चालू घडामोडी - २ व ३ मे २०१५


  • ३ मे - आंतरराष्ट्रीय सूर्य दिन | जागतिक श्वसनदाह निवारण दिन | पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन
  • ३ मे - जागतिक हास्य दिन (मे महिन्यातला पहिला रविवार)

    E Visa
  • फ्रान्स आणि कॅनडा या देशांचा व्हिसा मिळवण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे भारतीयांना ई-व्हिसा मिळणाऱ्या देशांची संख्या आता ७६ झाली आहे. 
  • भारताच्या ई–व्हिसा कार्यक्रमाअंतर्गत या वर्षीच्या अखेरपर्यंत १५० देशांचा समावेश करण्याची सरकारची योजना आहे. भारताने फ्रान्स, कॅनडासहीत आणखी ३१ देशांना १ मेपासून  ई-टुरिस्ट व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • भारताने २७ नोव्हेंबर २०१४पासून ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ विमानतळांवर ४५ देशांसाठी ई-व्हिसा देण्याची व्यवस्था आहे. १ मे पासून या देशांची संख्या आता ७६ वर गेली आहे. म्हणजे जगातील ४० टक्के देशांसाठी ई-व्हिसा मिळू लागला आहे. ई-व्हिसा देण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत १ लाख १० हजार लोकांना  ई-टुरिस्ट व्हिसा देण्यात आला आहे.  
  • काय आहे ई-व्हिसा?
    • कोणत्याही देशाचा प्रवास करण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे व्हिसा मिळण्यासाठी दूतावासात अर्ज करावा लागतो. त्यानंतर अनेक दिवसांच्या तपासणीनंतर व्हिसा दिला जातो. 
    • मात्र केंद्र सरकारने पर्यटनाला चालना देण्यास व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली. यामुळे तत्काळ व्हिसा मिळण्यास अडचण येत नाही. भारत सरकारच्या indianvisaonline.gov.in या वेबसाइटवर ई- व्हिसासाठी अर्ज करता येतो.

  • संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार देशांची क्रमवारी जाहीर केली असून त्यात १५८ देशात भारताचा क्रमांक ११७ वा लागला आहे. 
  • जागतिक सुख-समाधान निर्देशांकात देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयु:मर्यादा, सामाजिक आधार व जीवनातील पर्यायांच्या निवडीतील स्वातंत्र्य या निकषांचा विचार केला जातो. स्वित्झलंडने सुखी-समाधानी देशात जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. सस्टेनेबल 
  • डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्क म्हणजे ‘एसडीएसएन' या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या वतीने हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो. २०१५ या वर्षांचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 
  • सुखी-समाधानी देशांच्या यादीत आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे व कॅनडा यांचा पहिल्या पाचात समावेश आहे. भारत ११७ वा असून पाकिस्तान ८१ वा आहे. पॅलेस्टाइन (१०८), बांगलादेश (१०९), युक्रेन (१११) इराक (११२) या प्रमाणे इतर देशांची क्रमवारी आहे. 
  • भारताचा क्रमांक २०१३ च्या तुलनेत सहा स्थानांनी घसरला आहे, त्यावेळी भारताचा क्रमांक १११ वा होता.

  • पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत पाचसूत्री गुंतवणूक योजनेवर भारत आणि जपान या दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. 
  • या योजनेनुसार भारतातील मोजक्या वसाहतींचे रुपांतर जपान औद्योगिक वसाहतींमध्ये करेल. पायाभूत सुविधांचा विकास, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, युद्धकौशल्य क्षेत्रात सहकार्य आणि आशिया-पॅसिफिक आर्थिक एकिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याच्या प्रस्तावाचाही यांत समावेश आहे.
  • जपानी कंपन्या पुढील पाच वर्षांमध्ये भारतात साधारणत: ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. या करारानुसार जपानी उद्योजकांकडून तत्काळ ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • या परस्पर सहकार्य करारावर व्यापार आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण तसेच जपानचे आर्थिक व्यापार आणि औद्योगिक मंत्री योइची मियाजावा यांनी हस्ताक्षर केले.

  • सद्यस्थितीला अणूपासून विद्युतउर्जा निर्माण करणारे जगात ३१ देश आहेत. आंतरराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सीच्या (IAEA) पावर रिअॅक्टर सूचना प्रणाली (PRIS) द्वारे २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार अणूपासून विद्युत उर्जा निर्मितीमध्ये भारताचा १३वा क्रमांक लागतो.
  • जगभरातील कार्यरत अणुभट्ट्याच्या संख्येनुसार भारताचा ७वा क्रमांक लागतो. 
  • सध्याची अणुउर्जेची क्षमता ५७८० मेगावॅट असून २०१९ पर्यंत सध्याच्या प्रगतीशील योजना पूर्ण झाल्यास वाढून ती १००८० मेगावॅट होणार आहे. सरकारने ३४०० मेगावॅट क्षमतेच्या अजून दोन योजनांना मंजुरी दिली आहे. 
  • ही सर्व माहिती प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री तसेच कार्मिक व पेंशन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेन्द्र सिंह यांनी राज्यसभेतील एका अतारांकित प्रश्नांचे लिखित उत्तर स्वरूपात दिली.

  • गिलानी यांनी त्राल येथे १ मे रोजी अमरनाथ यात्रेच्या विरोधात काढलेल्या रॅलीदरम्यान पाकिस्तानचा झेंडा फडकविल्याची घटना घडली आहे. अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांऐवजी एक महिना करावा, अशी फुटीरतावाद्यांची मागणी आहे. याविरोधात त्यांनी रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान किमान १५ ते २० पाकिस्तानी झेंडे फडकत होते. 
  • सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी दिले आहे. गिलानी यांच्या या कृतीचा निषेध करताना अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढत गिलानींच्या अटकेची मागणी केली होती.
  • गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये रॅलीदरम्यान पाकिस्तानी झेंडा फडकावल्याप्रकरणी मसरत आलमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  • अमरनाथ यात्रेबाबत असलेली गिलानी यांची मागणीही मुख्यमंत्री सईद यांनी फेटाळून लावली आहे. अमरनाथ यात्रा हा जम्मू काश्मीरच्या संस्कृतीचा भाग असल्याने ती नियोजनाप्रमाणेच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचा झेंडा फडकाविल्याच्या घटनेचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.

  • आपत्कालीन क्रमांकासाठी राखीव असलेला १११ क्रमांक अखेर वोडाफोनने बदलला आहे. त्याऐवजी कॉलिंग आणि एसएमएससाठी १९९ हा नवीन क्रमांक ग्राहकांना वापरता येईल. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने या क्रमांकावरून देण्यात येणारी सेवा वोडाफोनने रद्द करावी, असे आदेश एप्रिलमध्ये दिले होते. 
  • हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आल्याचा एसएमएसही वोडाफोन कंपनीने ग्राहकांना पाठवला आहे. राष्ट्रीय आपत्काली क्रमांकापैकी १११ हा राखीव क्रमांक असल्याने ग्राहकांनी कॉलिंग आणि एसएमएससाठी हा हेल्पलाईन क्रमांक वापरू नये, असे वोडाफोनने कळवले आहे.
  • ट्रायने इंटिग्रेटेड एमर्जन्सी कम्युनिकेशन ऍण्ड रिस्पॉन्स सिस्टिमअंतर्गत युनिव्हर्सल सिंगल नंबरसाठी शोध सुरू केला होता. त्यात १०१ आणि १०८ या आग, अपघात आणि वैद्यकीय मदतीशी संबंधित क्रमांकापैकी एक क्रमांक अंतिम करण्याचा सल्लाही अपेक्षित आहे. १११ क्रमांक नसल्यानेच ट्रायने ११२ क्रमांक आपत्कालीन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • सध्या देशभरात एमर्जन्सी क्रमांकात १०० क्रमांक पोलिसांसाठी तर १०१ क्रमांक आगीशी संबंधित आहे. 
  • अमेरिका आणि इंग्लंड यांसारख्या देशांत एकच एमर्जन्सी क्रमांक असतो. त्याच धर्तीवर भारतातही एकच क्रमांक देण्याचा ट्रायचा मानस आहे.

  • नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर काठमांडू जिल्हा प्रशासनाने प्राणी व पक्षी कापून मांस विकण्यावर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये झालेल्या भूंकपामध्ये सहा हजारांहून अधिकजण मृत्युमुखी पडले असून, दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. 
  • नेपाळमध्ये भूकंपानंतर जोरदार पाऊसही पडला आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली आहे. पशू व पक्षी कापून त्यांचे मांस विकण्यास बंदी घातल्याची नोटीस प्रशासनाने जारी केली आहे.

  • माजी अध्यक्ष महंमद नशीद यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या मोर्चात हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्ष नेत्यांसह १९३ जणांना अटक केली. 
  • न्यायाधीशांना अटक करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी नशीद सध्या तुरुंगात आहेत. नशीद यांना चुकीच्या आरोपांखाली अटक झाली असून, सुनावणीही पक्षपाती झाल्याची टीका त्यांच्या समर्थकांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या सुनावणी प्रक्रियेवर टीका केली होती.

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ‘निरामय‘ योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यात येणार आहेत. 
  • या योजनेतून तीन सरकारी रुग्णालयांना औषधे पुरविली जाणार आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचाही समावेश आहे. ३० जिल्हा रुग्णालये आणि भुवनेश्वर आणि रूरकेला येथील सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे. 
  • राज्य सरकारने या योजनेसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मोफत देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये कर्करोग आणि हृदय विकारावरील औषधांचाही समावेश आहे.

  • येमेनमधील दुसरे सर्वांत महत्त्वाचे शहर असलेल्या एडनमध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या फौजांनी शियापंथीय हौथींविरोधात लढणाऱ्या माफिया संघटनांच्या मदतीसाठी फौजेची कुमक पाठवली आहे. 
  • येमेनचे पदच्युत अध्यक्ष अब्द रब्बु मन्सूर हादी यांच्याशी या संघटना एकनिष्ठ आहेत. येमेनमध्ये हौथींविरोधात सौदीप्रणीत आघाडीने गेल्या २६ मार्चपासून जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच येमेनच्या भूमीवर सैन्य उतरविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा