चालू घडामोडी - ६ व ७ डिसेंबर २०१४

·        भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भुमिपूजन बाबासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजे येत्या १४ एप्रिल रोजी या स्मारकाचे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

·        आपल्याला पाहिजे त्या नावाचे डोमेन नाव घेऊन संकेतस्थळ सुरू करण्याची सुविधा सुरू झाली असून याचा फायदा अनेक खासगी कंपन्यांसोबतच राज्य शासनानेही घेतला आहे. राज्य शासनाचे www.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आता आपण 'महाराष्ट्र.भारत' असे टाइप केल्यावरही सुरू होणार आहे. अशा प्रकारे डोमेन नाव घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

·        आपण 'महाराष्ट्र.भारत' हे डोमेन नाव सध्या देवनागरी, बांगला, तेलुगू, गुजराती, उर्दू, तामिळ आणि पंजाबी या लिप्यांमध्ये टाइप करून राज्य शासनाचे संकेतस्थळ सुरू करू शकतो.

·        केंद्र सरकारने रेल्वे क्षेत्राचे दरवाजे परकीय गुंतवणूकीसाठी खुले करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सीएसटी- पनवेल या जलदगती रेल्वेमार्गासाठी सरकारने पहिल्यांदाच परकीय गुंतवणूकीचा पर्याय आजमवण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे रेल्वे क्षेत्रात काही आमुलाग्र बदल घडून येण्याची शक्यता आहे.

·        सुरूवातीला २० टक्के परकीय गुंतवणूकीला मान्यता देण्याचा रेल्वेमंत्रालयाचा विचार आहे. सीएसटी- पनवेल या ४९ किलोमीटरच्या जलदगती रेल्वेमार्गासाठी एकूण १४,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

·        या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई एकमेकांना जोडले जाणार असून प्रवासाचा मोठा वेळ वाचेल. सध्या हे अंतर कापण्यासाठी साधारण सव्वा तासाचा अवधी लागतो. मात्र या प्रकल्पामुळे हे अंतर केवळ २७ मिनिटांमध्ये कापता येणार आहे.

·        जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेचे अस्तित्त्व टिकवायचे असेल तर मराठी शाळांचे तातडीने सक्षमीकरण करून त्यातील शिक्षकांची शाळाबाह्य़ कामांमधून सुटका करावी लागेल, अशी शिफारस भाषा सल्लागार समितीने केली आहे. त्याचप्रमाणे भाषेचे सर्वागीण संशोधन, संवर्धन आणि अभ्यासासाठी मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची सूचनाही समितीने केली आहे.

·        डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सदर अहवाल तयार केलेला असून पुढील महिन्यात तो विधीमंडळात मांडण्यात येईल. 

·        राज्यातील बालशिक्षण, बालसुरक्षा आणि आरोग्याच्या  स्थितीबाबत राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्याच्या साक्षरतेचे प्रमाण हे २००१ ते २०११ या कालावधीत ७७ टक्क्यांवरून ८३ टक्के एवढे वाढल्याचे युनिसेफच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

·        मात्र, अजूनही गणित आणि भाषा या विषयात दर पाच विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळवतो.

·        मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच शनिवारी दुपारी पवई येथील चित्रा स्टुडिओला अचानक भीषण आग लागली.

·        न्यूयॉर्क टाइम्सच्या पुस्तक परीक्षणाच्या आधारे २०१४ मध्ये पहिल्या शंभर पुस्तकांमध्ये भारतीय वंशाच्या सहा अमेरिकी लेखकांचा समावेश झाला आहे त्यात अतुल गवांदे, इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा समावेश आहे.

·        बोस्टन येथील गवांदे यांनी बिइंग मॉर्टल - मेडिसिन अँड व्हॉट मॅटर्स द एंड हे पुस्तक लिहिले आहे, त्यात आधुनिक वैद्यकशास्त्रालाच आव्हान दिले असून कादंबरीतर लेखनात त्यांचे हे पुस्तक गाजते आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी थँक्सगिव्हिंग शॉपिंग कार्यक्रमात हे पुस्तक विकत घेतले असून वॉशिंग्टन पोस्टच्या पहिल्या दहा पुस्तकांच्या यादीत त्याचा समावेश आहे.

·        इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांनी गांधी बिफोर इंडिया हे पुस्तक लिहिले असून ते न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत आहे. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा विचार व त्याचे परिणाम यांचा ऊहापोह त्यात केला आहे.

·        दिल्लीत जन्मलेले अखिल शर्मा यांनी  निम्न आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिली असून फॅमिली लाईफ हे त्या पुस्तकाचे नाव आहे. कादंबरी व कविता क्षेत्रात त्याला स्थान मिळाले आहे. शोकांतिकेने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील तरूण माणूस संघर्ष करीत उभा राहण्याचा प्रयत्न करतो, असे त्याचे कथानक आहे.

·        भारतीय वंशाचे लेखक विक्रम चंद्रा यांना १९९६ मध्ये राष्ट्रकुल पुरस्कार मिळाला होता. त्यांचे गीक सब्लाइम- द ब्युटी कोड, द कोड ऑफ ब्युटी हे पुस्तक यादीत आहे. चंद्रा हे कादंबरीकार व प्रोग्रॅमर असून त्यांनी कला व तंत्रज्ञान यांचा संगम साधला आहे.

·        आनंद गोपाळ यांचे नो गुड मेन अमंग द लिव्हिंग- अमेरिका, द तालिबान अँड द वॉर थ्रू अफगाण आइज हे पुस्तक गाजते आहे. ते पत्रकार व लेखक आहेत. अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या चुकांवर ते आधारित आहे.

·        आनंद गिरिधरदास यांचे द ट्र अमेरिकन-मर्डर अँड मर्सी इन टेक्सास हे पुस्तक  यादीत असून त्यात ९/११ नंतर अमेरिकी स्वप्न कोसळले व नंतरची स्थिती यांचा विचार केला आहे.

·        मालदीवमध्ये जलशुद्धीकरणाचे मुख्य केंद्र आगीत खाक झाल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर मालदीवमधील जलसंकटावर मात करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी मालदीवची राजधानी माले येथे भारताने पाच जलवाहू विमानांद्वारे १,२०० टन शुद्ध पाणी तेथे पाठविले आहे.

·        भारताकडून प्रथमच एखाद्या देशाली इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

·        अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदावर अ‍ॅशटन कार्टर यांची नेमणूक आता निश्चित झाली आहे. त्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव अध्यक्ष ओबामा यांनी पाठवला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

·        घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ६० व्यक्ती पूर्णपणे अंध झाल्या असून याप्रकरणी संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया झाल्या त्या खासगी रुग्णालयाच्या व मथुरा येथील स्वयंसेवी संस्थेविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

·        मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करणाऱ्या मनजित सिंग यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

·        पीडित व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

·        जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात होत असलेले मतदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिरेक्यांनी काश्मीरच्या विविध भागांत हल्ले चढविले.

·        यात लष्करातील एक लेफ्टनट कर्नल व अन्य सात जवान तसेच तीन पोलीस हुतात्मा झाले तर एकूण आठ अतिरेकी मारले गेले. एका नागरिकालाही प्राणास मुकावे लागले.

·        हे हल्ले झाले असले तरी बारामुल्ला जिल्ह्य़ातील उरी व इतर सहा मतदारसंघात ९ डिसेंबरला ठरल्याप्रमाणेच मतदान होत असून पंतप्रधानांचा दौरा व सभाही ठरल्याप्रमाणे होणार आहे.

·        सरोदवादक उ. अमजद अली खान व त्यांचे दोन मुलगे अमान व अयान ११ डिसेंबरला ऑस्लो येथे नोबेल शांतता पुरस्कार वितरणाच्या वेळी त्यांची कला सादर करणार आहेत. त्यातून सुसंवाद, शांतता, अहिंसा यांचा संदेश खास तयार केलेल्या “शांतीरागा”तून देतील.

·        पाकिस्तानचे गायक उस्ताद राहत फतेह अली खान, ब्रिटनचे लोकप्रिय बॉली फ्लेक्स डान्सर्स हेदेखील आपली कला सादर करतील.

·        यंदाचा नोबेल पुरस्कार भारताचे कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई यांना विभागून दिला जाणार आहे.

·        ब्रिक्स व उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील विद्यापीठांच्या क्रमवारीत द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेने भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे.

·        द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग २०१५ या क्रमवारीनुसार बंगळुरू येथील द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस (आयआयएससी) या संस्थेचा शंभर विद्यापीठांच्या यादीत २५ वा क्रमांक लागला आहे.

·        पहिल्या क्रमांकावर चीनच्या पेकिंग विद्यापीठाचा क्रमांक लागला आहे.

·        पहिल्या चाळीस विद्यापीठात भारताची चार विद्यापीठे असून त्यात आयआयटी बॉम्बे, (३७), रूरकी (३८) व चंडीगडचे पंजाब विद्यापीठ (३९) यांचा समावेश आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा