चालू घडामोडी - २२ व २३ जुलै २०१५


मलबार : भारत, अमेरिका आणि जपानचा नौदल युद्ध सराव

    India-US-Malabar-naval-exercise
  • सतत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आणि विविध मार्गाने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला इशारा देण्यासाठी भारतीय नौदल हिंदी महासागरात शक्तीप्रदर्शन करणार आहे. मोदी सरकारने या शक्तीप्रदर्शनासाठी अमेरिका आणि जपानशी करार केला आहे.
  • या करारानुसार भारत, अमेरिका आणि जपानचे नौदल ऑक्टोबर महिन्यात युद्ध सराव करणार आहेत. मलबार असे या युद्ध सरावाचे नामकरण करण्यात आले आहे.
  • युद्ध सरावाची आखणी करण्यासंदर्भात भारत, अमेरिका आणि जपानच्या अधिकाऱ्यांची टोकियो येथे एक बैठक झाली. या बैठकीत भारत, अमेरिका आणि जपानचे नौदल मलबार युद्ध सराव करेल असा निर्णय झाला.
  • भारत आणि अमेरिकेच्या नौदलाने १९९२ ते १९९८ दरम्यान ३ वेळा मलबार युद्ध सराव केला होता. वाजपेयी सरकारने अणुचाचणी घेतल्यानंतर अमेरिकेने हा युद्ध सराव स्थगित केला होता. मात्र बुश सरकारच्या काळात २००२ मध्ये या सरावाला पुन्हा एकदा सुरुवात झाली.
  • २००७ मध्ये पहिल्यांदाच या सरावात जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरचे नौदलही सहभागी झाले होते. मात्र चीनने नाराजी व्यक्त केल्यानंतर २००८ मध्ये फक्त भारत आणि अमेरिकेच्या नौदलानेच मलबार युद्ध सराव केला होता.
  • नंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा भारत, अमेरिका आणि जपानच्या नौदलाने संयुक्तपणे युद्ध सराव केला होता. या सरावाबाबत चीनने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जपानच्या नौदलासोबत मलबार युद्ध सराव करायचा नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
  • आता हे धोरण बदलून मोदी सरकारने पुन्हा एकदा जपानच्या नौदलाला मलबार युद्ध सरावात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र दुसरा

  • गृह विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र क्रमांक दोनचे राज्य ठरले आहे.
  • मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे. 
  • देशाची राजधानी व गुन्हेगारी जगाचे लक्ष्य ठरलेल्या दिल्लीत व सायबर हब असलेल्या आंध्रप्रदेशाच्या हैद्राबादेत अनुक्रमे २३७ व २८२ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या आहेत.
  • गृह विभागाने ताज्या माहितीत म्हटले आहे की, देशातील २९ राज्यांत मागील वर्षी ९,३२२ तक्रारी दाखल झाल्या असून ५,६४३ जणांना अटक करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकपची फायनल इडन गार्डन्सवर

    T-20-world-cup
  • दर दोन वर्षांनी होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढच्या वर्षी, ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान भारतात होणार असून या स्पर्धेची अंतिम लढत कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.
  • बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या आठ ठिकाणी टी-२० वर्ल्ड कपचे सामने खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. अर्थात त्यासाठी, आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करणं प्रत्येक स्टेडियमला बंधनकारक असेल.
  • या स्पर्धेची एक उपांत्य लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. दुसरी उपांत्य लढत नवी दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला मैदानावर होण्याची शक्यता आहे.
  • टी-२० वर्ल्डकपची ही स्पर्धा प्रथमच भारतात होत आहे. याआधीच्या दोन टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा श्रीलंका आणि बांगलादेशात झाल्या होत्या. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा आशियाई देशाला या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे.
  • भारताने २००७चा पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला असून, २०१४मध्ये भारत उपविजेता ठरला होता.
  • या स्पधेच्या आयोजनासाठी बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

राजेंद्रकुमार पचौरी ‘टेरी’च्या महासंचालकपदावरून बडतर्फ

    Dr. Rajendra Kumar Pachauri
  • महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले पर्यावरणतज्ञ राजेंद्रकुमार पचौरी यांना ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’च्या (टेरी) महासंचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.
  • मागच्या फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेने एसएमएस, ई-मेल आणि व्हॉट्सअॅप मेसेजचे पुरावे सादर करत पचौरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 
  • अंतरिम जामिनावर असलेल्या पचौरी यांना न्यायालयाने चौकशी पूर्ण होईपर्यंत टेरीच्या मुख्यालयात जाण्यास तसेच देश सोडून जाण्यास मनाई केली होती. तेव्हापासून ते रजेवर गेले होते.
  • पचौरी २००२ पासून ‘इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज’ (आईपीसीसी)चे अध्यक्ष होते. या आरोपांमुळे त्यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
  • पचौरी अध्यक्ष असताना ‘आईपीसीसी’ला २००७ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

‘आर्ची’चे व्यंगचित्रकार टॉम मूर यांचे निधन

  • ‘आर्ची’ या लोकप्रिय कॉमिक्सचे व्यंगचित्रकार टॉम मूर यांचे २१ जुलै रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील कोरियन युद्धापासून मूर यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 
  • मूर काम करत असताना ‘आर्ची’च्या अंकाचा वार्षिक खप दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असे. १९५३ पासून १९६१च्या दरम्यान मूर यांनी ‘आर्ची’साठी काम केले. त्यानंतरही ते ‘आर्ची’साठी काम करत राहिले.

दिल्लीत महिला आयोगावरून वाद

  • दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांची नियुक्ती दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी रद्द केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल आणि जंग यांच्यातील वाद अद्याप सुरूच आहे. 
  • मालिवाल यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यापूर्वी आपला सल्ला घेण्यात आला नव्हता, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचा निर्णय रद्दबातल ठरते, असे जंग यांनी सांगितले. यासंबंधी जंग यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे.
  • बरखा सिंग यांच्या जागी ३० वर्षीय मालिवाल यांना १९ जुलै रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. आम आदमी पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांच्या त्या पत्नी आहेत.

पुष्कारालू यात्रेपासून दूर राहणाऱ्या भिकाऱ्यांना पाच हजार रुपये

  • आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या गोदावरी पुष्कारालू यात्रेदरम्यान भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी सरकारने एक उपाययोजना आखली आहे. यात्रेपासून दूर राहणाऱ्या भिकाऱ्यांना सरकार पाच हजार रुपये देणार आहे. 
  • गोदावरी पुष्कारालू ही यात्रा १४४ वर्षातून एकदा होते. यात्रेपासून दूर राहणाऱ्या भिकाऱ्यांना पाच हजार रुपयांशिवाय अन्न मिळणार आहे. यासाठी २५ जुलै पर्यंत त्यांना दूर राहावे लागणार आहे.
  • मात्र, या घोषणेमुळे प्रशासनापुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. जे भिकारी नाही ते सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.
  • राजमुंद्री येथे सध्या पुष्करम महोत्सव सुरू असून, दक्षिणेतील कुंभमेळा म्हणून हा उत्सव ओळखला जातो. या उत्सवात लाखो भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येतात. या उत्सवासाठी १७ घाट सजविण्यात आले आहेत.

ऑनलाइन डेटिंग साइट ‘ऐशले मेडिसन’ हॅक

  • ‘द इम्पैक्ट टीम’ या हॅकर्स टीमने ऑनलाइन डेटिंग साइट ‘ऐशले मेडिसन’ हॅक केली आहे. लग्नानंतरही इंटरनेवरून नवा पार्टनर शोधण्यासाठी ‘ऐशले मेडिसन' साइटचा वापर केला जातो. 
  • ‘ऐशले मेडिसन’ या साइटवर जगभारातील लोक डेटिंग करतात त्यामध्ये भारतीयांची संख्या पावणे तीन लाखापर्यंत आहे. 
  • जोपर्यंत ही साइट बंद केली जाणार नाही तोपर्यंत त्या साइटवरील युझर्सची वैयक्तीक माहिती आणि त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती जाहीर केली जाईल, असे हॅकर्सकडून सांगण्यात आले आहे. 
  • 'ऐशले मेडिसन'च्या हॅकर्सनी दावा केला आहे की, त्यांनी ३.७ कोटी युझर्सची माहिती चोरली आहे. त्यामध्ये त्यांचे ई-मेल्स, क्रेडिट कार्ड ट्रांजॅक्शन आणि सीक्रेट सेक्शुअल फॅन्टसीज याची माहिती देखील आहे.
  • हॅकिंगनंतर ‘ऐशले मेडिसन’ आपल्या युझर्सना अकाउंट डिलीट करण्याची मोफत सुविधा दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा