चालू घडामोडी - ८ मे २०१५


  • ८ मे : जागतिक रेडक्रॉस दिन

    Achal kumar Jyoti
  • गुजरातचे माजी मुख्य सचिव अचल कुमार ज्योती यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • गुजरातमध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळणारे ६२ वर्षीय ज्योती हे जानेवारी २०१३ मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते. पदभार स्वीकारताक्षणी ज्योती यांची निवडणूक आयुक्तपदाची इनिंग सुरू होईल.

  • बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा अठरावरून सोळा करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला लोकसभेने मान्यता दिली.
  • बाल गुन्हेगार न्याय (लहान मुलांची काळजी आणि संरक्षण) विधेयकातील वादग्रस्त तरतूद रद्द करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर सभागृहाने हे विधेयक संमत केले.
  • एखाद्या सोळा ते अठरा वयोगटातील बाल गुन्हेगाराने गुन्हा केला असेल आणि त्याला २१ व्या वर्षी पकडण्यात आल्यास त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेनुसार खटला भरण्यात येईल, त्यासाठी बाल गुन्हेगार कायद्याचा आधार घेतला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.

  • नेपाळमधील विनाशकारी भूकंपाने हजारो जणांचा बळी जाण्याबरोबरच जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टचीही २.५ सेमीने उंची घटल्याची शक्यता उपग्रहाकडून आलेल्या माहितीवरून व्यक्त होत आहे. ही माहिती युरोपच्या सेंटिनेल १ ए रडार उपग्रहावरून मिळाली आहे.
  • भूकंपाबद्दल उपग्रहावरून याआधी आलेल्या माहितीमध्ये नेपाळचा काही भाग एक मीटर उत्तरेकडे सरकल्याचे समजले होते. यावरून भूकंपाची तीव्रताही लक्षात आली होती.
  • पुढील काही आठवड्यात अनेक चाचण्या घेऊन या अंदाजाबाबत विश्वसनीय माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

  • चार महिला क्रीडापटूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एक मृत्युमुखी पडली.
  • केरळमधील या नवोदित चार क्रीडापटूंनी १२ विषारी फळे खाल्ली असल्याचा संशय आहे. प्रशिक्षण केंद्रात छळवणूक झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्या चौघींपैकी अपर्णा रामचंद्रनचे निधन झाले आहे.
  • या चारही मुली अलपुझा येथील वॉटर स्पोर्टस्‌ सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होत्या. त्या रोइंगमध्ये चमकदार कामगिरी करतील, अशी आशा होती.

  • ‘शार्ली हेब्दो’ या फ्रेंच नियतकालिकावर झालेल्या हल्ल्याचा ‘मास्टरमाईंड‘ दहशतवादी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ठार झाल्याची माहिती ‘अल कायदा‘ या दहशतवादी संघटनेने दिली.
  • ‘अल कायदा’च्या एका व्हिडिओमध्ये याचा उल्लेख झाला आहे. येमेनमध्ये ‘लढत‘ असताना ‘अल कायदा‘चा नासेर बिन अली अल-अन्सी हा त्याच्या मोठ्या मुलासह ठार झाला, असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये आहे.
  • महंमद पैगंबरांचे व्यंग्यचित्र प्रसिद्ध करणाऱ्या ‘शार्ली हेब्दो’ या फ्रेंच नियतकालिकावर ७ जानेवारी रोजी हल्ला झाला होता. त्यात पत्रकार आणि पोलिसांसह १२ जण मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याचा ‘मास्टरमाईंड’ अन्सी होता. अशा स्वरूपाचा दावा त्याने १४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे केला होता.

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी चिन्मयानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिक्षण आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या स्मरणार्थ नाण्याचे अनावरण दिल्ली येथे केले.
  • स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म ८ मे १९१६ रोजी झाला होता. ते एक हिंदू धर्मगुरू होते व त्यांनी चिन्मय मिशनच्या स्थापनेसाठी प्रेरणा दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा