चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१४

·        बेंगळुरूमधील प्रसिद्ध चर्च स्ट्रीट येथे रविवार २९ डिसेंबर रोजी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाला आहे.
·        या बॉम्बस्फोटामध्ये एक महिला मृत्युमुखी पडली. याशिवाय आणखी एक जण जखमी झाला आहे.
·        स्फोटात बळी पडलेल्या भवानी देवी (३७) यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
·        हा बॉम्बस्फोट ISIS चा ट्विटर हॅंडलर मेहदी मसरूर बिस्वास याच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा घडवण्यात आला असावा, असा संशय खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केला आहे.
·        जगभरात फैलाव झालेल्या इबोला या जीवघेण्या रोगाला रोखणाऱ्या लसीची निर्मिती रशियाच्या संशोधकांनी केली आहे. लवकरच या लसीची चाचणी आफ्रिकेत इबोलाच्या रुग्णांवर घेण्यात येणार आहे.
·        रशियातील सेंट पिट्सबर्ग येथील ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एन्फ्लुएन्झा’ मधील शास्त्रज्ञांच्या गटाने इबोलारोधक लस तयार केली आहे. या लशीच्या चाचण्या घेण्याचे काम आफ्रिकेत सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात त्या पूर्ण होतील.
·        ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट’नुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताची क्रमवारी १५ने घसरून ८३ झाली आहे. World Economic Forum
·        वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे (डब्ल्यूईएफ) २००२ पासून जगभरातील देशांमधील तंत्रज्ञान उपलब्धता, पायाभूत सोयीसुविधा, मनुष्यबळ यांचा आढावा घेऊन ‘नेटवर्क रेडीनेस इंडेक्स’ प्रसिद्ध केला जातो. यावरून तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमध्ये जागतिक पातळीवरील विविध देशांच्या परिस्थितीचा अंदाज येतो.
·        सन २०१४च्या अहवालानुसार या क्रमवारीत भारत ८३व्या स्थानावर घसरला आहे. गेल्यावर्षी या क्रमवारीत भारत ६८व्या स्थानी होता.
·        फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे हे देश या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकांवर आहेत.
·        ‘ब्रिक्स’ देशांमध्येही (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) भारत सर्वात पिछाडीवर आहे. एकूण १४८ देशांचा या यादीमध्ये समावेश आहे.
·        लोकपाल कायद्यात अधिसूचित केलेल्या नव्या नियमानुसार देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःसह पत्नी आणि मुलांच्या नावे परदेशातील बँक खात्यात ठेवलेल्या पैशांचा तपशील जाहीर करावा लागणार आहे.
·        कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी या संदर्भात नवा फॉर्म जारी केला आहे. त्यात स्वतः कर्मचारी, त्याची पत्नी आणि मुले यांची संपत्ती, तसेच देणी यांचा तपशील द्यावा लागेल.
·        सरकारी कर्मचारी अधियम, २०१४ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्याची पत्नी, तसेच त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, देणी या बद्दलची माहिती ३० एप्रिल २०१५ पर्यंत द्यावी लागेल.
·        नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमातळावर जेट एअरवेजच्या विमानाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग किरकोळ असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
·        अमेरिका आणि ‘नाटो’च्या सैन्याने रविवारी अधिकृतपणे अफगाणिस्तान युद्धाला पूर्णविराम दिला. काबूल येथील लष्करी मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमानंतर याची घोषणा करण्यात आली.
·        ११ सप्टेंबर २००१ मध्ये अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर पाडल्यानंतर, अमेरिकेने अल-कायदाला आश्रय देणाऱ्या तालिबान सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य उतरविले होते. यामुळे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तब्बल १३ वर्षांच्या हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळाला.
·        आता १ जानेवारीपासून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल सिक्युरिटी इसिस्टंस फोर्स अफगाणिस्तानात कार्यरत राहणार आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याला तालिबानी दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी केवळ सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका ही फोर्स पार पाडणार आहे.
·        त्यात १३ हजार ५०० सैनिकांचा समावेश असणार असून, त्यातील बहुतांश अमेरिकेचे सैनिक असतील.
·        दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातDubai film festival देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ यंदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
·        आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गात विश्वविक्रम केला आहे.
·        नाशिकच्या कविता राऊतने २५ किलोमीटर अंतराच्या पहिल्यावहिल्या कोलकाता मॅरेथॉनमध्ये महिला गटात सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कविताने ही शर्यत १ तास ३३ मिनिटे आणि ३९ सेकंदांत पूर्ण केली.
·        शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जळगावच्या विजय चौधरीने पुणे जिल्ह्याच्या सचिन येळभरचा अवघ्या एक गुणाने पराभव करीत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान पटकावला.
·        ५८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजय ४१ वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
·        आसाममधील बोडो दहशतवाद्यांच्या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी केंद्र आणि आसाम राज्य सरकारने आता संयुक्‍त लष्करी कारवाईला प्रारंभ केला असून, आसाम रायफल्स, निमलष्करी दले आणि आसाम पोलिस यांनी “ऑपरेशन ऑल आउट” ही मोहीम सुरू केली आहे.
·        जगात सर्वांत मोठे सर्चइंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलच्या बहुचर्चित स्वयंचलित कार ‘गुफी’चे गेल्या आठवड्यात सादरीकरण करण्यात आले आहे.
·        गुगलने तयार करण्यात आलेल्या या मोटारीचा हा नमुना असून, नव्या वर्षात या मोटारीची चाचणी सॅन फ्रॅन्सिस्को येथील बे एरियामध्ये सार्वजनिक रस्त्यांवर केली जाणार आहे.
·        बाबरी मशीदप्रकरणातील सर्वात वयोवृद्ध याचिकाकर्ते मोहम्मद फारूक यांचे येथे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी ते एक होते.
·        दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले व “एक दुजे के लिए”या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक के. बालचंदर यांचे नुकतेच निधन झाले.
·        तमिळ चित्रपटसृष्टीमधील पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते.
·        चित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०१०मध्ये सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा