चालू घडामोडी : १३ मार्च

एलओयु आणि एलओसीवर आरबीआयकडून बंदी

  • लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (LoC) यांचा व्यापारामध्ये आयातीसाठी होणारा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
  • त्यामुळे उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी यापुढे लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट देता येणार नाही.
  • पंजाब नॅशनल बँकेमधला नीरव मोदी व मेहूल चोक्सींचा १३ हजार कोटी रुपयांचा घोटाऴा या एलओयू व एलओसीच्या माध्यमातून झाला होता.
  • त्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक प्रणालींचा अभ्यास करून भारतामध्ये मालाची आयात करण्यासाठी उद्योगधंदे वापरत असलेली ही सुविधा बंद करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
  • लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी या दोन प्रकारांचा वापर मात्र मालाची आयात करण्यासाठी ठरवलेल्या निकषांच्या आत राहून करता येईल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
  • बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नीरव मोदी व मेहूल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेचे एलओयू वापरले व विदेशामध्ये अनेक बँकांकडून १३ हजार कोटी रुपये लुटले असा आरोप आहे.
  • हा घोटाळा उघडकीस यायच्या आधीच कुटुंबियांसह नीरव मोदी फरार झाला असून तो कुठे आहे याचाही पत्ता लागलेला नाही.
  • सीबीआय तसेच सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाचा तपास करत असून पीएनबीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
 लेटर ऑफ अंडरटेकिंग 
  • लेटर ऑफ अंडरटेकिंग ही बँकेकडून देण्यात आलेली हमी असते. याआधारे दुसरी एखादी (विदेशातील) बँक संबंधित खातेदाराला अर्थपुरवठा करते.
  • प्रामुख्याने विदेशातून सामान आयात करायचे असल्यास व्यापारी या लेटरच्या आधारे रक्कम उभी करतात.
  • एखाद्या खातेदाराने अशाप्रकारे घेतलेले कर्ज बुडवल्यास लेटर ऑफ अंडरटेकिंग देणाऱ्या बँकेस संबधित बँकेची थकबाकीची रक्कम चुकती करावी लागते.

शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारत पहिल्या स्थानी

  • ‘इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स’ या संस्थेने जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • त्यानुसार २०१३ ते २०१७ या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे.
  • जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी १२ टक्के आयात एकटा भारत करतो.
  • यानुसार २००८ ते २०१२च्या तुलनेत २०१३ ते २०१७ या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे.
  • भारताच्या पाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
  • चीन, ऑस्ट्रेलिया हे देश पाचव्या व सहाव्या स्थानी आहे. तर अल्जेरिया सातव्या, इराक आठव्या आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे.
  • भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून भारतातील ६२ टक्के शस्त्रास्त्रे हे रशियाकडून येतात. तर अमेरिकेकडून १५ टक्के आणि इस्रायलकडून ११ टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे.
  • रशिया आणि इस्रायलकडून भारत नेहमीच शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला असला तरी अमेरिकेकडून आयातीचे प्रमाणही वाढले आहे.
  • चीनला शह देण्यासाठी अमेरिका-भारतामधील संबंध सुधारत असून संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचे योगदान वाढल्याचे सांगितले जाते.
  • देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रांसाठी भारत अद्याप दुसऱ्या देशावर अवलंबून आहे.
  • ‘मेक इन इंडिया’ मोहीमेअंतर्गत भारताला शस्त्रास्त्रनिर्मितीत अपेक्षित यश न आल्याने, भारताला शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यांवर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे.
  • शस्त्रे निर्यात करणाऱ्या जागतिक देशाच्या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन अनुक्रमे दोन ते पाच या स्थानावर आहे.
  • चीनकडून सर्वात जास्त शस्त्रे आयात करणारा देश हा पाकिस्तान आहे. चीनने ३५ टक्के शस्त्रे पाकिस्तानला निर्यात केली आहेत.

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारत अव्वल

  • युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर भारताने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह पदक तालिकेत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे.
  • मेक्सिकोत झालेल्या या स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांबरोबरच एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
  • या स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी, मनू भाकेर, अखिल शेरॉन व ओमप्रकाश मिथार्वाल यांनी सुवर्णपदक जिंकले.
  • पदक तालिकेत अमेरिकेने ३ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्यपदकांसह दुसरे स्थान मिळवले. चीनला २ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशा ५ पदकांसह तिसरे स्थान मिळाले.

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे लोकार्पण

  • उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते करण्यात आले.
  • ७५ मेगावॉटचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात ५०० कोटी रुपये खर्च झाले असून फ्रान्सच्या एन्जी या कंपनीने तो उभारला आहे.
  • विंध्य पर्वतराजीत दादर कलान खेडय़ातील उंचावरील भागात हा प्रकल्प असून त्याला १,१८,६०० सौर पट्टय़ा आहेत. एकूण ३८० एकर भागात तो पसरलेला आहे.
  • वार्षिक १५.६ कोटी युनिट विजेची निर्मिती त्यात होणार असून महिन्याला १.३० कोटी युनिट वीज निर्मिती होईल. यातील वीज उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये असलेल्या जिगना उपकेंद्रात सोडली जाईल.
  • जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
  • आयएसए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॅरिस जाहीरनाम्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली होती.
  • आयएसएची संकल्पना मोदी यांची असून त्यासाठी १२१ देश एकत्र आले आहेत. भारत त्यात २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे.
  • सध्याच्या शाश्वत वीजनिर्मिती क्षमतेच्या हे प्रमाण दुप्पट असणार आहे. त्यामुळे भारत युरोपीय समुदायाला मागे टाकील.
  • भारताला २०१८ ते २०२२ दरम्यान १७५ गिगावॅटच्या वीज निर्मितीसाठी ८३ अब्ज डॉलर्सचा निधी लागणार आहे. सध्या भारताची शाश्वत ऊर्जा क्षमता ६३ गिगावॅट आहे.
  • सौर व पवन ऊर्जेचे दर युनिटला २.४४ रुपये व ३.४६ रुपये इतके कमी आहेत, जगात हे दर सर्वात नीचांकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदी सीआयए प्रमुख माईक पोम्पिओ

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत प्रमुख सहकारी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले आहे.
  • टिलरसन यांच्या जागी सीआयएचे प्रमुख माईक पोम्पिओ यांना नियुक्त केले आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
  • टिलरसन एक्सॉन मोबिल या कंपनीचे माजी सीईओ असून, त्यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
  • रेक्स यांनी पदभार घेतल्यापासून ट्रम्प आणित्यांच्यात मतभेद सुरू झाले होते. त्याचीच परिणती म्हणून त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
  • पोम्पेओ यांची परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर, सीआयएच्या उपसंचालिका जिना हास्पेल यांची संचालक पदावर वर्णी लागली असून, सीआयएच्या संचालक पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

भारताच्या पूजा वस्त्रकारच्या नावे विश्वविक्रमाची नोंद

  • भारतीय महिला क्रिकेट संघातील ऑल राऊंडर पूजा वस्त्रकार हिने नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी करत ५६ चेंडूंमध्ये ५१ धावा करत विश्वविक्रमाची नोंद केली.
  • महिला क्रिकेटच्या इतिहासात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत अर्धशतक झळकावणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने हा विक्रम करताना न्यूझीलंडच्या ल्यूसी दूलान हिचा विक्रम मोडित काढला.
  • ल्यूसीने २००९मध्ये इंग्लंडविरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा