चालू घडामोडी : १० मे

एमपीएससी : प्रोफाईलमध्ये आधार नोंदविण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनातील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आधार क्रमांक नोंदवला नसेल, तर अशा उमेदवारांची नोंदणी जूनपासून रद्द करण्यात येणार आहे.
  • आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज भरताना आधी आयोगाच्या संकेतस्थळावर आधी नोंदणी (प्रोफाईल) करावी लागते.
  • उमेदवारांनी दिलेली माहिती अद्ययावत करून आधार क्रमांक देण्याचे बंधन आयोगाने घातले होते. परंतु यापूर्वी सूचना देऊनही अद्याप अनेक उमेदवारांनी आधार क्रमांकाची नोंदणी केलेली नाही.
  • आयोगाकडे जवळपास १८ लाख उमेदवारांची माहिती आहे. मात्र त्यातील साधारण ९ लाख उमेदवारांचीच आधार नोंदणी झाली आहे.
  • ज्या उमेदवारांनी आधार क्रमांक नोंदवलेला नाही अशा उमेदवारांची नोंदणी १ जून पासून रद्द करून त्यांची संकेतस्थळावरील खाती बंद करण्यात येणार आहेत. उमेदवार ३१ मेपर्यंत माहिती अद्ययावत करू शकतील.

गुगल क्लाऊड इंडियाच्या प्रमुखपदी नितीन बावनकुळे

  • विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे पदवीधर असलेले नितीन बावनकुळे यांची गुगल क्लाऊड इंडियाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
  • बावनकुळे यांनी गेली ६ वर्षे कंपनीचा भारतातील कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे.
  • बावनकुळे यांनी बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मधून पदवी घेतली आहे. तसेच ते नागपूरच्या व्हीएनआयटीच्या १९९१च्या बॅचचे पदवीधरही आहेत.
  • त्यांनी ई-कॉमर्स, रिटेल, क्लासिफाईडस् आणि शिक्षण व्यवसाय अशा विविध क्षेत्रात विक्री विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

भाषातज्ञ ओंकारनाथ कौल यांचे निधन

  • काश्मिरी वंशाचे भाषातज्ञ ओंकारनाथ कौल यांचे ५ मे रोजी निधन झाले. जगात काश्मिरी भाषेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले होते.
  • कौल यांचे वडील प्रेमनाथ कौल हे नामांकित कवी होते. त्यामुळे त्यांना साहित्यगुणांचा वारसा आधीपासून होता.
  • त्यांनी आग्रा विद्यापीठात साहित्यात विद्यावाचस्पती पदवी घेतली व नंतर अमेरिकेतील इलिनॉइस विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले.
  • म्हैसूर येथील भाषाभ्यासासाठीच्या ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ या संस्थेचे कौल हे पहिले काश्मिरी प्रमुख होते. त्यानंतर १५ वर्षे ते पतियाळा येथील नॉर्दन रिजनल लँग्वेज सेंटरचे प्राचार्य होते.
  • मसुरी येथे त्यांनी लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेत सात वर्षे भाषा विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
  • त्यांनी एकूण १०० पुस्तके लिहिली, त्यातील बहुतांश काश्मिरी भाषेवर आहेत. ‘व्हिस्पिरग वर्ड्स’ या त्यांनी लिहिलेल्या आठवणींचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
  • काश्मिरी साहित्याचा इतिहास त्यांनी पंजाबी भाषेतून लिहिला. भाषाशास्त्रज्ञ म्हणून पाकिस्तानपासून युरोपीय देशातही त्यांची मुशाफिरी होती.
  • वेगवेगळ्या भाषांसाठी त्यांनी काम केले होते, त्यामुळेच त्यांना अस्तंगत होत जाणाऱ्या भाषांबाबतचे धोरण सल्लागार म्हणून युनेस्कोत नेमण्यात आले होते.

शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचे निधन

  • ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी १० मे रोजी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला.
  • जगण्याला कंटाळल्याने डेव्हिड गुडॉल इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मरणाचा अधिकार आहे.
  • स्वित्झर्लंडमध्ये १९४०पासून जगण्याचा कंटाळा आलेल्या परदेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यावर वैद्यकीय साह्याने जीवन संपवण्याचा अधिकार आहे.
  • गुडॉल यांच्या स्वेच्छामरणाच्या निर्णयानंतर एक्झिट इंटरनॅशनल या संस्थेने त्यांना मदत केली. ही संस्था इच्छा मरणासाठी काम करते.

हवाई टॅक्सीसाठी उबरचा नासासोबत करार

  • मोबाईल अॅप्लिकेशनवरुन टॅक्सी बुक करुन प्रवास करण्यासाठी प्रसिद्ध असणारी उबर या कंपनीने अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेशी हातमिळवणी केली आहे.
  • नासाच्या मदतीने ही कंपनी आपल्या उडणाऱ्या टॅक्सी बाजारात आणणार आहे. तसेच या अनोख्या सेवेचा दरही सामान्य टॅक्सी सेवेइतकाच असेल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
  • अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत करार केला आहे. शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे.
  • ‘उबर एअर पायलट’ नावाच्या या योजनेत लॉस एंजिलसदेखील भागीदार असणार आहे. याआधी डलास फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत.
  • २०२०पर्यंत अमेरिकेतील काही शहरांत उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा