चालू घडामोडी - ३१ मे २०१५


बाबासाहेबांची १२५वी जयंती वर्षभर साजरी केली जाणार
    Babasaheb Ambedkar
  • बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
  • यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विविध मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती आणि त्याअनुषंगाने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत सल्ला देईल. 
  • या समितीत राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम. वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, सदानंद गौडा, रामविलास पासवान आणि सुरेश प्रभू या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
  • डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आणि सिद्धान्तांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने १६ मोठे प्रकल्प राबविले जाणार आहेत.
अशा आहेत विविध योजना
  • दिल्लीत १५, जनपथ येथे सुमारे १९७ कोटी रुपये खर्चून आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
  • १०० विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणासाठी पाठविणार
  • डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारार्थ आगामी २६ जानेवारीला (२०१६) प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये विशेष चित्ररथाचा समावेश
  • १४ एप्रिलला राष्ट्रीय बंधुभाव समरसता दिवस
  • दिल्लीतील ‘२६, अलिपूर’ या बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाचे डॉ. आंबेडकर संग्रहालयात रूपांतर करणे 
  • डॉ. आंबेडकर स्मृती टपाल तिकीट व शिक्के
  • आंबेडकर फाउंडेशनतर्फे व्याख्यानमाला
  • बाबासाहेबांशी महत्त्वाच्या स्थळांचा विकास

दूरदर्शनच्या महासंचालकपदी वीणा जैन
    Veena Jain named Doordarshan DG
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २९ मे २०१५ रोजी वीणा जैन यांची दूरदर्शनच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अहवाल थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला द्यावा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
  • त्या वरिष्ठ भारतीय माहिती सेवा (आयआयएस) अधिकारी अक्षय राउत यांची जागा घेणार आहेत.
  • वीणा जैन या महासंचालक (वृत्त) या पदाबरोबरच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणूनही काम करणार आहेत. हा अतिरिक्त कार्यभार त्यांना माध्यमे आणि सोशल मीडिया यांच्यावर विशेष नजर ठेवण्याकरिता देण्यात आलेला आहे.
  • कायद्यानुसार भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करण्याचा अधिकार माहिती व प्रसारण मंत्रालयाला असला तरी त्या अधिकाऱ्यांनी प्रसार भारतीलाच उत्तरदायी असले पाहिजे.
  • सध्या वीणा जैन आकाशवाणीच्या समाचार सेवा विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आकाशवाणीच्या प्रकाशन विभागाचे संचालक म्हणून कार्य केलेले आहे.

सेप ब्लॅटर पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी
    Sepp Blatter
  • १९९८ पासून आंतरराष्ट्रीय फूटबॉल संस्था (फिफा)चे अध्यक्ष असलेले सेप ब्लॅटर यांची पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सेप ब्लॅटर हे ७९ वर्षांचे असून ते स्वित्झर्लंडचे नागरिक आहेत. 
  • पहिल्या टप्प्यातील मतदानात ब्लॅटर यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेले जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल-हुसेन यांपैकी कोणासही दोन तृतीयांश बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. 
  • दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी अल-हुसेन यांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यामुळे सेप ब्लॅटर यांचे नाव अध्यक्ष पदासाठी घोषीत करण्यात आले. 
  • यापूर्वी अमेरिकेमध्ये फिफाच्या १४ अधिकाऱ्यांविरोधात अफरातफरी आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला होता, त्या प्रकरणी झ्युरीकमध्ये फिफाच्या सात जणांना अटक झाली होती. त्यापैकी दोघे जण फिफाचे उपाध्यक्ष होते. 
  • त्यानंतर युरोपची फुटबॉल संस्था युईएफएचे प्रमुख मायकल प्लॅटिनी यांनी एका महत्वपूर्ण बैठकीनंतर सेप ब्लॅटर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांचा कॅनडामध्ये सन्मान
  • ‘सुपर ३०’चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल २८ मे २०१५ रोजी कॅनडामध्ये सन्मानित करण्यात आले.
  • हा सन्मान त्यांना ब्रिटिश कोलंबियाच्या कायदेमंडळाद्वारे भारतातील प्रतिभावान गरीब मुलांना उच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी दिला जाणाऱ्या गुणवत्ता प्रशिक्षणासाठी देण्यात आला आहे.
  • ब्रिटिश कोलंबिया विधीमंडळाच्या मॅपल रिजचे प्रतिनिधी मार्क डाल्टन यांनी आनंद कुमार यांच्या सन्मानार्थ प्रशस्ती पत्र वाचले.
  • सुपर-३० मागील १४ वर्षांपासून दरवर्षी मागास वर्गातील ३० विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोफत परीक्षेची तयारी करवून घेत आहे. आणि लक्षणीय बाब म्हणजे आतापर्यंत सर्व विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

उद्योगमंत्री जैनविरोधात नायब राज्यपालांकडे तक्रार
  • दिल्लीच्या वीज व उद्योग विभागाच्या मुख्य सचिव शकुंतला गॅमलिन यांनी थेट नायब राज्यपालांना पत्र लिहून केजरीवाल सरकारमधील उद्योग मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
  • उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडाला भाडेपट्टीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जैन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप गॅमलिन यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
  • दिल्लीतील जमीन सरकारच्या अधिकारक्षेत्रात येत नसतानाही, जैन आपल्यावर दबाव आणत आहेत. उद्योगांकरिता राखीव असलेले भूखंड भाडेपट्टीतून मुक्त करण्यासाठी मी आपल्याला पत्र लिहावे, असा त्यांचा आग्रह आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनी अमेरिकेच्या १०० शहरात योगशिबीराचे आयोजन
  • आगामी २१ जून रोजी साजरा करण्यात येणारा पहिला आंतरराष्ट्रीय योगासन दिवसाच्या निमित्ताने १०० पेक्षा अधिक अमेरिकेच्या शहरांमध्ये योगासनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • प्रमुख आयोजक ‘ओवरसीज वॉलंटियर फॉर ए बेटर इंडिया’ने (ओव्हिबीआय) म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय योगासन दिवसानिमित्त १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये योगासनाच्या आयोजनात सहभागी न्यू जर्सी-न्यूयॉर्क भागातील १५ शहरे, कॅलिफोर्नियातील सात शहरे, टेक्सासतील सहा शहरे आणि ओहायोतील तीन शहरांमध्ये योगशिबीर घेण्याचे निश्चीत झाले आहे.
  • या मोहिमेमध्ये आर्ट ऑफ लिविंग सारख्या सर्व मोठ्या आध्यात्मिक आणि योगासन संघटना सहभागी झाल्या आहेत. पन्नासपेक्षा अधिक संघटना योगसनासंबंधीत जागरूकता पसरवण्याच्या देशव्यापी मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी वेळात संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी ११ डिसेंबर रोजी घोषणा केली होती की, २१ जून रोजी जागतिक योगासन दिवसांच्या स्वरूपात साजरा केला जावा.

एस. चंद्र दास श्रीलंकेत सिंगापुरचे राजदूत
  • सिंगापूरने २७ मे २०१५ रोजी भारतीय वंशाच्या एस. चंद्र दास यांची श्रीलंकेत राजदूत म्हणून नियुक्ती केली. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही घोषणा केली.
  • एस. चंद्र दास यापूर्वी तुर्कीमध्ये सिंगापूरचे राजदूत होते. तसेच त्यांनी सोव्हिएत युनियनमध्ये सिंगापुरचे व्यापार प्रतिनिधी म्हणून १९७० पासून १९७२ पर्यंत  काम केले आहे.
  • दास १९८० ते १९९६ पर्यंत सिंगापूरमध्ये खासदार होते. सध्या ते सिंगापूरच्या एनयूआर गुंतवणूक आणि व्यापार प्रा.लि. आणि इतर अनेक कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

एफडीआय धोरणांमध्ये दुरुस्त्या
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मे २०१५ रोजी अनिवासी भारतीयांद्वारे (एनआरआय) केलेल्या थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणांमधील दुरुस्त्यांना मंजुरी दिली.
  • या दुरुस्तीनंतर मूळ भारतीय (पीआयओ) आणि भारताचे विदेशी नागरिकसुद्धा (ओसीआय) थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणानुसार भारतात गुंतवणूक करण्यास सक्षम असतील.
एफडीआय धोरणामध्ये खालील दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
  • ‘भारतीय अप्रवासी’ (एनआरआय) या संज्ञेमध्ये ओसीआय कार्डधारकांबरोबरच पीआयओ कार्डधारकांना समाविष्ट करून एफडीआय धोरणाचा विस्तार करण्यात आला आहे.
  • आर्थिक, वित्तीय आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अनिवासी भारतीयांबरोबरच (एनआरआय) मूळच्या भारतीय वंशाच्या आणि भारताच्या विदेशी नागरिकांना समानता प्रदान करण्यासाठी सरकारच्या धोरणाबरोबरच एफडीआयच्या धोरणांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल.
  • फेमा नियमाच्या (परकीय चलन सुरक्षा कायद्याशी संबंधित अधिनियम) कलम ४ नुसार अनिवासी भारतीयाद्वारे केलेली गुंतवणूक वेळापत्रक, २००० रहिवाश्यांद्वारे केलेल्या गुंतवणूकीशी समतुल्य देशांतर्गत गुंतवणुक मानली जाईल.
  • हा निर्णयानुसार ही गुंतवणूक विदेशी गुंतवणूक वर्गात समाविष्ट केली जाणार नाही.
  • याव्यतिरीक्त विमा आणि संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ टक्के आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूकीस परवानगी देण्यात आली आहे.
  • या निर्णयामुळे आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण विदेशी गुंतवणूकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांना भेटल्या ३.११ लाखांच्या भेटवस्तू
  • दहा महिन्यांतील परदेश दौऱ्यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३.११ लाख रुपये किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत, असे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आहे.
  • गेल्या १९ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांना सोने व हिऱ्यांनी जडलेला ‘कफलिंक’ भेट म्हणून मिळाला होता. त्याची किंमत ७५ हजार रुपये इतकी आहे. पंतप्रधानांनीही आपल्या दोन दौऱ्यात तेथील राष्ट्रप्रमुखांना चहाचा संच आणि पुस्तके भेट दिली आहे. 
  • पंतप्रधानांना मिळालेल्या अन्य भेटवस्तूंमध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा, चिनी मातीची भांडी, मंदिराची प्रतिकृती, दुर्मिळ चित्रे, गालिचा, छायाचित्रे आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज रविवारी स्वीडन आणि बेलारूस या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा पाच दिवसांचा राहणार आहे. या देशांना भेट देणारे प्रणव मुखर्जी हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत.
  • त्यांच्या या दौऱ्याच्या काळात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. 
  • स्वीडनच्या दौऱ्यात राजधानी स्टॉकहोम येथे आगमन झाल्यानंतर या देशाचे नरेश आणि महाराणी हे स्वत: आपल्या राजमहालात राष्ट्रपतींचे शाही स्वागत करणार आहेत. 
  • घोड्यांच्या बग्गीतून त्यांना राजमहालापर्यंत आणण्यात येणार आहे. तीन दिवस स्वीडनमध्ये मुक्काम केल्यानंतर ते बेलारूसला रवाना होतील.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता देण्यासाठी सरकारने २०११ च्या जनगणनेनुसार अशा भत्त्यांसाठी पात्र शहरांची श्रेणी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • सुधारित यादीमध्ये २९ शहरांचा समावेश केला जाईल. या निर्णयानुसार अहमदाबाद आणि पुणे या दोन शहरांचा ‘वाय’ श्रेणीतून ‘एक्स’ श्रेणीमध्ये, तर २१ शहरांचा ‘झेड’ श्रेणीतून ‘वाय‘ श्रेणीमध्ये समावेश करण्यात येईल. या २३ शहरांचे सुधारित घरभाडे भत्त्यासाठी वर्गीकरण करण्यात आले आहे. 
  • तसेच, उर्वरित सहा शहरांचेही सुधारित वाहतूक भत्त्यासाठी वर्गीकरण केले आहे. ‘वाय‘ श्रेणीत पोहोचलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील वसई- विरार, मालेगाव, नांदेड- वाघाला आणि सांगली या शहरांचा समावेश आहे. 
  • या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून लागू होईल. यातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभामुळे २०१४-१५ या वर्षासाठी सरकारी खजिन्यावर १२८ कोटी रुपयांचा बोजा पडेल. २०११च्या जनगणनेनुसार शहरांचे वर्गीकरण केले जावे, असा प्रस्ताव अर्थखात्याचा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा