारताची क्रमवारी गेल्या तीन-चार वर्षांत लक्षणीयरित्या घसरली असून, भारत आता १००व्या स्थानावर गेला आहे.
  • या यादीमध्ये भारताचे शेजारी असणाऱ्या चीन (२९), नेपाळ (७२), म्यानमार (७७), श्रीलंका (८४), बांगलादेश (८८) या देशांची स्थिती भारताहून खूप चांगली आहे.

दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर

  • दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संस्थेकडून (आयएमए) राज्यात ‘सार्वजिक आरोग्य आणीबाणी’ लागू करण्यात आली.
  • ‘आयएमए’ने दिल्लीतील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा बंद ठेवाव्यात, असेही ‘आयएमए’ने सांगितले आहे.
  • त्यामुळे दिल्लीतील १९ नोव्हेंबरची नियोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची विनंतीही ‘आयएमए’कडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आली आहे.
  • इंडिया गेट आणि राजपथसह दिल्लीतील प्रमुख ठिकाणी करण्यात आलेल्या पाहणीत येथील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे दिसून आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा