चालू घडामोडी - १३ एप्रिल २०१५


  • १३ एप्रिल १९१९ : जालियानवाला बाग हत्याकांड

    सानिया मिर्झा दुहेरीच्या वैयक्तिक जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर
  • भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा दुहेरीच्या वैयक्तिक जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर आली. 
  • सानियाने सर्कल करंडक टेनिस स्पर्धेत मार्टिना हिंगीसच्या साथीत महिलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावत ही ऐतिहासिक कामगिरी केली. 
  • टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली. 
  • स्पर्धेत अव्वल मानांकित असणाऱ्या सानिया-हिंगीस जोडीने कॅसे डेल्लाक्वा-दारिया युरॅक जोडीचा पराभव केला.
  • या विजेतेपदामुळे सानियाने ४७९ मानांकन गुणांची कमाई केली. तिचे आता एकूण ७,९६५ गुण झाले असून, तिने इटलीच्या सारा एर्रानी (७,६४०) आणि रॉबर्टा व्हिन्सी (७६४०) या दोघींना मागे टाकले.
  • सानिया मिर्झा कारकीर्द : ३३२ दुहेरीतील विजय | २५ डब्ल्यूटीए विजेतीपदे | ४ आयटीएफ विजेतीपदे | ३ मिश्र दुहेरीतील विजेतीपदे 
  • मिश्र दुहेरीची विजेतीपदे : ऑस्ट्रेलियन ओपन (२००९), फ्रेंच ओपन (२०१२), अमेरिकन ओपन (२०१४) दोहा (२००६), इन्चॉन (२०१४) आशियाई क्रीडा स्पर्धेत 
  • सुवर्णपदक : ऑफ्रो-आशियाई स्पर्धेत २००३ मध्ये महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी आणि सांघिक अशा चारही विभागांत सुवर्णपदक
  • पहिली महिला टेनिसपटू : सानिया मिर्झा ही अव्वल मानांकन पटकाविणारी पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. तिच्यापूर्वी केवळ लिएँडर पेस आणि महेश भूपती यांनी ९०च्या दशकांत दुहेरीत असे वर्चस्व राखत अव्वल मानांकन मिळविले होते. ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारीदेखील सानिया पहिली टेनिसपटू ठरली आहे. 
  • हिंगीसच्या साथीत सानियाचे हे तिसरे विजेतेपद ठरले. मार्चमध्ये ही जोडी एकत्र आल्यापासून एकही लढत हरलेली नाही. त्यांनी एकत्रित सर्वप्रथम इंडियन वेल्स स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. पाठोपाठ त्यांनी मियामी टेनिस स्पर्धा जिंकली आणि आता सर्कल टेनिस स्पर्धेचाही विजेतेपदाचा मुकुट परिधान केला.

  • भारताच्या नेमबाज जीतू राय याने चॅंगवॉन (कोरिया) येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात ब्रॉंझपदकाची कमाई केली. 
  • आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या जीतूला  एकूण १८१.१ गुणासह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. 
  • कोरियाच्या जीन जॉंघ याने २०६ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. म्यानमारचा नौंग ये टुन (२०१) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 
  • गेल्या वर्षी जून महिन्यापासून नेमबाजीला सुरवात केल्यानंतर जीतूचे हा सातवे आंतरराष्ट्रीय पदक आहे. 

  • जम्मू काश्मीर राज्यातील महिला अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याने ‘अदिती वेल्फेअर इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट’कडून ‘सहेली’ नावाची स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 
  • केवळ जम्मूतील महिलांसाठी ही हेल्पलाइन असेल, अशी माहिती या ट्रस्टच्या अध्यक्षा अदिती शर्मा यांनी दिली. 
  • या हेल्पलाइनच्या माध्यमातून महिलांमधील सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध करून दिली जाईल. 
  • याशिवाय महिलांना घरगुती समस्यांच्या निराकरणासाठी कायदेशीर मार्गदर्शनही करण्यात येईल, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

  • हिंदी भाषेचा जागतिक भाषा म्हणून प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेत आंतरराष्ट्रीय हिंदी केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
  • भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणणे तसेच अमेरिकेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करणे, असे या हिंदी केंद्राचे उद्दिष्ट असणार आहे. 
  • न्यूजर्सी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेमध्ये भारताचे अमेरिकेतील वाणिज्य दूत ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी या हिंदी केंद्राला भारत सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 
  • या वेळी शिक्षण, व्यापार यांसह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. हिंदी केंद्र उभारण्याचा झालेला ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला.

  • भारताने सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत ब्रॉंझपदकापर्यंत मजल मारली. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात त्यांनी पेनल्टीवर कोरियाचा ४-१ असा पराभव केला. 
  • नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताने श्रीजेशच्या गोलरक्षणाच्या जोरावर बाजी मारली.

  • महावीर चक्र विजेते आणि १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात कौतुकास्पद कामगिरी केलेले माजी लेफ्टनंट जनरल हनुत सिंह यांचे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.
  • ‘संत जनरल’ या नावानेही त्यांना ओळखले जात, ते ध्यानधारणा करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
  • हनुत सिंह हे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे चुलत भाऊ होते, त्यांचा जन्म बदमेर येथे झाला होता. डेहराडून येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते लष्करात दाखल झाले होते.

  • शिक्षण संपल्यानंतरही भारतीय विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे फ्रान्समध्ये वास्तव्य करण्यास परवानगी देण्याबाबतच्या सामंजस्य करारावर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 
  • या करारामुळे शिक्षण संपल्यानंतरही भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये दोन वर्षे वास्तव्य करता येणार आहे. त्याच वेळी भारतात शिक्षण घेणाऱ्या फ्रेंच विद्यार्थ्यांना आता पुढील दोन वर्षे भारतात वास्तव्य करण्यास परवानगी मिळणार आहे. 
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान हा करार झाला असून, त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच फ्रेंच विद्यार्थ्यांनाही होणार आहे.

  • इराकमधील सर्वांत मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने जोरदार आत्मघातकी हल्ला चढविला आहे. बैजी येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही ‘इसिस’ने हल्ला चढविला आहे. मात्र, येथील इराकी सैन्याच्या तुकडीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

  • बांगलादेश मुक्तीसंग्रामावेळी हत्याकांड घडवून आणल्याबद्दल जमाते इस्लामी या संघटनेचा नेता महंमह कमरुझ्झमान याला बांगलादेश सरकारने फाशी दिली. 
  • कमरुझ्झमान हा संघटनेचा मोठा नेता असल्याने फाशी नंतर त्याच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप आहे.

  • तस्करी करून मलेशियात पाठविण्यात येणारी अतिशय दुर्मिळ जातीची १८३ कासवे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त केली. 
  • याप्रकरणी सय्यद इब्राहिम सिकंदर आणि शहाजहान नैना महम्मद या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. 
  • ‘बेंगाली कालो-काथा’ या नावाने परिचित असलेल्या या कासवांची किंमत १ लाख ८३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा