चालू घडामोडी - २९ मार्च २०१५


    Delhi CM Arvind Kejriwal launches E-Ration Card in delhi
  • देशात प्रथमच राजधानी नवी दिल्लीत ‘ई रेशनकार्ड सेवा’ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. 
  • दिल्लीतील नागरिकांना ई रेशनकार्डमुळे सुविधा घेणे सोईचे होणार आहे. रेशनिंगची गरज असलेल्या लाभार्थींना या सुविधेमुळे खूप फायदा होणार आहे. 
  • दिल्ली सरकारने नागरिकांना या सोईचा फायदा घेण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्याला तत्काळ मंजुरी देऊन, त्याचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. 
  • सरकारच्या या निर्णयामुळे रेशनवरील काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

    Aziz Quereshi
  • मिझोरामचे राज्यपाल अझीझ कुरेशी यांना पदावरून दूर करण्यात आले. पदावरून हटविण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा केंद्राबरोबर संघर्ष सुरू होता. 
  • नव्या राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे मिझोरामच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
  • कुरेशी यांचा मिझोरामच्या राज्यपालपदाचा कालावधी मे २०१७ पर्यंत होता. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर गुजरातच्या तत्कालीन राज्यपाल कमला बेनिवाल यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि नंतर त्यांना हटविण्यात आले. 
  • पदावरून हटविण्यात आलेले कुरेशी हे दुसरे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांचीही मिझोरामला बदली झाली होती; पण पदभार स्वीकारण्याचे नाकारून त्यांनी राजीनामा दिला होता. 

  • संरक्षण मंत्रालयाने दोन एअरबस-३३० या विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विमानांची किंमत ५,१०० कोटी रुपये असणार आहे. ही विमान खरेदी म्हणजे भारताच्या ऍवॅक्‍स यंत्रणेची (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम) सुरवात असल्याचे मानले जात आहे. 
  • तसेच इतर दोन प्रस्तावांमध्ये लष्करासाठी भूसुरुंग शोधण्याची यंत्रणा खरेदी आणि नौदलासाठी हार्पून क्षेपणास्त्र खरेदी यांचा समावेश आहे. 
  • याशिवाय भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडकडून १,६०५ कोटी रुपयांचे स्वाती हे रडार घेण्याचाही निर्णय झाला आहे. 
  • पाकिस्तान आणि चीन हे आपापली लष्करी ताकद वाढवत असल्याने ऍवॅक्‍स कार्यक्रम सुरू करण्याला महत्त्व आले आहे. भारताचा ऍवॅक्‍स कार्यक्रम संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) राबविला जाणार आहे. 
  • सुरवातीला दोन एअरबसची खरेदी होणार असली, तरी भविष्यात आणखी चार विमाने घेण्याचा भारताचा विचार आहे.
  • तसेच या विमानांवर सर्व बाजूंचा वेध घेऊ शकणारे अत्याधुनिक रडारही बसविण्यात येणार आहे. 
  • पाकिस्तानकडे ऍवॅक्‍स कार्यक्रमांतर्गत चार विमाने असून, चीनकडे अशी वीस आहेत.

  • येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना हवाईमार्गे परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये केरळमधील काही नागरिकांचाही समावेश आहे.

  • महाराष्ट्र आणि ओडिशातील प्रकल्पांसाठी सुमारे २ हजार ७६० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा जपानच्या भारतातील दूतावासातर्फे करण्यात आली. 
  • पुण्यातील मुळा-मुठा नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्याचा प्रकल्प आणि ओडिशातील रेंगाली सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.

  • सिंगापूरचे महान नेते आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्यावर होत असलेल्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत.

  • ‘आम आदमी पक्षा’च्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मतदानाद्वारे योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, अजित झा, प्रा. आनंदकुमार यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची हकालपट्टी करण्यात आल्याने ‘आप’वर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले. 
  • मात्र, या बैठकीमध्ये केजरीवाल यांना विरोध करणाऱ्यांवर बाऊन्सर्सद्वारे लाथाबुक्‍क्‍यांचा वर्षाव झाल्याने केजरीवाल समर्थकांवर गुंडगिरीचा आरोप यादव व भूषण यांनी केला आहे.

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ‘आप’चा राजीनामा दिला. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा निषेध करत मेधा पाटकर यांनी ‘आप’च्या नेतृत्वावर तोफ डागत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

  • भोपाळ येथील बरकतुल्ला विद्यापीठाने अफगाणिस्तानातील शेख झायेद विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. यामुळे या अफगाणिस्तानातील त्यांच्या विद्यापीठ परिसरात बरकतुल्ला विद्यापीठाचे केंद्र सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

  • सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येमेनमध्ये लष्करी कारवाया करणाऱ्या फौजांना पाठिंबा देण्याबाबत पाकिस्तानने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. परंतु, पाकिस्तानी जंबो जेट विमाने येमेनकडे रवाना झाली आहेत. 
  • येमेनमधील शेकडो पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही विमाने पाठिवण्यात येत असल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • सौदी अरेबियाने अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना येमेनमधून बाहेर काढले. संयुक्त राष्ट्रसंघानेही आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांना तेथून बाहेर काढले आहे. 
  • इराणी पाठिंब्यावर येमेनवर ताबा मिळवू पाहणाऱ्या हौती फौजांना रोखण्यासाठी सौदीप्रणित फौजा गेल्या तीन दिवसांपासून हल्ले करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा