चालू घडामोडी : २ डिसेंबर

सिंगापूरचा चांगी नाविक तळ भारताला वापरासाठी खुला

  • दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे.
  • भारत व सिंगापूर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेनंतर या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • एकमेकांना वाहतुकीमध्ये सहकार्य, दोन्ही देशांच्या सागरी सीमांमध्ये पहारा तसेच एकमेकांना मदत करणे या करारामुळे शक्य होणार आहे.
  • मलाक्काच्या सामुद्रधुनीमधून चीन तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो. चीनचे येथील महत्त्व कमी करण्यासाठी या सामुद्रधुनीमध्ये भारत व सिंगापूरने अधिकाधिक वावर वाढवावा अशी इच्छाही सिंगापूरने व्यक्त केली आहे.
  • चीनच्या आग्नेय आशिया आणि दक्षिण चीन समुद्रातील हालचालींना यामुळे शह दिला जाणार आहे.
  • सिंगापूरच्या पूर्वेस २००४ साली हा नाविक तळ उभारण्यात आला. या तळाचे क्षेत्रफळ १.२८ चौकिमी असून तो समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला आहे.
  • हा नाविक तळ चांगी हवाई तळापासून केवळ १.५ किमी अंतरावर व चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३.५ किमी अंतरावर आहे.

इन्फोसिसचे नवे सीईओ व एमडी सलील पारेख

  • माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नियुक्ती केली आहे.
  • या नियुक्तीमुळे दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी पदासाठी सुरु असलेला शोध संपला आहे. पारेख यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. २ जानेवारीपासून ते पदभार स्वीकारतील.
  • सध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी ‘कॅपजेमीनी’ या कंपनीत ग्रुप कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
  • त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.
  • त्यांनी मुंबई आयआयटीमधून अॅरोनॉटिकल इंजिनियरींमध्ये बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक)चे शिक्षण घेतले आहे.
  • कंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेणी हे इन्फोसिसच्या गैर कार्यकारी अध्यक्ष पदावरच कायम राहणार आहेत. 
  • तर सध्या कंपनीचे हंगामी सीईओ असलेले यू बी प्रवीण राव सलील पारेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) असतील.
  • सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
  • याच वर्षी ऑगस्ट महिन्यात विशाल सिक्का यांनी एन आर नारायण मूर्तीसह इतर संस्थापक सदस्यांशी मतभेद झाल्यानंतर एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.

न्या. ताहिलरमाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर ५ डिसेंबर रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्यानंतर या पदावर अन्य कोणाची नियुक्ती होईपर्यंत न्या. विजया ताहिलरमाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील.
  • न्या. ताहिलरमाणी तिसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत.
  • मुख्य न्या. मोहित शहा निवृत्त झाल्यानंतर न्या. ताहिलरमाणी यांनी २०१५मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीश पद सांभाळले होते.
  • त्यानंतर मुख्य न्या. डी. एच. वाघेला २०१६मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी काही महिने उच्च न्यायालयाचा कारभार सांभाळला.
  • मुख्य न्यायाधीश चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांच्यापूर्वी न्या. सुजाता मनोहर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी वर्णी लागली होती.
  • २६ सप्टेंबर २०१२मध्ये न्या. चेल्लूर यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली.
  • त्यानंतर त्यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात झाली. गेले १५ महिने त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.

‘हंगर’ माहितीपटाला जागतिक दर्जाचा पुरस्कार

  • योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • २७ जानेवारी २०१८ला अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव ‘हंगर’ या लघू माहितीपटातून योगिनी सुर्वे यांनी जगासमोर मांडले आहे.
  • पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात भुकेने मृत्युमुखी पडत असलेल्या बालकांचे प्रमाण भयावह आहे. देशात कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्युंमध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे.
  • या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन योगिनी सुर्वे यांनी केले आहे. विशाल वासू लघुपटाचे निर्माते आहेत.
  • कौशल गोस्वामी यांनी लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. तर उमेश ढोबळे यांनी लघुपटाचे एडिटिंग केले आहे.
  • या लघुपटाला आजवर ६ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
  • आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव न्यूयॉर्क आणि हॉलीवूड इंटरनॅशनल मूव्हीज फिल्म फेस्टिव्हल या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या महोत्सवातही या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत.

जपानचे राजे अखिहितो यांची निवृत्तीची घोषणा

  • जपानचे राजे अखिहितो यांनी तब्येतीच्या कारणामुळे ३० एप्रिल २०१९ रोजी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यापुर्वी त्यांनी इम्पिरियल कौन्सीलशी चर्चाही केली आहे. 
  • जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ २०० वर्षांनंतर येत आहे.
  • जून महिन्यात जपानी संसदेने राजाला पदाचा त्याग करण्याची परवानगी देणारा ठराव मंजूर केला होता.
  • जपानच्या राजघराण्याच्या २६०० वर्षांच्या इतिहासामध्ये पदत्याग करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण गेल्या २०० वर्षांमध्ये कोणत्याही राजाने पदत्याग केलेला नव्हता.
  • जपानचे याआधीचे सम्राट हिरोहितो आणि त्यांची पत्नी नागाको यांच्या पोटी अखिहितो यांचा १९३३साली जन्म झाला.
  • अखिहितो यांच्यावर कर्करोगासाठी उपचार सुरु आहेत त्याचप्रमाणे त्यांची हृदय शस्त्रक्रीयाही झाली आहे.
  • सुमारे ३० वर्षे राजसत्तेवरुन काम केल्यावर अखिहितो यांनी गेल्या वर्षी तब्येतीचे व वाढत्या वयाचे कारण सांगून निवृत्तीचे संकेत दिले होते.
  • अखिहितो यांचे ज्येष्ठ पुत्र राजपुत्र नारुहितो आता राजगादीवर बसतील. नारुहितो हे ५७ वर्षांचे आहेत.
  • जपानचे पंतप्रधान: शिंजो अबे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा