चालू घडामोडी : १७ जानेवारी

एमपीएससी प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती

  • खुल्या वर्गातून अर्ज दाखल केलेल्या मागास वर्गातील उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा सरकारचा निर्णय नियमबाह्य असल्याचे सांगत, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेला १ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली.
  • गेल्या वर्षी पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीसाठी एमपीएससीने परीक्षा घेतली. महिला खुला वर्ग व स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी मागास वर्गातील उमेदवारांनी गुणवत्तेच्या आधारावर अर्ज केले.
  • हे उमेदवार लेखी परीक्षा पासही झाले. मात्र, तोंडी परीक्षेपूर्वी संबंधित उमेदवार मागास वर्गातील असल्याचे समजताच, एमपीएससीने त्यांना खुल्या वर्गातून अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविले. याचीच पुनरावृत्ती अन्य परीक्षांमध्येही करण्यात आली.
  • मागास वर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारावर खुल्या वर्गातून अर्ज भरू शकतात, असा निर्वाळा मॅटपासून सर्वोच्च न्यायालयाने देऊनही राज्य सरकार व एमपीएससीने नियमबाह्य पद्धतीने मागास वर्गातील उमेदवारांना अपात्र ठरविले आहे.
  • त्यामुळे एमपीएससी व राज्य सरकारने यापुढे नियमांचे पालन न केल्यास न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांचे सुखोईतून उड्डाण

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन या सुखोई विमान चालवणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.
  • त्या जोधपूर विमानतळाहून सुखोई-३० एमएकेआय या विमानातून उड्डाण करून ५४ मिनिटांनी उत्तरलाई येथील विमानतळावर उतरल्या.
  • यापूर्वी २५ नोव्हेंबर २००९मध्ये तिन्ही दलांच्या प्रमुख या नात्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यातून सुखाईतून प्रवास केला होता.
  • सुखोई-३० हे वायू दलातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान मानले जाते. भारताकडे २०२०पर्यंत अशी २७० विमाने असतील. मिग २१ आणि मिग २७ यांच्या जागा ही विमाने घेतील.

महाराष्ट्राच्या बालमृत्यू दरात घट

  • केंद्र शासनाच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम २०१६च्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा सरासरी वार्षिक बालमृत्यू दर २४ वरून २१ वर आला असून, मागील वर्षापेक्षा तीन अंकांनी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
  • या अहवालानुसार केरळ, तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमूद केले आहे.
  • रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया दरवर्षी एसआरएस अहवाल जाहीर करीत असतो. त्यामध्ये माता व अर्भक मृत्यूची देशभरातील राज्यांची आकडेवारी जाहीर करण्यात येते.
  • २०१६च्या या बालमृत्यू अहवालानुसार सर्वात कमी बालमृत्यू केरळमध्ये ११ एवढे झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडू (१९) व महाराष्ट्राचा (२१) क्रमांक येतो.
  • संपूर्ण देशाचा बालमृत्यू दर हा ३९ एवढा आहे. त्यामध्ये गेल्या वर्षापेक्षा ४ अंकांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • २०१३मध्ये महाराष्ट्राचा बालमृत्यू दर २६ होता. २०१४ मध्ये २३, २०१५ मध्ये २४ आणि २०१६ मध्ये तो २१ वर आला आहे. यावरून राज्याच्या बालमृत्यूच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

  • कोल्हापूर येथील विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
  • कोल्हापूर विमानतळ स्थापन करणारे आणि १९३९मध्ये विमानसेवा सुरू करणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळास द्यावे अशी मागणी गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती.
  • याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
  • त्याची दखल घेत राज्य सरकारने कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.
 पार्श्वभूमी 
  • सन १९२२साली राजर्षी शाहू महाराज यांच्या निधनानंतर सत्ता सूत्रे हाती घेतल्यानंतर अपुरी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा काटेकोर प्रयत्न राजाराम महाराज यांनी केला.
  • राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते, मात्र त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले. राजर्षी शाहू महाराजांचे विचार व वारसा त्यांनी पुढे चालविला.
  • त्यानुसार त्यांनी विमानतळाची स्थापना करत १९३९साली कोल्हापूरामध्ये पहिले विमान आणले.
  • १९३०-३५ मध्ये त्यांनी विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमीन विमानतळासाठी संपादित केली.
  • विमानतळाचे उद्घाटन ४  मे १९४० मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्याच हस्ते झाले. १९७८-७९ मध्ये विमानतळाचे विस्तारीकरण झाले.
  • कोल्हापुरला जगाच्या पटलावर नेण्याचे आणि जिल्ह्यातील उद्योग, शेती क्षेत्राला विकासाची झेप घेण्यासाठी प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले.
  • त्यामुळेच गेल्या १७ वर्षांपासून कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी होती. 

पतंजलीची उत्पादने मिळणार ऑनलाईन

  • पतंजली आयुर्वेद या बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने ‘हरिद्वार से हर द्वार तक’ अशी टॅगलाईन घेऊन ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये पदार्पण केले.
  • आपली उत्पादने ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पेटीएम मॉल, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, अ‍ॅमेझॉन, नेटमेडस्, शॉपक्लूज या ऑनलाईन विक्री क्षेत्रातील कंपन्यांशी पतंजलीने करार केला आहे.
  • यामध्ये डॉक्टरांनी सुचवून त्यानुसारच दिली जाणारी पतंजलीची औषधे मात्र केवळ नेटमेड्स व वनएमजी या मंचांवरच विकली जाणार आहेत.
  • पतंजली आयुर्वेद ही कंपनी ग्राहकांनी ऑनलाइन मंचावर नोंदवलेल्या मागणीनुसार थेट आपली उत्पादने संबंधित ई-कॉमर्स कंपनीला पुरवेल.
  • पतंजली व या आठही ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी कोणतीही सवलत देणार नाहीत.
  • या भागीदारीतून चालू वर्षात एक हजार कोटी रुपये विक्रीचे लक्ष्य पतंजलीने ठेवले आहे.

रोनाल्डिन्होची फुटबॉलमधून निवृत्ती

  • मागील २ वर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर असलेला ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • रोनाल्डिन्हो २००२ सालच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या फुटबॉल संघातील महत्वाचा खेळाडू होता. या विश्वचषकात त्याने २ गोल करत महत्वाची भूमिका बजावली होती.
  • स्थानिक क्लबमधून करीयरला सुरुवात करणाऱ्या रोनाल्डिन्होला पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना खऱ्या अर्थाने नाव, प्रसिद्धी मिळाली.
  • २००३ ते २००८ दरम्यान रोनाल्डिन्होने प्रसिद्ध बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधीत्व केले. २००५ साली त्याची फिफाच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
  • ब्राझीलकडून ९७ सामने खेळताना रोनाल्डिन्होने ३३ गोल केले. त्यातील २ गोल २००२च्या विश्वकप स्पर्धेत केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा