चालू घडामोडी : ३१ जानेवारी

झारखंडचे माजी मंत्री हरी नारायण राय यांना शिक्षा

  • झारखंडमधील माजी मंत्री हरी नारायण राय यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ५ लाख रुपयांचा दंड आणि सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
  • आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) शिक्षा झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
  • ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी पीएमएल कायद्यातील कलम ३ अंतर्गत राय यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
  • राय यांनी न्यायालयाने ठोठावलेली दंडाची रक्कम भरली नाही तर त्यांच्या शिक्षेमध्ये आणखी अठरा महिन्यांची वाढ होऊ शकते.
  • सप्टेंबर २००९मध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उजेडात आणले होते.
  • याप्रकरणात काही जणांना अटकही झाली होती. तसेच शंभर कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
  • मधू कोडा यांच्या मंत्रिमंडळात राय हे २००५ ते २००८दरम्यान पर्यटन, नगरविकास आणि वनखात्याचे मंत्री होते.
  • भारतात २००२मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ॲक्ट) मांडण्यात आला होता. २००५ मध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाली होती.
  • यानंतर काळा पैसा आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास पीएमएलए कायद्यांतर्गत केला जातो.

१०००पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय देण्याची योजना

  • केंद्र सरकारने देशातील १०००पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे.
  • डिजीटल इंडिया आणि रोकड विरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार ही योजना लागू करणार आहे.
  • तसेच वाय-फाय मुळे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना संपर्काचे साधन उपलब्ध होईल असाही उद्देश या योजनेमागे आहे.
  • सुरुवातीला ही योजना १०५० गावांमध्ये राबवली जाईल. नंतर हळुहळु या योजनेचा विस्तार केला जाईल.
  • ग्लोबल टेक फर्म आणि भारतीय इंटरनेट प्रोवाइडर या कंपन्यांशी भागीदारी करुन खेड्यातील लोकांना ही सुविधा पुरवली जाऊ शकते.
  • नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावर डिजीटल व्यवहार हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे सरकारला जाणवले आहे.
  • त्यानंतर रोख रहित व्यवहारांना प्रात्साहन देण्यासाठी अनेक योजनाही सरकारने राबिविल्या आहेत. मोफत वाय फायची योजना सर्वप्रथम महाराष्ट्रातच राबवली गेली आहे.
  • मुंबईमध्ये एकूण ५०० ठिकाणी हॉटस्पॉट सुविधा देण्यात आली आहे. गुगलने मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशन्सवर मोफत वाय-फायची सुविधा सुरू केली आहे.

एच वन-बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर

  • अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन-बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर करण्यात आले.
  • ‘हाय-स्किल्ड इंटेग्रिटी अँड फेअरनेस अ‍ॅक्ट २०१७’ असे या विधेयकाचे नाव असून, अमेरिकी नागरिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.
  • या प्रस्तावित विधेयकात एचवन बी व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन १,३०,००० डॉलर्स करण्याची तरतूद केली आहे.
  • एचवन बी व्हिसासाठीची सध्याची किमान वेतनमर्यादा ६० हजार डॉलर्स इतकी आहे. १९८९ साली याबद्दलचे निकष ठरविण्यात आले होते.
  • यामुळे आयटी कंपन्यांकडून स्वस्त मनुष्यबळाचा पर्याय म्हणून करण्यात येणाऱ्या परदेशी नोकरदारांच्या आयातीला आळा बसणार आहे.
  • याचा मोठा फटका माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या भारतासह इतर देशांना बसणार आहे.
  • भारतातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीत ६० टक्के वाटा अमेरिकेचा आहे. तसेच भारतीय आयटी कर्मचाऱ्यांचा अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या विकासात सहभाग आहे.
  • त्यामुळे या निर्णयाचा भारतीय कर्मचाऱ्यांसह अमेरिकन बाजारपेठेवरही परिणाम होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
  • अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रंप हे धर्म आणि पंथाच्या आधारे लोकांत भेदभाव करीत असल्याची टीका केली आहे.

ऑपरेशन क्लीन मनी

  • नोटाबंदीनंतर जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना प्राप्तिकर खात्यातर्फे चौकशीची वाटत असलेली चिंता दूर करण्यासाठी सरकारने “ऑपरेशन क्लीन मनी” सुरू केले आहे.
  • यामध्ये संबंधित खातेधारकांकडे प्राप्तिकर खात्यातर्फे प्रत्यक्ष अधिकारी पाठवून चौकशी करण्याऐवजी ऑनलाइन पडताळणी केली जाईल.
  • त्याशिवाय ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बॅंक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमांचे ई-व्हेरिफिकेशन करण्याचा समावेश यात आहे.
  • प्राप्तिकर खात्याने पहिल्या टप्प्यामध्ये १८ लाख खातेधारकांची यादी तयार केली आहे. त्यांचे ई-व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.
  • या खातेधारकांचा करदाता म्हणून प्राप्तिकर खात्याकडे असलेला तपशील आणि जमा केलेल्या रोखीचा तपशील विसंगत असल्याचे आढळून आले आहे.
  • याबाबतची माहिती incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर संबंधित ‘पॅन’धारकाला लॉग-इन केल्यानंतर मिळू शकेल.
  • तसेच, संबंधित करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन खुलासाही करता येईल. मात्र, दहा दिवसांच्या आत पोर्टलवर हा खुलासा करणे बंधनकारक आहे.

ट्रम्प यांना विरोध करणारे अधिकारी निलंबित

  • अमेरिकेत ७ देशांमधील मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणाऱ्या प्रभारी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांना निलंबित आले आहे.
  • येट्स यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचा न्यायालयात बचाव करण्यास नकार दिला होता. त्यामुळे व्हाईट हाऊसने त्यांच्याजागी डाना बोएंतो यांची नियुक्ती केली.
  • याशिवाय अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक डॅनियल रॅग्सडेल यांनाही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदावरून काढून टाकले आहे.
  • त्या पदावर अध्यक्ष ट्रम्प यांनी थॉमस डी. होमन यांची नियुक्ती केली आहे. स्थलांतर बंदीविषयीच्या आदेशावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरच रॅग्सडेल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • ट्रम्प यांनी सर्व शरणार्थीना अमेरिकेत १२० दिवसांसाठी बंदी घातली असून सीरियन निर्वासितांना तर अमर्याद काळासाठी बंदी घातली आहे.
  • इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या सात  मुस्लीम देशातील व्यक्तींना ९० दिवस प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
  • ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा जगभरातून तसेच अमेरिकेतून निषेध होत आहे.  तसेच याविरोधात अमेरिकेत आंदोलनही सुरु आहे.

‘पॅक-मॅन’चे जनक मसाया नाकामुरा यांचे निधन

  • ‘पॅक-मॅन’ या लोकप्रिय गेमचे जनक मसाया नाकामुरा यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले.
  • १९५५मध्ये नाकामुरा यांनी ‘नाकामुरा अ‍ॅम्युजमेंट मशीन्स’ (नॅम्को) ही करमणूकीचे गेम्स उत्पादन करणारी कंपनी सुरू केली.
  • नाकामुरा यांच्या नेतृत्वाखाली १९७० ते १९८०च्या दशकात नॅम्को ही जगातील तिसरी सर्वात मोठी व्हिडीओ गेम्स तयार करणारी कंपनी बनली.
  • नाकामुरा यांनी १९८०मध्ये पॅक-मॅन या गेमची निर्मिती केली. यामुळे त्यांची ओळख पॅक-मॅनचे जनक म्हणून बनली.
  • त्यांनी विकसित केलेला हा पॅक-मॅन गेम आजही जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गेम्सपैकी एक आहे.
  • २००२मध्ये नाकामुरा यांनी कंपनीच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे सोडली आणि कंपनीचे सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 
  • गेमिंगची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने २००३मध्ये कंपनीने चित्रपटनिर्मितीतही प्रवेश केला.
  • बंदाई या कंपनीला २००५मध्ये भांडवल विकल्याने ही कंपनी ‘बंदाई नॅम्को’ या नावाने ओळखली जाऊ लागली. 
  • त्यांच्या कामाची दखल घेऊन २००७ मध्ये जपान सरकारने त्यांना ‘रायझिंग सन ऑर्डर’ हा सन्मान देऊन गौरविले.

चालू घडामोडी : ३० जानेवारी

बीसीसीआय अध्यक्षपदी विनोद राय

  • सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांची नियुक्ती केली आहे.
  • तसेच रामचंद्र गुहा, डायना एडलजी आणि विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या चार सदस्यीय प्रशासकीय समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डायना एडलजी या भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आहेत तर विक्रम लिमये हे आयडीएफसीचे अध्यक्ष आहेत.
  • रामचंद्र गुहा इतिहासकार व स्तंभलेखक म्हणून देशभरात ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे गांधीनंतरचा भारत हे गाजलेले पुस्तक आहे.
  • पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि क्रिकेट या विषयात त्यांचा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने या प्रशासकीय समितीच्या सदस्यरूपात क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना सहभागी करून घेण्याची केंद्र सरकारची मागणी फेटाळली आहे.
  • न्यायालयाने बीसीसीआयमध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पद न सांभाळण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयासंदर्भात हा निर्णय दिला आहे.
  • तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी न्यायालयाने आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांची नियुक्ती केली आहे.
 पार्श्वभूमी 
  • सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारीला अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन तर अजय शिर्के यांना सचिवपदावरुन हटवले होते.
  • न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत वारंवार चालढकल केल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.
 विनोद राय 
  • ते १९७२च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००८ ते २०१३ पर्यंत ते भारताचे ११वे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) राहिले आहेत.
  • दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर लोकप्रशासन विषयात हॉवर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
  • त्यांच्या कार्यकाळातच टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळा बाहेर आला.
  • वर्ष २०१६मध्ये नागरी सेवेत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते रेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे मानद सल्लागारही आहेत.

फ्रान्सची आयरीस मिटेनेअर ‘मिस युनिव्हर्स’

  • फिलिपीन्समध्ये झालेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत फ्रान्सची सुंदरी आयरीस मिटेनेअरने २०१६चा 'मिस युनिव्हर्स किताब मिळविला.
  • या स्पर्धेत मिस हैती राक्वेल पेलिसीएरने दुसरे, तर मिस कोलंबिया अॅँड्रिया तोवारने तिसरे स्थान पटकावले.
  • ‘मिस युनिव्हर्स’च्या या ६५व्या जागतिक स्पर्धेत एकूण ८६ देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता.
  • आयरीस ही दंतवैद्यक शास्त्राची विद्यार्थिनी आहे. तिने यापूर्वी ‘मिस फ्रान्स’ हा किताब मिळविलेला आहे.
  • या स्पर्धेत रोश्मिता हरिमूर्ती भारताचे प्रतिनिधीत्व करत होती. परंतु तिला अंतिम १३मध्ये स्थान मिळविता आले नाही.
 मिस युनिव्हर्स 
  • मिस युनिव्हर्स ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा मानली जाते.
  • मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
  • १९५२साली कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली.
  • आजवर सुष्मिता सेन (१९९४) व लारा दत्ता (२०००) ह्या दोन भारतीय सुंदरींनी ही स्पर्धा जिंकली आहे.
  • पिया वुर्त्झबाख (फिलिपिन्स) हिने २०१५ची तर पॉलिना व्हेगा (कोलंबिया) हिने २०१४ची मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ

  • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचा शुभारंभ झाला असून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे.
  • भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची (आयआयपीबी) स्थापना करण्यात आली आहे.
  • माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची ही संकल्पना होती. या बॅंकांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येऊ शकेल.
  • भारती एअरटेल आणि पेटीएम या दोन कंपन्यानंतर आयआयपीबी ही तिसरी संस्था आहे जी पैसे ठेवीच्या रुपाने स्वीकारू शकते. परंतु या बॅंका कर्ज देऊ शकणार नाहीत.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे हंगामी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे ए. पी. सिंह आहेत. ते निर्गुंतणूक विभागाचे सह सचिव होते.
  • २०१५मध्ये आरबीआयने ११ संस्थांना पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती.
  • त्यापैकी टेक महिंद्रा, सन फार्मा, आयडीएफसी, टेलेनॉर, चोलामंडलम इनवेस्टमेंट फायनान्स अॅंड कं. या कंपन्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.
  • तर पेटीएम, भारती एअरटेल आणि आयआयपीबीने मात्र पेमेंट बँका सुरु केल्या आहेत.
  • आदित्या बिरला, फिनो पे टेक, नॅशनल सेक्युरिटीज डिपॉजिटरी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडस, व्होडाफोन एम-पेसा या कंपन्या पेमेंट बँक स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत.

रिलायन्स डिफेन्सला संरक्षण मंत्रालयाचे ९१६ कोटींचे कंत्राट

  • संरक्षण मंत्रालयाकडून ‘रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग'ला ९१६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
  • या कंत्राटाअंतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी १४ 'फास्ट पेट्रोल वेसल्स' तयार करण्यात येणार आहेत.
  • रिलायन्स डिफेन्स ही पूर्णपणे रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चरच्या मालकीची उपकंपनी आहे.
  • भारतीय सशस्त्र दलाचे एवढे मोठे कंत्राट ‘रिलायन्स डिफेन्स'च्या रुपाने प्रथमच खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळाले आहे.

आयएनएसव्ही तारिणी विश्वसंचारासाठी सज्ज

  • भारतीय नौदलाचे ५६ फुट उंच असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे.
  • फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते विश्वसंचार मोहिमेला सुरुवात करणार आहे.
  • या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असून कॅप्टन वर्तिका जोशी यांच्याकडे या महिला टीमचे नेतृत्व आहे.
  • विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती.
  • आयएनएसव्ही तारिणीचे बांधणीचे काम अ‍ॅक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ११ महिन्यांत पूर्ण केले. यासाठी ४ कोटींचा खर्च आला आहे.
 आयएनएस म्हादई 
  • भारतीय नौदलाचे पहिले प्रशिक्षण जहाज असलेल्या म्हादईने गेल्या आठ वर्षांत २ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.
  • ते १२ फेब्रुवारी २००९ रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. म्हादईने दोनदा एकल पृथ्वी प्रदक्षिणा, तीन वेळा रिओ रेसमध्ये सहभाग, आग्नेय आशिया मोहीम, मॉरिशस मोहीम यशस्वी केली होती.

पद्म पुरस्कार २०१७

  • दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
  • कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
  • यंदाच्या पुरस्कारविजेत्या ८९ जणांमध्ये ७ जणांना पद्मविभूषण, ७ जणांना पद्मभूषण तर ७५ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 
  • या ८९ जणांमध्ये १९ महिला असून ५ जण परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाचे आहेत. तर ६ जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत.
  • यावर्षी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे ८ पद्म पुरस्कार मिळाले असून, गुजरात, कर्नाटक व तामिळनाडूला ७, तर केरळ, तेलंगण आणि उत्तर प्रदेशला प्रत्येकी ६ पुरस्कार मिळाले आहेत.
  • पद्मविभूषण: हा भारतरत्ननंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
  • पद्मभूषण: हा भारतरत्न व पद्मविभूषण पुरस्कानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 
  • पद्मश्री: हा भारतरत्न, पद्मविभूषण व पद्मभूषण पुरस्कानंतर देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
  • या तिन्ही पुरस्कारविजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात येते.

पद्म पुरस्कार २०१७ यादी


पद्मविभूषण
नाव क्षेत्र राज्य
श्री. के जे येसूदास कला (संगीत) केरळ
श्री सद्गुरू जग्गी वासूदेव इतर (अध्यात्म) तामिळनाडू
श्री शरद पवार लोकसेवा महाराष्ट्र
श्री मुरली मनोहर जोशी लोकसेवा उत्तर प्रदेश
प्रा उडुपी रामचंद्र राव विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक
श्री सुंदरलाल पटवा (मरणोत्तर) लोकसेवा मध्यप्रदेश
श्री पी ए संगमा (मरणोत्तर) लोकसेवा मेघालय

पद्मभूषण
नाव क्षेत्र राज्य
श्री विश्व मोहन भट कला (संगीत) राजस्थान
प्रा. डॉ. देवीप्रसाद द्विवेदी साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश
श्री तेहेमतों उडवडिया वैद्यकीय महाराष्ट्र
श्री रत्न सुंदर महाराज इतर (अध्यात्म) गुजरात
स्वामी निरंजन नंदा सरस्वती इतर (योगा) बिहार
राजकुमारी महाचक्री सिरिंधोरण (विदेशी) साहित्य व शिक्षण थायलंड
श्री चो रामास्वामी (मरणोत्तर) साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) तामिळनाडू

पद्मश्री
नाव क्षेत्र राज्य
श्रीमती बसंती बिश्त कला (संगीत) उत्तराखंड
श्री चेमनचारी कुन्हीरामन नायर कला (नृत्य) केरळ
श्रीमती अरुणा मोहंती कला (संगीत) ओडिशा
श्रीमती भारती विष्णूवर्धन कला (चित्रपट) कर्नाटक
श्री साधू मेहेर कला (चित्रपट) ओडिशा
श्री टी के मूर्ती कला (संगीत) तामिळनाडू
श्री लैश्राम बिरेंद्रकुमार सिंग कला (संगीत) मणिपूर
श्री कृष्णराम चौधरी कला (संगीत) उत्तर प्रदेश
श्रीमती बाओवा देवी कला (चित्रकारिता) बिहार
श्री तिलक गीताई कला (चित्रकारिता) राजस्थान
डॉ. प्रा. अएक्का याडगिरी राव कला (शिल्पकला) तेलंगणा
श्री जितेंद्र हरिपाल कला (संगीत) ओडिशा
श्री कैलाश खेर कला (संगीत) महाराष्ट्र
श्रीमती प्रसल्ला बी पोनामल कला (संगीत) केरळ
श्रीमती सुकरी बोम्मागौडा कला (संगीत) कर्नाटक
श्री मुकुंद नायक कला (संगीत) झारखंड
श्री पुरुषोत्तम उपाध्याय कला (संगीत) गुजरात
श्रीमती अनुराधा पौडवाल कला (संगीत) महाराष्ट्र
श्री वारेप्पा नबा निल कला (नाट्यक्षेत्र) मणिपूर
श्री त्रिपुरानेणि हनुमान चौधरी नागरी सेवा तेलंगणा
श्री टी के विश्वनाथन नागरी सेवा हरियाणा
श्री कनवल सिब्बल नागरी सेवा दिल्ली
श्री बिरखा बहादूर लिंबू मुरिन्गला साहित्य व शिक्षण सिक्कीम
श्रीमती एली अहमद साहित्य व शिक्षण आसाम
डॉ नरेंद्र कोहली साहित्य व शिक्षण दिल्ली
प्रा जी वेंकट सुबय्या साहित्य व शिक्षण कर्नाटक
श्री अक्कीथम अच्युतम नंबुथिरी साहित्य व शिक्षण केरळ
श्री काशी नाथ पंडिता साहित्य व शिक्षण जम्मू काश्मीर
श्री चामूं कृष्ण शास्त्री साहित्य व शिक्षण दिल्ली
श्री हरिहर कृपालू त्रिपाठी साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश
श्री मायकेल डॅनींनो साहित्य व शिक्षण तामिळनाडू
श्री पुर्णम सूरी साहित्य व शिक्षण दिल्ली
श्री व्ही जी पटेल साहित्य व शिक्षण गुजरात
श्री व्ही कोटेश्वरम्मा साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश
श्री बलबीर दत्त साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) झारखंड
श्रीमती भावना सोमय्या साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) महाराष्ट्र
श्री विष्णू पंड्या साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) गुजरात
डॉ सुब्रतो दास वैद्यकीय गुजरात
डॉ श्रीमती भक्ती यादव वैद्यकीय मध्य प्रदेश
डॉ मोहम्मद अब्दुल वाहिद वैद्यकीय तेलंगणा
डॉ मदन माधव गोडबोले वैद्यकीय उत्तर प्रदेश
डॉ देवेंद्र दयाभाई पटेल वैद्यकीय गुजरात
प्रा हरिकिशन सिंग वैद्यकीय चंदीगड
डॉ मुकुट मिन्झ वैद्यकीय चंदीगड
श्री अरुण कुमार शर्मा पुरातत्वशास्त्र छत्तीसगड
श्री संजीव कपूर स्वयंपाकशास्त्र महाराष्ट्र
श्रीमती मीनाक्षी अम्मा मार्शल आर्ट केरळ
श्री गेनाभाई दर्गाभाई पटेल कृषी गुजरात
श्री चंद्रकांत पाठवा विज्ञान आणि तंत्रज्ञान तेलंगणा
प्रा अजयकुमार रे विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल
श्री चिंतकांडी मल्लेशम विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश
श्री जितेंद्र नाथ गोस्वामी विज्ञान आणि तंत्रज्ञान आसाम
श्री दरीपल्ली रामय्या सामाजिक सेवा तेलंगणा
श्री गिरीश भारद्वाज सामाजिक सेवा कर्नाटक
श्री करीमुल हक सामाजिक सेवा पश्चिम बंगाल
श्री बिपीन गणात्रा सामाजिक सेवा पश्चिम बंगाल
श्रीमती निवेदिता रघुनाथ भिडे सामाजिक सेवा तामिळनाडू
श्री अप्पासाहेब धर्माधिकारी सामाजिक सेवा महाराष्ट्र
बाबा बलबीर सिंग सिचवाल सामाजिक सेवा पंजाब
श्री विराट कोहली क्रीडा (क्रिकेट) दिल्ली
श्री शेकर नाईक क्रीडा (क्रिकेट) कर्नाटक
श्री विकास गौडा क्रीडा (थाळीफेक) कर्नाटक
श्रीमती दीपा मलिक क्रीडा (अॅथलेटिक्स) हरियाणा
श्री मॅरियप्पान थंगावेलु क्रीडा (अॅथलेटिक्स) तामिळनाडू
श्रीमती दीपा कर्माकर क्रीडा (जिम्नॅस्ट) त्रिपुरा
श्री पी आर श्रीजीश क्रीडा (हॉकी) केरळ
श्रीमती साक्षी मलिक क्रीडा (कुस्ती) हरियाणा
श्री मोहन रेड्डी वेंकटराम बोदानापू उद्योग व व्यापार तेलंगणा
श्री ईम्रात खान (अनिवासी भारतीय) कला (संगीत) अमेरिका
श्री अनंत अगरवाल (अनिवासी भारतीय) साहित्य व शिक्षण अमेरिका
श्री एच आर शाह (अनिवासी भारतीय) साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) अमेरिका
श्री श्रीमती सुनीती सोलमोन (मरणोत्तर) वैद्यकीय तामिळनाडू
श्री अशोक कुमार (मरणोत्तर) इतर (पुरातत्त्वशास्त्र) पश्चिम बंगाल
डॉ मापुस्कर (मरणोत्तर) सामाजिक सेवा महाराष्ट्र
श्रीमती अनुराधा कोईराला (विदेशी) सामाजिक सेवा नेपाळ

चालू घडामोडी : २९ जानेवारी

रॉजर फेडररला ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद

  • स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने मेलबर्न येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील अत्यंत चुरशीची झालेली ही अंतिम लढत ३ तास ३८ मिनिटे रंगली.
  • स्पेनच्या राफेल नदाल याच्यावर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात करत रॉजरने ऑस्ट्रेलियन ओपन २०१७चा किताब जिंकला.
  • फेडररने पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीताल हे १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
  • २०१२च्या विम्बल्डन विजेतेपदानंतर फेडररने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच त्याने यापूर्वी २०१०मध्ये शेवटचे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
  • ३५ वर्षीय फेडरर केन रोझवालनंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा जास्त वयाचा दुसरा टेनिसपटू ठरला आहे.
  • रोझवालने १९७४च्या अमेरिकन ओपनमध्ये ३९ वर्षे आणि ३१० दिवसांचा असताना अंतिम फेरी गाठली होती.

विमानतळावर अडकलेल्या निर्वासितांना मायदेशी पाठवण्यास स्थगिती

  • अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिम निर्वासितांना प्रवेशबंदी करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या न्यायालयाने धक्का दिला आहे.
  • अमेरिकेतील विमानतळावर खोळंबलेल्या व्हिसाधारक निर्वासितांना पुन्हा मायदेशी पाठवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
  • सात मुस्लीमबहुल देशातील मूलतत्त्ववादी निर्वासितांना अमेरिकेत पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली होती.
  • मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी ‘प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स’ हा आदेश जारी करण्यात आला होता.
  • या आदेशाद्वारे इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांमधील निर्वासितांना देशात बंदी घालण्यात आली.
  • अनेक देशात युद्ध व संघर्ष, नागरी युद्ध सुरू आहे त्याचा फायदा घेऊन दहशतवादी अमेरिकेत घुसू शकतात अशी भीती आदेशात व्यक्त केली आहे.
  • या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने अमेरिकेतील विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकून पडले होते.
  • यातील अनेक जण ट्रम्प यांनी निर्णयावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच अमेरिकेच्या दिशेने निघाले होते. मात्र अमेरिकेत दाखल होताच त्यांना संबंधीत यंत्रणांनी ताब्यात घेतले होते.
  • यातील इराक आणि येमेनमधील काही निर्वासितांना मायदेशी परतदेखील पाठवण्यात आले होते.
  • याच्या निषेधार्थ अमेरिकेतील जेडब्ल्यूएफ विमानतळाबाहेर हजारो नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले.
  • अमेरिकेत निर्वासितांचे स्वागत आहे असे फलक हाती घेऊन या आंदोलकांनी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
  • या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील न्यायालयाने अमेरिकेचा व्हिसा असलेल्या पण विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.
  • हा निर्णय फक्त विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांसाठीच हा निर्णय लागू असून त्यामुळे किमान १०० ते २०० प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपनचे उपविजेतेपद

  • ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग या जोडीचा पराभव झाला.
  • कोलंबियाच्या ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीने सानिया-डॉडीग या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव करत विजेतेपद मिळविले.
  • या पराभवामुळे सानिया मिर्झाचे कारकिर्दीतील सातवे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
  • सानियाच्या नावावर मिश्र दुहेरी व महिला दुहेरीची प्रत्येकी तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदे जमा आहेत.
  • सानिया व डॉडीगने गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  • विदेशी दहशतवाद्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा असे या आदेशाचे नाव आहे.
  • या ७ देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे.
  • अमेरिकेने घेतलेला निर्णय अवमानकारक असून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.
  • इराणवर अमेरिकेद्वारे घालण्यात आलेली बंदी जोपर्यंत हटवण्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय धक्कादायक असून सर्व स्तरातून या निर्णयाचा विरोध केला जात आहे.

सिंधूला सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद

  • भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.
  • सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर २१-१३, २१-१४ अशी मात करत विजेतेपदावर नाव कोरले.
  • एकतर्फी झालेल्या या लढतीत सिंधूने ग्रेगोरियाला कोणतीही संधी न देता सहज विजय प्राप्त केला.

चालू घडामोडी : २८ जानेवारी

डॉ. विजय भटकर नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

  • प्रसिद्ध संशोधक आणि ‘परम’ महासंगणकाचे (सुपरकॉम्प्युटर) निर्माते डॉ. विजय भटकर यांची बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
  • नालंदाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. पंकज मोहन यांच्याकडून भटकर पदभार स्वीकारतील. कुलगुरू म्हणून ते तीन वर्षे काम पाहतील.
  • दोन महिन्यांपूर्वी सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी राजीनामा दिल्याने कुलपतिपद रिक्त झाले होते.
  • त्यामुळे पंकज मोहन यांच्यावर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
 विजय भटकर यांच्याविषयी 
  • ११ ऑक्टोबर १९४६ रोजी जन्मलेले विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा गावाचे आहेत.
  • भारतात 'परम' या पहिल्या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा असणारे भटकर यांनी देशाच्या संगणक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
  • सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘सी-डॅक’ या संस्थेचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
  • त्याशिवाय त्यांनी ईआर अँड डीसी, ईटीएच रिचर्स लॅब, एमकेसीएल, इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटी इ. राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेतही प्रमुख सहभाग नोंदवला आहे.
  • भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
  • तसेच वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन देखरेख समिती (सीएसआयआर) या संस्थेच्या नियामक परिषदेचेही ते सदस्य होते.
  • महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आयटी टास्क फोर्समध्येही त्यांचा समावेश होता.
  • पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने यापूर्वी गौरविले आहे.
  • भटकर यांनी १२ पुस्तके आणि ८० शोधनिबंध लिहिले आहेत. सध्या ते इंडिया इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
 नालंदा विद्यापीठाविषयी 
  • मुळ नालंदा विद्यीपाठाची उभारणी प्राचीन भारतातील मगध साम्राज्याच्या काळात झाली.
  • इसवी सन पाचशे ते इसवी सन बाराशे या आठशे वर्षांच्या काळात नालंदा विद्यापीठ अस्तित्वात होते.
  • विद्यीपाठात सुमारे दोन हजारांवर शिक्षक आणि दहा हजारांवर विद्यार्थी शिकत होते.
  • चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, टर्की, श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आफ्रिका या भागातून बुद्धिवंत शिकण्यासाठी नालंदात येत असत.
  • ह्युआँग साँग या चीनी प्रवाश्याने नालंदाबद्दल तपशिलवार लिहून ठेवले आहे. बाराव्या शतकात परकीय आक्रमकांनी नालंदाचा विद्ध्वंस केला.
  • नालंदा विद्यापीठ पूर्व आणि पश्चिम जगाचा दुवा होता. नालंदा नष्ट होण्यापूर्वी जगामध्ये नालंदाशिवाय केवळ चार विद्यीपाठे होते.
  • त्यामध्ये कैरोमधील अल अझहर (स्थापना इ.स.९७२), इटलीमधील बोलोगना (इ.स.१०८८) आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड (इ.स.११६७) यांचा समावेश होता.
  • नालंदा विद्यापीठाचा विद्ध्वंस झाल्यानंतर सुमारे आठ शतकांनी विद्यापीठाची पुनर्उभारणी करण्यात आली.
  • मार्च २००६मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बिहार विधानसभेत बोलताना पुनर्उभारणीची संकल्पना मांडली.
  • सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज येओ यांनी तत्काळ ‘नालंदा प्रस्ताव’ केंद्र सरकारकडे पाठविला. यानंतर नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना करण्यात आली.

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक

  • दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
  • महाराष्ट्राने लोकमान्यांच्या १६०व्या जयंती वर्षानिमित्त आपल्या चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर केले.
  • लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता.
  • या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली.
  • त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ४० कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला होता.
  • यावर्षी अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. 
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते. गेल्यावर्षी त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

  • राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना २६ जानेवारी रोजी मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • त्यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत लपून बसलेल्या ३ दहशतवाद्यांचा एकट्याने खात्मा केला होता. परंतु या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.
  • ६८व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला.
  • अशोक चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शांततेच्या काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
  • अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.
  • दादा १९९७मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटद्वारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली.

सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

  • अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिची बहिण व्हीनस विल्यम्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे (महिला एकेरी) विजेतेपद पटकावले.
  • हा सेरेनाचा २३वा ग्रँड स्लॅम विजय असून, या विजेतेपदासह तिने स्टेफी ग्राफचा २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे.
  • महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅमची विजेती होण्यासाठी आता तिला अजून दोन विजेतेपदांची गरज आहे. सध्या हा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे.
  • सेरेनाने अंतिम सामन्यात व्हीनसचा ६-४, ६-४ अशा दोन सरळ सेटमध्ये व्हीनसचा पराभव केला.
  • सेरेनाचे हे सातवे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजेतेपदासह तिने जागतिक क्रमावरीत पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

सात मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आदेशाद्वारे ७ मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  • सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशातल्या नागरिकांवर अमेरिकाप्रवेशासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे.
  • कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले आहे.
  • निवडणूकीपूर्वीच मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
  • तसेच त्यांनी यापूर्वी स्थलांतरीत नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत.
  • आता या नव्या नियमामुळे अमेरिकेच्या निर्वासित आणि विस्थापित पुनर्वसन कार्यक्रमाला किमान १२० दिवसांची स्थगिती मिळाली आहे.
  • तसेच अमेरिकेत येणाऱ्या कोणाही नागरिकाला पुढील ९० दिवसांपर्यंत व्हिसा दिला जाणार नाही.
  • यादरम्यानच्या काळात, नवे नियम आणले जातील, ज्यांमध्ये व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची कसून चौकशी करण्यात येईल.
  • विशेष म्हणजे या नियमातून काही धर्मांना अपवाद करण्यात आले आहे. म्हणजेच हे नियम ख्रिस्ती लोकांना लागू नसतील.
  • स्थानिक मुक्त चळवळींचे गट तसेच दहशतवादविरोधी अभ्यासकांनी हा निर्णय मुस्लिमांप्रति भेदभाव करणारा असल्याचे सांगत त्याचा निषेध केला आहे.
  • माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निर्वासितांसाठी वार्षिक १.१० लाख इतकी मर्यादा घातली होती. ही मर्यादा ५० हजारापर्यंत आणण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर कन्नड चित्रपट बनणार

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कन्नड भाषेत तयार केला जात आहे.
  • कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कलाकार तारा व सुचिंद्र प्रसाद हे अनुक्रमे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारणार आहे.
  • ज्येष्ठ पत्रकार सर्जू काटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपट काढण्यात येत आहे.
  • सावित्रीबाई फुले यांचे कार्य इतर भाषेतही कळावे आणि त्यांच्या थोरवीची जाणीव व्हावी म्हणून काटकर यांनी ही कादंबरी लिहिली.

ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे तीन भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सन्मान

  • सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधील भरीव योगदानाबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने भारतीय वंशाच्या तिघांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
  • पुरुषोत्तम सावरीकर, माखनसिंग खांगुरे आणि विजय कुमार अशी या तिघांची नावे असून, त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल २०१७ जाहीर झाले आहे.
  • सावरीकर यांचा सिडनी येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत व्यापक जनहित साधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • सावरीकर हे ऑस्ट्रेलियन इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्‌स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आकाशवाणी सिडनीचीही स्थापना केली आहे.
  • पर्थ येथे राहणारे माखनसिंग खांगुरे यांनीही न्यूरोरेडिओलॉजी, शिक्षण आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
  • विजय कुमार हे न्यूक्लिअर मेडिसीन तज्ज्ञ आणि संशोधक आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कुमार हे सिडनी येथील तमीळ संगम संघटनेचेहे सदस्य आहेत. त्यांना न्यूक्लिअर सायन्स क्षेत्रामधील योगदानाबद्दलही २००७ आणि २०१४मध्येही पुरस्कार मिळाला होता.

चालू घडामोडी : २७ जानेवारी

‘गार’ची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार

  • कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी ‘जनरल अॅन्टी अव्हॉयडन्स रुल’ अर्थात ‘गार’ या कायद्याची १ एप्रिल २०१७पासून अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.
  • २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून कायदा लागू होईल. भारताशिवाय ‘गार’ हा कायदा अन्य देशांमध्येही आधीपासूनच अस्तित्वात आहे.
  • ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन. दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे.
 पार्श्वभूमी 
  • कर चुकवण्यासाठी काही कंपन्या परदेशातून विशेषतः सिंगापूर आणि मॉरिशस यासारख्या देशांमधून गुंतवणूक करतात.
  • त्यामुळे कर चुकवण्यासाठी केलेल्या स्थलांतरावर चाप लावण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करण्याची गरज भासली.
  • तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पातून या कायद्याचा उगम झाला होता.
  • मात्र भांडवली बाजारासह अर्थ क्षेत्रातून या कायद्याबाबत नाराजी व्यक्त झाली आणि हा कायदा मागे पडला.
  • विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवरही विपरित परिणाम करू पाहणाऱ्या या कराबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही आपल्या शिफारसी पंतप्रधानांना सादर केल्या होत्या.
  • मात्र याबाबत समाधान न झाल्याने अखेर ‘पार्थसारथी शोम समिती’ नियुक्त करण्यात आली होती.
  • या कायद्यासाठी आयकर विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल असे या समितीने म्हटले होते.
  • गेल्या वर्षी संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या कायद्याची पुढील वर्षी अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले होते.

मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांचा राजीनामा

  • लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • राजभवनातील सुमारे १००हून अधिक कर्मचाऱ्यांनी षण्मुगनाथन यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.
  • राज्यपालांना हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्यांचे अभियानही सुरू केले होते. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले होते.
  • याचबरोबर, षण्मुगनाथन यांना हटविण्याच्या मागणीसाठी मेघालयमधील महिला कार्यकर्त्यांनीही मोहिम राबविण्यास सुरुवात केली होती.
 व्ही. षण्मुगनाथन यांच्यावरील आरोप 
  • राज्यपालांनी राजभवनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी राजभवनाला लेडीज क्लब बनवला आहे.
  • राज्यपालांच्या आदेशाने मुली थेट राजभवनात येतात. अनेक मुलींची पोहोच राज्यपालांच्या बेडरूमपर्यंत आहे.
  • रात्रपाळीला दोन जनसंपर्क अधिकारी, एक आचारी आणि एक नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महिला कर्मचारी आहेत.
  • राज्यपालांनी आपल्या कामासाठी सर्व महिलांनाच नियुक्त केले आहे. खासगी सचिव असलेल्या पुरूष अधिकाऱ्याला सचिवालयात परत पाठवण्यात आले.
 व्ही. षण्मुगनाथन यांच्याबद्दल 
  • ६८ वर्षीय षण्मुगनाथन हे तामिळनाडुतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.
  • २० मे २०१५ रोजी त्यांनी मेघालयमध्ये राज्यपाल म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती.
  • ज्योती प्रसाद राजखोवा यांना हटवल्यानंतर त्यांच्याकडे अरूणाचल प्रदेशचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
  • सप्टेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत त्यांच्याकडे मणिपूरचाही अतिरिक्त पदभार होता.

रशियाचे भारतातील राजदूत कदाकिन यांचे निधन

  • दीर्घ कालावधीपासून भारतात रशियाचे राजदूत असलेले अलेक्झांडर कदाकिन यांचे २६ जानेवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले.
  • अस्खलित हिंदी बोलणारे कदाकिन हे २००९पासून भारतात रशियाचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
  • भारत आणि रशियामध्ये मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

टॉप समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा

  • बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) समितीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.
  • बिंद्रा हा यापूर्वीच्या टॉप समितीचादेखील प्रमुख होता पण त्याने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता.
  • ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
  • २०२० आणि २०२४च्या ऑलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी २०१६ आणि २०२०च्या ऑलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती
 ‘टॉप’ची दहा सदस्यीय समिती 
  1. माजी नेमबाज: अभिनव बिंद्रा (प्रमुख)
  2. माजी ॲथलीट: पी.टी. उषा
  3. माजी बॅडमिंटनपटू: प्रकाश पदुकोण 
  4. माजी नेमबाज: अंजली भागवत
  5. माजी वेटलीफ्टर: कर्णम मल्लेश्वरी
  6. टेनिस महासंघाचे अध्यक्ष: सी. के. खन्ना
  7. बॉक्सिंगमधील प्रशासक: के. मुरलीधरन राजा
  8. रेल्वे बोर्डाच्या सचिव: रेखा यादव
  9. साईचे कार्यकारी संचालक: एस. एस. रॉय
  10. संयुक्त क्रीडा सचिव: इंदर धमीजा

चालू घडामोडी : २६ जानेवारी

प्रजासत्ताक दिन सोहळा राजपथावर साजरा

  • भारताच्या ६८व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजधानी दिल्लीत राजपथावर तसेच देशभरात उत्साहाने साजरा झाला.
  • यावेळी भारतीय सैन्याने जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. शिस्तबद्ध संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
  • युएईचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  • त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह इतर नेतेही हजर होते. 
  • संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचलन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
  • यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (ब्लॅक कॅट्स) पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग घेणार आहेत.
  • यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. 
  • यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

वैज्ञानिक पी के के नायर यांचे  निधन

  • पॅलिनॉलॉजी (परागकणशास्त्र) या शास्त्रातील भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक पी के के नायर यांचे  २१ जानेवारी रोजी निधन झाले.
  • भारतात परागकणशास्त्राचा विकास व प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी एकूण २० पुस्तके लिहिली व २५० शोधनिबंध प्रकाशित केले.
  • सपुष्प वनस्पतींमध्ये अँजियोस्पर्मस असतात, त्याबाबतचा ‘ट्रायफायलेटिक सिद्धांत’ त्यांनी मांडला होता.
  • हवेत असणाऱ्या कणांचा डेटाबेस त्यांनी एरोस्पोरा नावाने तयार केला होता. या कणांमुळे मानवाला अ‍ॅलर्जी होऊन श्वासाचे विकार जडत असतात.
  • जैवतंत्रज्ञान अभ्यासतंत्रे वापरून त्यांनी काही नर जनुके शोधून काढली होती, ती वनस्पतींच्या उत्पादनात सुधारणा करणारी होती.
  • नायर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९३० रोजी केरळातील चांगनासेरी येथे झाला. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी पॅलिओबॉटनीत पीएचडी केली.
  • त्यांनी पर्यावरण, बगीचा नियोजन, पोलन मॉर्फोलॉजी, एरोबायोलॉजी, इकॉनॉमिक बॉटनी अशा अनेक विषयांत संशोधन केले.
  • ते लखनऊ येथील कौल सायन्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व द एनव्हायर्नमेंट रीसोर्स रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक होते.
  • सीएसआयआरमध्ये त्यांना ‘सुप्रतिष्ठ (तहहयात) वैज्ञानिक’ हे पद देण्यात आले होते.
  • तिरूअनंतपुरम येथील ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेचे ते उपसंचालक होते.
  • त्यांनी १९६४मध्ये सुरू केलेली पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही परागकण संशोधन शास्त्रास वाहिलेली संस्था हा त्यांचा फार मोठा वारसा आहे.
  • त्यांनी लिहिलेले ‘इसेन्शियल्स ऑफ पॅलिनोलॉजी’ हे पुस्तक परागकणशास्त्रावरील रूढार्थाने पहिले क्रमिक पुस्तक होते.
  • ब्रिटिश कौन्सिलचे अभ्यागत, रशियाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त होते.

राहूल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार

  • बंगळूर विश्वविद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी घेण्यास माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याने नकार दिला आहे.
  • बंगळुरु विश्वविद्यापीठाने २७ जानेवारीला होणाऱ्या ५२व्या दीक्षांत समारंभात द्रविडला डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता.
  • डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.
  • यापूर्वी २०१४साली गुलबर्गा विद्यापिठाकडूनही त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.
  • २०१२मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो भारत 'अ' आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे.

भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात घट

  • बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती समोर आले आहे.
  • जागतिक आर्थिक मंच आणि इतर संघटनांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे या संघटनेने जगातील सर्वाधिक पारदर्शक आणि कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे.
  • ही यादी तयार करताना देशांमधील सार्वजनिक जीवनात नेमका किती भ्रष्टाचार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे.
  • भ्रष्टाचार मोजताना ० ते १०० असे गुण देण्यात आले आहेत. शून्य गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक पारदर्शकता असे या गुणांचे स्वरुप आहे.
  • या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी आहे.
  • भारत, चीन आणि ब्राझीलला लाचविरोधी संघटनेने ४० गुण दिले आहेत. त्यामुळे भारतसाह चीन आणि ब्राझीलचा समावेश मध्यम भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या गटात झाला आहे.
  • २०१५मध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारताला ३८ गुण मिळाले होते. यंदा त्यामध्ये २ गुणांची वाढ झाली आहे.
  • न्यूझीलंड आणि डेन्मार्क देशांनी प्रत्येकी ९० गुण मिळवत यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • न्यूझीलंड, डेन्मार्क पाठोपाठ फिनलंड, स्वीडन, स्विझर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, नेदरलँड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे हा अहवाल सांगतो.
  • सोमालिया देशातील सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
  • याशिवाय भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान आणि इराकचा समावेश आहे.
  • एकाही देशाला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढता आलेला नाही, हे लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • यासोबतच जवळपास दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे जगभरात भ्रष्टाचार मोठी समस्या असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे.
  • या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या १७६ देशांची स्थिती विचारात घेता भ्रष्टाचाराची जागतिक सरासरी ४३ इतकी आहे.
  • त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.

बोल्टला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक गमावावे लागणार

  • जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ४x१०० मीटर रिले शर्यतीत मिळालेले सुवर्णपदक काढून घेण्यात येणार आहे.
  • उसेन बोल्टचा साथीदार नेस्टा कार्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. मेथीलहेक्सानेमाईन हे द्रव्य कार्टरच्या नमुन्यात आढळले आहे.
  • २००८सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या चमुने ४x१०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
  • पण त्या संघाचा सदस्य असलेल्या नेस्टा कार्टरने प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केलेल्या पुनर्तपासणीत स्पष्ट झाले आहे.
  • यामुळे जमैकाच्या संघाचे रिलेचे सुवर्णपदक काढून घेतले जाणार आहे. त्याऐवजी ट्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाला सुवर्णपदक देण्यात येईल. तसेच जपानला रौप्य तर ब्राझिलला कांस्यपदक बहाल केले जाईल. 
  • बोल्टकडे एकूण नऊ ऑलिम्पिक सुवर्णपदके होती, मात्र त्यापैकी एक परत करावे लागल्याने ती संख्या आठवर पोहचली आहे.
  • बोल्टने २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन) आणि २०१६ (रिओ) ऑलिम्पिकमध्ये १००, २०० आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.

श्रमभूषण पुरस्कार २०१५

  • केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने २०१५साठीचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना जाहीर केला आहे . एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उपक्रम आणि ५००हून अधिक कर्मचारी असलेले खासगी कारखाने यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमधून दरवर्षी ‘श्रमरत्न’, ‘श्रमभूषण’, ‘श्रमवीर /श्रम विरांगना’ आणि ‘ श्रमश्री/ श्रमदेवी’ अशा विविध वर्गातील पुरस्कारांचे विजेते निवडले जातात.
  • सन २०१५साठी ‘श्रमरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणालाही जाहीर झालेला नाही. 
  • चौघांना ‘श्रमभूषण’, २४ जणांना श्रमवीर /श्रम विरांगना’ व २८ जणांना ‘श्रमश्री/ श्रमदेवी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 श्रमभूषण पुरस्कार विजेते 
  • एम. रामकृष्णन (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स)
  • श्रीमती अभिलाशा पेठे (स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया)
  • श्यामसुंदर गंगाराम पाडेकर (लार्सन अ‍ॅण्ड ट्युब्रो)
  • रतनकुमार शामराव कांबळे (बजाज ऑटो)

चालू घडामोडी : २५ जानेवारी

भारत आणि यूएईदरम्यान १४ करार

  • भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात १४ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
  • संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
  • भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाला आहे.
  • भारताने २०१४मध्ये अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीशी व्यूहात्मक तेल साठ्याची बांधणी करण्यासंदर्भातील चर्चा सुरु केली होती. 
  • या करारानुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या तेलसाठ्यावर भारताचा प्रथम अधिकार असेल.
  • भारताच्या इंधन सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून संयुक्त अरब अमिरातीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  • भारतास २०१५-१६ या वर्षात सर्वाधिक तेल पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे स्थान पाचवे होते.
  • भारताच्या एकंदर परराष्ट्र धोरणामध्ये या देशाचे स्थान अत्यंत संवेदनशील मानले जाते.

आयआयएम विधेयकातील सुधारणांना मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) विधेयकातील सुधारणांना मंजुरी दिली आहे.
  • आयआयएम संस्थांच्यादृष्टीने या विधेयकात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
  • या नव्या सुधारणांमुळे देशातील आयआयएम संस्थांना वैधानिक हक्क मिळणार असून या संस्था आता स्वत: पदव्या देऊ शकणार आहेत.
  • त्यामुळे आता एखाद्या आयआयएम संस्थेकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यास आयआयएमच्या गव्हर्नर बोर्डाकडून उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांद्वारे संचालकांची चौकशी केली जाऊ शकते.
  • या चौकशीअंती गव्हर्नर बोर्ड संबंधित संचालकाला पदावरून काढू शकते अथवा त्याच्यावर कारवाई करू शकते.
  • याशिवाय, विधेयकातील सुधारित मसुद्यानुसार गव्हर्नर बोर्डाकडून ठराविक वर्षांनंतर या संस्थांचे मूल्यमापन केले जाऊ शकते.
  • नव्या आयआयएम विधेयकात अध्यक्ष निवडीचे अधिकार संस्थाना देण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली आहे.
  • स्मृती इराणींच्या नेतृत्त्वाखाली तयार झालेल्या विधेयकाच्या मसुद्यात आयआयएमच्या गव्हर्नर बोर्डाच्या अध्यक्षाची निवड राष्ट्रपतींच्या सल्ल्याने करण्याची तरतूद होती.
  • त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीचा अंतिम अधिकार सरकारला प्राप्त झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री: प्रकाश जावडेकर

संघीय संचार आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजित पै

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय संचार आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अजित वरदराज पै यांची निवड केली आहे. अजित पै संघीय संचार आयोगाचे ३४वे अध्यक्ष आहेत.
  • निक्की हेले, सीमा वर्मा आणि प्रीत भरारा यांच्यानंतर ट्रम्प यांच्या प्रशासनात समाविष्ट करण्यात आलेले अजित पै हे चौथे भारतीय वंशाचे अधिकारी आहेत.
  • संघीय संचार आयोग ही अमेरिकी सरकारच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. या संस्थेकडे रेडिओ, टी.व्ही, उपग्रह आणि केबल यासंबंधी पूर्ण अधिकार आहेत.
  • एका विशेष कायद्याद्वारे संचार आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगात १७०० कर्मचारी कार्यरत आहेत.
  • अजित पै यांनी हार्वर्ड विद्यापीठातून बीए ऑनर्सची पदवी मिळवली आहे. नंतर शिकागो येथील विद्यापीठातून त्यांनी विधि शाखेतील पदवी मिळवली आहे.
  • त्यांनी अमेरिकेच्या विविध न्यायालयांत तसेच न्याय विभागात जबाबदारीची पदे भूषविली आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते आहेत.
  • विविध कायद्यांची त्यांना सखोल माहिती असल्याने २०१२मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी संचार आयोगाचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

ब्रेक्झिटसाठी ब्रिटिश पार्लमेंटची संमती आवश्यक

  • इंग्लंडला युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचे असेल (ब्रेक्झिट) तर त्यासाठी आधी ब्रिटिश पार्लमेंटची संमती घ्यावी लागणार असल्याचा निर्णय इंग्लंडच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
  • २०१४मध्ये झालेल्या ब्रेक्झिट विषयीच्या सार्वमतात ५२ टक्के मतदारांनी युरोपियन युनियन सोडायच्या बाजूने कौल दिला होता.
  • फक्त ४ टक्क्यांच्या फरकाने मतदारांनी दिलेला हा कौल कायद्याने बंधनकारक नसला तरी लोकशाही संकेतांना महत्त्व देणाऱ्या इंग्लंडमध्ये प्रक्रिया सुरू झाली होती.
  • डेव्हिड कॅमेरून यांच्या राजीनाम्यानंतर  पंतप्रधानपदी आलेल्या थेरिसा मे यांनीही ब्रेक्झिटबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करत त्यादृष्टीने तयारी सुरू केली होती.
  • ब्रिटिश जनतेने ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिल्यावर ब्रिटिश पाऊंडची किंमत घसरली होती.
  • ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यावर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

टीपीपी व्यापार करारातून अमेरिकेची माघार

  • ट्रान्स पॅसिफिक भागीदारी (टीपीपी) या बारा देशांच्या व्यापार करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे.
  • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत या व्यापार करारातील वाटाघाटीतून माघार घेतली आहे.
  • माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या करारात पुढाकाराची भूमिका घेतली होती.
  • ट्रम्प यांच्या मते, हा करार अमेरिकी कामगारांना फायद्याचा नव्हता. तसेच यामुळे उत्पादन क्षेत्रासही फटका बसला असता. यात ट्रम्प यांचा व्यापार धोरणाबाबत दृष्टिकोन दिसून येतो.
  • ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे देश जागतिक अर्थव्यवस्थेत ४० टक्के प्रतिनिधित्व करतात.

चालू घडामोडी : २४ जानेवारी

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या उत्कृष्ट अमलबजावणीसाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार प्रदान केला.
  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन व राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातंर्गत देशभरातील जळगाव व उस्मानाबादसह १० जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले.
 जळगाव जिल्ह्यातील कार्य 
  • जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये सर्वसमावेशक जागृकता अभियान राबविण्यात आले.
  • केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमातंर्गत या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून ‘डिजीटल गुड्डा गुड्डी’ बोर्ड तयार करण्यात आला.
  • यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे.
  • या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते.
  • जिल्हा व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात आले आहेत.
  • याचा सकारात्मक परिणाम झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
  • २०११मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८४२ होता. या उपक्रमानंतर हा जन्मदर २०१५मध्ये ८६३ तर २०१६ मध्ये हा ९२२ पर्यंत पोहोचला आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्य 
  • उस्मानाबाद जिल्ह्याला कन्या भ्रुण हत्या कायद्याच्या कडक अमलबजावणीसाठी तसेच ‘आई व शिशु नियंत्रण प्रणाली’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
  • यातंर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, आरोग्य अधिकारी यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिबीर आयोजित करण्यात आले.
  • त्यात तीन महिने गरोदर असणाऱ्या महिलांचे अकेंक्षण करण्यात येते. पूढील सहा महिन्यांपर्यंत या महिलांना लागणाऱ्या औषधी, त्यांच्या चाचण्या शासनातर्फे करण्यात येतात.
  • यासह गरोदर महिलांच्या कुटूंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून जागृकता निर्माण केली जाते.
  • प्रसूतीनंतरचे पूढील तीन महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात लागणारे लसीकरण केले जाते.

युएईच्या राजपुत्रांचे भारतात आगमन

  • २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख अतिथी आणि संयुक्त अरब इमिरातचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल निहान हे २४ जानेवारी रोजी दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
  • २४ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान संयुक्त अरबच्या शिष्टमंडळासह ते भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद यांचा फेब्रुवारी २०१६नंतरचा हा दुसरा भारत दौरा आहे.
  • पंतप्रधान मोदींच्या २०१५नंतरच्या संयुक्त अरब इमिरात भेटीपासून दोन्ही देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.
  • संयुक्त अरब इमिरात हा देश भारताच्या विदेशी गुंतवणुकीतील महत्वाचा देश असून, भारताला उर्जा सुरक्षा पुरवणारा महत्वाचा देश मनाला जातो.
  • तसेच २०१५-१६ या कालखंडात भारताला इंधन पुरवठा करण्यात ५व्या क्रमांकावर हा देश होता.

शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ होणार

  • मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या निर्णयामुळे नोंव्हेंबर आणि डिसेंबर २०१६मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे पीककर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नाही.
 या बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय 
  • आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी आता डिग्री तर पदविका ऐवजी पदवी प्रधान करणार.
  • क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी.
  • अनिसाबाद येथे ११.३५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय.

महाराष्ट्राच्या तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

  • उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
  • येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. 
  • देशभरातील एकूण ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • या विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.
  • याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या स्पेशल फोर्सच्या १९ जवानांनाही शौर्यदपक जाहीर झाले आहे.
  • या जवानांच्या एका तुकडीचे नेतृत्व केलेल्या मेजर रोहित सुरी यांना किर्तीचक्र (शौर्यासाठी देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च मानाचा पुरस्कार) जाहीर झाला.
  • गोरखा रायफल्सच्या हवालदार प्रेम बहादूर रेसमी मगर यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तामिळनाडूमध्ये जलिकट्टू विधेयकाला मंजुरी

  • २३ जानेवारी रोजी तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
  • तामिळनाडूनमध्ये अनेक ठिकाणी जलिकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टू विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात आले.
  • तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्या २१ जानेवारीलाच जलिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती.

शेष भारत इराणी करंडक विजेता

  • प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या गुजरातचे ३७९ धावांचे आव्हान चार मोहऱ्यांच्या मोबदल्यात पार करत शेष भारताने इराणी करंडक जिंकला.
  • आव्हानाचा पाठवलाग करणाऱ्या शेष भारताचे चार मोहरे ६३ धावांत माघारी परतले होते.
  • मात्र चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा यांनी पाचव्या विकेटसाठी ३१६ धावांची भागीदारी रचून शेष भारताचा विजय निश्चित केला.
  • साहाने २७२ चेंडूंत २६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद २०३, तर पुजाराने २३८ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद ११६ धावांची खेळी केली. साहाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
 इराणी करंडक स्पर्धा 
  • १९५९-६०साली रणजी स्पर्धेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दिवंगत खजिनदार श्री इराणी यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा सुरु करण्यात आली. 
  • ही प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतातील संघातील निवडलेल्या खेळाडूंच्या संघात खेळली जाते.

सीआयएच्या संचालकपदी माईक पॉंपेओ

  • अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदी माईक पॉंपेओ यांची निवड झाली आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.
  • पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना पॉंपेओ यांची निवड महत्त्वाची मानली जाते.