चालू घडामोडी - २५ व २६ डिसेंबर २०१४

·        २५ डिसेंबर : सुशासन दिन (माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन)
·        भाजपचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला.
·        ओजस्वी वाणी लाभलेला कविमनाचा राजकारणी आणि सरस्वतीचे वरदान लाभलेला द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ व तेजस्वी स्वातंत्र्यसेनानी अशा दोन महानुभावांना एकाच वेळी हा सन्मान देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
·        २५ डिसेंबर रोजी वाजपेयी यांचा ९०वा वाढदिवस होता. याच दिवशी पं. मालवीय यांचीही १५३ वी जयंती आहे. याचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला या सन्मानाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
·        येत्या प्रजासत्ताक दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येईल.
·        विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन बुधवारी संपले. विधान परिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली.
·        पुढील अधिवेशन मुंबईत ९ मार्चपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
·        ८ ते २४ डिसेंबरदरम्यान झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांच्या प्रत्येकी १३ बैठका झाल्या.
·        दोन्ही सभागृहांत एकूण ११ विधेयके संमत झाली.
·        आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी) बंडखोरांच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ७० वर पोहोचली आहे. यात २१ महिला आणि १८ मुलांचा समावेश आहे.
·        केंद्र सरकारने एनडीएफबी वरील बंदी आणखी पाच वर्षासाठी वाढवली आहे.
·        महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) नागपूरमध्ये स्थापन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली.
·        नेचर या ख्यातनाम जर्नलने प्रसिद्ध केलेल्या २०१४ मधील जगातील १० सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचा समावेश करण्यात आला.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण मिशन’ या योजनेचे उद्घाटन केले.
·        मोठ्या प्रमाणात कुशल शिक्षकांची निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश असून या योजनेसाठी ९०० कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.
·        विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यावरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे आणि कोळसा खाणवाटप पुन्हा सुरु करण्यासाठीच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.
·        १०२व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे यजमानपद मुंबई विद्यापीठाला लाभले असून, विद्यापीठ प्रशासन या भव्य कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे.
·        विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणार्‍या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ११ नोबेल पारितोषिक विजेत्यांसह १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी होणार आहेत.
·        मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन डेव्हलपमेंट) ही या वेळच्या सायन्स काँग्रेसची थीम आहे.
·        राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर वैज्ञानिक प्रदर्शन भरविले आहे.
·        राज्यातील सर्व विद्यापीठे, भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर, आयआयटी, मुंबई, इस्त्रो यांसारख्या अनेक संस्था यात सहभागी होणार आहेत.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन व तीन जानेवारी रोजी पुण्यात येत आहेत. यावेळी ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील ‘ब्लू प्रिंट’ साठी बँकिंग क्षेत्रातील संचालक, तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
·        सन टीव्हीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) सी. प्रवीण यांना लैंगिक छळाच्या आरोपावरून शुक्रवारी सकाळी चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या विरोधात कंपनीच्या माजी महिला कर्मचाऱ्याने तक्रार केली होती.`
·        पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दोषी दहशतवाद्यांना फासावर चढवण्यास सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर, लाहोर हायकोर्टाने पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
·        पुणे येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स तसेच नागपूर येथील महाराष्ट्र अँटिबायोटिक्स या कंपन्यांसह देशातील बंद पडलेल्या औषध तसेच रासायनिक खतांच्या कंपन्या सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा