चालू घडामोडी : २३ मे

ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य

  • आंतरराज्य मालवाहतुकीसाठी केंद्र सरकारने लागू केलेली ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य होणार आहे. ही प्रणाली १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
  • पन्नास हजार किंवा त्याहून अधिक किंमतीच्या मालाची ने-आण दोन किंवा अधिक राज्यांमधून होत असल्यास ही प्रणाली लागू होईल.
  • दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकाला ई-माध्यमातून त्या देयकावरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरावा लागेल. या कराची पावती सादर केल्यानंतर संबंधित वाहनाला दुसऱ्या राज्यात प्रवेश मिळेल.
  • मालवाहतुकीतील जीएसटीमध्ये करचुकवेगिरी होऊ नये व हे कर संकलन सुलभ रीतीने व्हावे यासाठी सरकारने ही पद्धत सुरू केली आहे.
  • गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरयाणा आदी २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ही प्रणाली सुरू झाली आहे.
  • उर्वरित राज्यांत ही प्रणाली ३ जूनपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार ही प्रणाली महाराष्ट्रात ३१ मेपासून तर, पंजाब व गोवा येथे १ जूनपासून सुरू होईल.

सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे निधन

  • सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे २२ मे रोजी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
  • ६ सप्टेंबर १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली.
  • पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७मध्ये याच विद्यापीठातून एम.ए. केले.
  • १९६७मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते. सुमारे २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे अर्थसल्लागार होते.
  • टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
  • आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
  • डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती.
  • डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅडव्हाइस’ ही संस्था वित्तीय सल्लागार क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर होती.

एबी डिव्हीलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

  • दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने २३ मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
  • गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे थकलो असल्याचे सांगत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
  • मैदानात ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज अशी ओळख असलेला डीव्हिलियर्स रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपर कट यासारखे एकाहून एक सरस फटके सहज खेळतो.
  • मैदानात स्वभावाने शांत असलेल्या डिव्हीलियर्सची फलंदाजीतली कारकिर्द मात्र चांगलीच आक्रमक राहिलेली आहे.
  • एबीडीने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून २०,०१४ पटकावल्या आहेत.
  • एबीडीने २००४साली कसोटी क्रिकेटमध्ये, २००५साली वन-डे क्रिकेटमध्ये व २००६साली टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले.
  • यानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषविले. मात्र आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.
 डिव्हीलियर्सचे विक्रम 
  • एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक. (१६ चेंडूंमध्ये)
  • एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक (३१ चेंडूंमध्ये) व सगळ्यात जलद दीडशतक (६४ चेंडूंमध्ये).
  • कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
  • आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये सगळ्यात जास्त गुण कमावणारा तो दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. (९३५ गुण)
  • ‘साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर’ हा मानाचा पुरस्कार एबीडीने २०१४ व २०१५ असा दोन वेळा पटकावला आहे.
  • सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथा दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जॅक कॅलिस खालोखाल धावा करणारा दुसरा अफ्रिकन आहे.
  • ४० मिनिटांत १०० धावा आणि १९ मिनिटांत ५० धावांची खेळी.
  • एका सामन्यात सर्वाधिक १६ षटकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मासोबत डिविलियर्सच्या नावावर जमा आहे.
  • ३३८.६३ हा वनडेतील सर्वाधिक स्ट्राइक रेट एबीडीच्या खात्यावर जमा आहे.
एबी डिव्हीलियर्सची कारकीर्द
सामने धावा सर्वोच्च धावसंख्या सरासरी शतक अर्धशतक
कसोटी ११४ ८७६५ २७८* ५०.६६ २२ ४६
वन-डे २२८ ९५७७ १७६ ५३.५० २५ ५३
टी-२० ७८ १६७२ ७९* २६.१२ १० -

आरोग्यसेवांच्या बाबतीत जगात भारत १४५व्या स्थानी

  • आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांचा दर्जा, या संदर्भात वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, १९५ देशांच्या यादीत भारताचा १४५वा क्रमांक लागतो.
  • या यादीत चीनसह बांगलादेश, श्रीलंका, भूतान यांसारख्या छोट्या शेजाऱ्यांनीही भारताला मागे टाकले आहे.
  • आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत. १९९०मध्ये ते २४.७ इतकेच होते.
  • जरी भारताच्या एचएक्यू म्हणजे हेल्थकेअर अॅक्सेस अँड क्वालिटी निर्देशांकाने २००० ते २०१६ या काळामध्ये वेगाने झेप घेतली असली तरी सर्वात चांगल्या आणि सर्वात कमी गुणांमधील दरीही रुंदावल्याचे दिसून येते.
  • २०१६च्या आकडेवारीत गोवा आणि केरळ या राज्यांनी सर्वाधिक म्हणजे ६० पेक्षा जास्त गुण आहेत तर आसाम आणि उत्तरप्रदेशाला सर्वात कमी म्हणजे ४० पेक्षा कमी गुण आहेत.
  • भारतापेक्षा चीन (४८), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांची स्थिती चांगली आहे.
  • तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
  • या यादीत आईसलँड, नॉर्वे, नेदरलँडस, लक्झेंबर्ग हे देश पहिल्या चार क्रमांकांवर आहेत. तर फिनलंड आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तरीत्या ५व्या स्थानी आहेत.

जगातील सर्वात लहान वायरलेस रोबोचा शोध

  • अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे.
  • किटकासारख्या दिसणाऱ्या या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे.
  • हे संशोधक ब्रिसबेन येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अ‍ॅण्ड ऑटोमेशन’मध्ये हा शोध सादर करणार आहेत.
  • संशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत.
  • त्यांनी आयआयटी मुंबई येथे बी.टेक., तर अमेरिकेत एम.एस. केले आहे. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पी.एच.डी. करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा