चालू घडामोडी : १४ डिसेंबर

एडीबीने भारताच्या विकास दराचा अंदाज खालावला

  • नोटाबंदी, वस्तू व सेवा कर या आव्हानाबरोबरच कृषी क्षेत्रातील जोखीम गृहीत धरून आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज खालावला आहे.
  • आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने चालू आर्थिक वर्षांत देशाच्या प्रगतीचा दर आता ६.७ टक्के असेल, असे नमूद केले आहे. बँकेचा यापूर्वीचा अंदाज ७ टक्के होता.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर २०१८मध्ये पुन्हा उचल खाण्याची शक्यताही विकास दर अंदाज खुंटविण्यास निमित्त ठरली आहे.
  • आशियाई विकास बँकेने २०१८-१९ या पुढील वित्त वर्षांतील भारताच्या विकास दराचा अंदाजही आधीच्या ७.४ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
  • गेल्या वर्षांतील नोटाबंदी, चालू वित्त वर्षांच्या मध्यापूर्वी लागू झालेली नवी अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे अर्थव्यवस्था तूर्त सावरणे अवघड असल्याचे बँकेने म्हटले आहे.
  • आशियाई विकास बँकेपूर्वी जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकास दराचा अंदाज आधीच्या ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.
  • फिच, मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी यापूर्वीच भारताच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

  • प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे १४ डिसेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.
  • गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते.
  • सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणूनही काम केले. केतन मेहता यांच्या होली (१९८४) चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
  • हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तूम, दौड या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तर खिलाडी ४२०, फिर हेराफेरी या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
  • विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत, कंपनी या सारख्या सिनेमांमध्येही काम केले. २०१५मध्ये आलेला ‘वेलकम बॅक’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

आयओए अध्यक्षपदी नरिंदर बात्रा

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.
  • सरचिटणीस पदासाठी राजीव मेहता हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून पुढील ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी ते या पदावर कार्य करतील.
  • कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी आर के आनंद यांची निवड झाली आहे.
  • या निवडणुकीआधी वकील राहुल मेहरा यांनी ही निवडणूक केंद्राच्या क्रीडा आचारसंहितेनुसार होत नसल्याची याचिका केली होती व निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
  • पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. आता ही निवडणूक क्रीडा आचारसंहितेनुसार घेतली आहे की नाही, हे न्यायालयातच स्पष्ट होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा