चालू घडामोडी : २१ मार्च

हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचे निधन

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचे २१ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
  • केदारनाथसिंह हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी होते. सोपे लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हिंदी साहित्यातील ते एक प्रख्यात कवी म्हणून त्यांची ओळख आहे.
  • त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराबरोबरच (२०१३) साहित्य अकादमी पुरस्कारानेही (१९८९) गौरवण्यात आले आहे. 
  • अकाल मे सरस, बाग, अभी बिलकुल अभी, जमीन पाक रही है, यहॉंसे देखो हे त्यांचे काव्य संग्रह विशेष गाजले आहेत.
  • ते कथाकार आणि निबंधकार म्हणूनही परिचीत होते. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी

  • भारतातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत जाहीर केली आहे.
  • या माहितीनुसार संपूर्ण देशात ४,१३,७६० भिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी २०११ मधली आहे.
  • यानुसार मिझोराम राज्यात सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या आहे. मिझोरामध्ये ५३ भिकारी आहेत. तर लक्षद्विप, दादरा नगर हवेली, दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात अनुक्रमे २, १९ आणि २२ भिकारी आहेत.
  • सर्वाधिक भिकारी असणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल अव्वलस्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये ८१,२४४ तर उत्तर प्रदेशात ६५,८३५ भिकारी आहेत. महाराष्ट्रातील भिकाऱ्यांची संख्या २४,३०७ इतकी आहे.

५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक

  • जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे.
  • २०१६मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत अगदी अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला.
  • हिलेरी क्लिंटनसारख्या बलशाली दावेदाराला हरवून ट्रम्प महासत्तेच्या गादीवर आले. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचे श्रेय केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला दिले जाते.
  • २०१४मध्ये फेसबुकच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल आले. जे अॅप पर्सनॅलिटी क्विझ असल्याचे भासवण्यात आले.
  • द ऑब्जर्व्हरच्या माहितीनुसार एखादा फेसबुक युजर ही क्विझ खेळत असेल तर त्याच्या अकाऊंटमध्ये असलेल्या जवळपास १६० युजर्सचा डेटा, वैयक्तीक माहितीचाही अॅक्सेस कोगनला मिळत होता.
  • त्यामुळे २ कोटी ७० लाख लोकांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या नेटवर्कमधून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात आली.
  • या माहितीचा वापर करताना संबधीत व्यक्तींची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. माहिती मिळवलेल्या युजर्सपैकी बहुतांश लोक हे अमेरिकन होते.
  • या संपूर्ण प्रकरणानंतर फेसबुकवरील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
  • या घटनेनंतर फेसबुकच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले.
  • तसेच अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या सुमारे एक कोटीने घटली आहे.
  • फेसबुकने डेटा लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना अटक

  • फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना २००७मध्ये निवडणूक प्रचारासाठी लिबियाकडून आर्थिक मदत मिळाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • सार्कोझी आणि त्यांच्या मंत्र्यांना निवडणूक प्रचारासाठी लिबियाचा नेता मौमर कदाफी आणि त्याचा मुलगा सैफ अल-इस्लाम यांनी पैसे पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
  • कदाफीची राजवट उलथवण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या मदतीला फ्रान्सने जाऊ नये या उद्देशाने हा पैसा देण्यात आला होता. २०१३मध्ये याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला.
  • या प्रकरणी तपास यंत्रणांनी पाठविलेल्या नोटिसींना सार्कोझी यांनी आतापर्यंत भीक घातली नव्हती.
  • सार्कोझी यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेले तत्कालीन मंत्री ब्रिस होर्टफेक्स यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा