चालू घडामोडी : ४ डिसेंबर

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

  • ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
  • १९८४मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांची तब्येतही सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
  • शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकातामध्ये झाला होता. त्यांनी १९४०मध्ये बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
  • त्यांनी आतापर्यंत १६० सिनेमांमध्ये काम केले. त्यात १४८ हिंदी आणि १२ इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे.
  • निर्माते म्हणून त्यांनी जुनून (१९७८), कलियुग (१९८०), ३६ चौरंगी लेन (१९८१), विजेता (१९८२), उत्सव (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली.
  • ६० आणि ७०च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले.
  • फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.
  • २०११मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच २०१५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

  • भारताने इराणमध्ये विकसित केलेल्या चाबहार या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले.
  • या बंदरामुळे पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापारासाठी वाहतुकीचा नवा मार्ग खुला होणार आहे.
  • तसेच या बंदरामुळे मध्य आशियातील देशांशी व्यापारही आता वेगाने आणि अधिक सुकर होणार आहे.
  • या प्रकल्पाचा करार १५ वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता.
 चाबहारचे महत्त्व 
  • इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त ठरणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्यासाठी चाबहार बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
  • भारताने गतवर्षी या बंदराच्या विकासासाठी ५०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यातून चाबहार बंदराचा विस्तार करण्यात येत आहे. 
  • या बंदराची माल हाताळण्याची क्षमता पूर्वी वर्षांला २.५ दशलक्ष टन इतकी होती. आता ती वर्षांला ८.५ दशलक्ष टन इतकी वाढवण्यात आली आहे.
  • चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल.
  • चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
  • चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
  • त्याचप्रमाणे रशिया, युरोप, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत आता पोहोचू शकेल.
  • अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे.
  • चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा