चालू घडामोडी - २९ जून २०१५


जयललितांच्या हस्ते चेन्नई मेट्रोचे उद्घाटन
    Chennai Metro
  • चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेचे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी २९ जून रोजी उद्घाटन केले. यामुळे चेन्नईकरांसाठी प्रथमच मेट्रो सेवा उपलब्ध झाली आहे.
  • चेन्नई मेट्रोचे उद्घाटनाचे यापूर्वी अनेक मुहूर्त चुकले आहेत. अखेर आज चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीला सुरवात झाली. मेट्रो सेवा सुरू झाल्याने चेन्नईतील नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. 
  • कोयंबेदू आणि आलंदूर या दोन स्थानकांदरम्यान १० किलोमीटरच्या अंतरावर ही मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर ७ स्थानके आहेत.
  • या मार्गावर ९ मेट्रो धावणार आहेत. प्रत्येक मेट्रो रेल्वेत १ हजार २७६ प्रवासी नेण्याची क्षमता आहे. 
  • १० रुपये कमीत कमी तर ४० रुपये जास्तीत जास्त भाडे या रेल्वेत आकारले जाणार आहे. अलंदूरपासून हा मेट्रो रेल्वे मार्ग चेन्नई विमानतळापर्यंत वाढविला जाणार आहे.
  • चेन्नईतील पहिली मेट्रो रेल्वे महिला चालक ए. प्रीती ठरली आहे.
  • या मेट्रो मार्गाचे ऑक्टोबर २०१४ मध्ये उद्घाटन होणार होते. त्यानंतर हे उद्घाटन मार्च २०१५ मध्ये लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर २९ जून रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले.
  • मेट्रो सेवा असलेले चेन्नई हे देशातील सातवे शहर ठरले आहे. यापूर्वी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, बेंगळूरू, गुरगाव, जयपूर या शहरात मेट्रो सुरु झालेली आहे.

‘रॅम’मध्ये नाशिकचे महाजन बंधू विजयी
    Doctor brothers from nashik finish worlds toughest cycle race
  • ‘रेस अक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही जगातील सर्वात कठीण सायकल शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात नाशिकचे महेंद्र व हितेंद्र महाजन हे डॉक्टर बंधू यशस्वी ठरले आहेत. महाजन बंधूंनी आठ दिवस १४ तास आणि ५५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली.
  • ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच भारतीय जोडी पात्र ठरली होती. ३२ वर्षांची परंपरा असलेल्या सायकल स्पर्धेत महाजन बंधूंनी ४, ८२८ किलोमीटर अंतर नियोजित वेळेच्या बारा तास अगोदर पार केले.
  • या शर्यतीला मेरीलँड अटलांटिक कोस्ट मधून सुरुवात झाली व त्यांच्या वाटेत कॅलिफोर्नियातील जंगल, मोजावे येथील वाळवंट व कोलोरॅडो येथील उंच पर्वतरांगा आणि मध्य अमेरिकेतील वारे यांचा अडथळा होता. वादळी पाऊस आणि विजांच्या भयावह गडगडाटाशी मुकाबल करत कुबरलॅंड आणि हॅंकॉकचे कठीण अंतर त्यांनी पार केले. स्पर्धेचा वॉशिंग्टन मेरी लॅंड परिसरात समारोप झाला.
  • ३९ वर्षाचे डॉ. हितेंद्र हे व्यवसायाने दंत चिकित्सक आहेत तर त्यांचे ४४ वर्षीय बंधू डॉ. महेंद्र हे भूलतज्ञ आहेत. रेस अक्रोस अमेरिकेच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी ही शर्यत २३.३६ किमी प्रती तास इतक्या वेगाने सायकल चालवत पूर्ण केली.
  • यापूर्वी स्पर्धेतील सोलो म्हणजेच एकट्याने सहभागी होण्याच्या यादीमध्ये बंगळुरू येथील शमीम रिझवी व अलीबाग येथील सुमित पाटील हे सहभागी झाले होते. पण ते ही शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ही शर्यत पूर्ण करण्याचा प्रथम भारतीयांचा मान महाजन बंधूंना मिळाला आहे.
  • ‘टुर-दी-फ्रान्स’प्रमाणे ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही शर्यत अनेक दिवस चालणारी असून या शर्यतीमध्ये स्पर्धकांना सलग सायकल चालवावी लागते. स्पर्धकांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची कठोर परीक्षा घेणारी ही शर्यत जगातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा समजली जाते.

ज्वाला-अश्विनी जोडीला 'कॅनडा ओपन'चे जेतेपद
    Jwala Gutta, Ashwini Ponappa
  • भारताच्या ज्वाला गुट्टा-अश्विनी पुनप्पा जोडीने हॉलंडच्या प्रथम मानांकित मुस्केन्स आणि सेलेना पेईक जोडीचा पराभव करत प्रतिष्ठेच्या कॅनडा ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.  
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ज्वाला आणि अश्विनी जोडीने एफ.जे. मस्किन्स व सेलेने पिएक यांचा २१-१९, २१-१६ असा पराभव करत या स्पर्धेच्या महिला दुहेरीचा खिताब पटकावला.
  • पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी अश्विनी व ज्वालाला कडवी लढत दिल्याने त्यांनी तो सेट २१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जिंकला. 
  • मात्र त्यानंतर अश्विनी व ज्वालाने आपले वर्चस्व राखत दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. अवघ्या ३५ मिनिटांत या सामन्याचा निकाल लागला.

स्मॉल फॅक्टरी विधेयक
  • चाळीस कामगारांहून कमी कामगार असणाऱ्या उद्योगांना छोट्या उद्योगांचा दर्जा देऊन त्यांना कामगार कायद्यांतून सूट देणारे अत्यंत महत्त्वाचे विधेयक केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे. 
  • पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात २१ जुलैपासून सुरू होणार असून या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल. 
  • स्मॉल फॅक्टरी (फॅसिलिटेशन अँड रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस) बिल असे या प्रस्तावित विधेयकाचे नाव आहे. 
  • सध्या हे विधेयक मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठवण्यात आले आहे. एका ठिकाणी किंवा शाखा नसलेल्या छोट्या कारखान्यांना लागू होणाऱ्या कामगार कायद्यांतील तरतुदी एकत्र करून हे विधेयक तयार करण्यात आले आहे. 
  • याच अधिवेशनात बाल कामगार (प्रतिबंधन व नियमन) सुधारणा विधेयक, २०१२ देखील मांडले जाणार आहे. याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे १४ वर्षे वयाखालील मुलांना कारखान्यात कामावर ठेवणे हा गुन्हा समजला जाईल, मात्र अशा मुलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात काम करता येईल. 
स्मॉल फॅक्टरी विधेयकातील तरतुदी 
  • पगार बँक खात्यात जमा करावा. 
  • कामगारांना सामाजिक सुरक्षितता द्यावी. 
  • पाच कामगारांपेक्षा कमी कामगार असलेल्या कारखान्यांना शिफ्ट, हजेरी व लेटमार्क यांचे बंधन राहणार नाही.

भारतीय रेल्वे, लष्कर सर्वाधिक रोजगार देणारे
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वांत मोठ्या रोजगार देणाऱ्या संस्थांचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • त्यानुसार भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या दोन संस्थांची गणना जगातील सर्वांत मोठ्या रोजगार देणाऱ्या पहिल्या दहा संस्थांमध्ये झाली आहे.
  • या अहवालात भारतीय रेल्वेला आठवे स्थान देण्यात आले आहे. रेल्वेने एकूण १४ लाख लोकांना रोजगार दिला आहे. त्याखालोखाल भारतीय लष्कर १३ लाख लोकांना रोजगार देते, असे या अहवालात म्हटले आहे.
  • या अहवालानुसार अमेरिकेचे संरक्षण खाते हे जगातील सर्वांत मोठा रोजगार देत आहे. या खात्यात ३२ लाख लोकांना अधिकृतपणे रोजगार दिला जातो असा दावा करण्यात आला आहे. 
  • तसेच, चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मी (२३ लाख), वॉलमार्ट (२१ लाख) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

कर्जबुडव्यांना अटक करण्यासाठी नियम
  • बँकांकडून कर्जे घेऊन ती योग्य मुदतीत परत न करणाऱ्या, खोटे पत्ते देऊन पोबारा करणाऱ्या आणि त्यायोगे बँकांना फसवणाऱ्या कर्जबुडव्यांवर फौजदारी कारवाई करता यावी आणि वेळ पडल्यास त्यांना अटकही करता यावी व अशी कारवाई करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी रिझर्व्ह बँक केंद्रीय अर्थ मंत्रालयाबरोबर आखणी करत आहे.
  • देशातील बँकांनीही कर्जांची पुनर्रचना करण्यापूर्वी फसवेगिरीला आळा बसावा यासाठी अंतर्गत उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 
  • फसवणूक करणाऱ्या कर्जदारांची माहिती बँकेला असणे आवश्यक आहे. अशा कर्जदारांवर कारवाई करता यावी यासाठी चौकशी पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी असावा, असे रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सुचवले आहे.

तेलंगणाच्या शाळेत नरसिंहरावांवर धडा
    Narasimha Rao
  • माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील इतिहास तेलंगणाच्या शाळेमधून शिकविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे.
  • नरसिंहराव यांच्या ९४ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील शाळेच्या अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनावरील इतिहास समाविष्ट केला जाईल. 
  • राव यांचा जन्म २८जून १९२१ रोजी तेलंगणाच्या करीमनगर येथे झाला होता.

दीपक देशपांडे यांचा राजीनामा मंजूर
  • महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील आरोपी आलेले राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रपतींची मंजूरी दिली आहे. दीपक देशपांडे हे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सहकारी मानले जातात. 
  • गेल्यावर्षी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने आपली कारवाई तीव्र करत दीपक देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर छापे टाकले होते. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते. त्यामुळेच एसीबीने त्यांच्या घरांवर छापा टाकले. 
  • पोलिसांनी मुंबई आणि औरंगाबादमधील घरांची झडती घेतली असता त्यात दीड किलो सोने, २७ किलो चांदी, २.५ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉजिट आणि बॉन्ड्स, अनेक गुंतवणूक कंपन्यांचे ६ हजार शेअर्स असा ऐवज देशपांडेंकडे असल्याचे उघड झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा