चालू घडामोडी - ३० जून २०१५


३० जून हा दिवस एक सेकंदाने मोठा
    Leap Second
  • या वर्षीचा ३० जून हा दिवस नेहमीपेक्षा एक सेकंदाने मोठा असणार आहे. या दिवशी वेळेमध्ये एका अतिरिक्त सेकंदाची भर घातली जाणार असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सांगितले आहे. 
  • पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत असल्याने वेळेचा समतोल राखण्यासाठी साधण्यासाठी लीप सेकंद हा उपाय करण्यात येणार आहे. साधारणतः ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद मोजला जातो.
  • एका दिवसामध्ये ८६,४०० सेकंद असतात. प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो. 
  • ‘यूटीसी’ ही आण्विक वेळ आहे. याचा अर्थ, सीसियम या मूलद्रव्याच्या अणूमधील अपेक्षित इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिवर्तनाच्या आधारावर एक सेकंद ही वेळ ठरविली जाते. हे परिवर्तन इतके विश्वसनीय असते की, गेल्या चौदा लाख वर्षांत हे गणित चुकलेले नाही. 
  • पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास लागणाऱ्या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. सरासरी ८६,४००.००२ सेकंद इतका एका दिवसाचा कालावधी असतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा वेग कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
  • सन १८२० पासून पृथ्वीने ८६,४०० सेकंदात परिभ्रमण पूर्ण केले नसल्याचे शास्त्रज्ञांचे गणित आहे. त्यामुळे पापणी लवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वाटणारे हे अधिकचे ०.००२ सेकंद फार वाटत नसले तरी हे दरदिवशी होत असल्याने वर्षभरात तो कालावधी एक सेकंदापर्यंत जातो. त्यामुळेच ३० जून रोजी ही सेकंदाची भर घातली जाणार आहे.
  • १९७२ पासून लीप सेकंदाची अंमलबजावणी सुरू झाली ती १९९९ पर्यंत चालू होती. त्यामुळे वर्षांला एक सेकंद वाढत होता. आता लीप सेकंद फारसे नाहीत. यंदाचा लीप सेकंद हा सन २०००पासून केवळ चौथा लीप सेकंद आहे.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सॉफ्टवेअर कंपन्या सज्ज
  • सामान्यत: घड्याळीमध्ये २३:५९:५९ नंतर येत्या दिवशी ००:००:०० वाजतात. मात्र ३० जून रोजी एक सेकंद नव्याने सामील झाल्यानंतर ते २३:५९:५९ नंतर २३:५९:६० होतील आणि पुन्हा एक जुलै रोजी ००:००:०० वाजतील.
  • अनेक यंत्रणा एक सेकंदासाठी बंद केल्या जातील. यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे.
  • अशाच प्रकारे याआधी २०१२ मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविला गेला तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे.

फोर्ब्जची सर्वाधिक कमाई केलेल्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध
    Amitabh Bachchan, Salman Khan, Akshay Kumar and Indian cricket captain M S Dhoni are among the world's 100 highest-paid celebrities
  • फोर्ब्ज मासिकाने २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या जगातील 'टॉप १००' सेलिब्रेटींची यादी (सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५) नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
  • या यादीत अमिताभ, सलमान, अक्षयसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचाही समावेश आहे. 
  • या वर्षाच्या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर हा अव्वलस्थानी आहे. मेवेदरची कमाई १९ अब्ज रुपये आहे. 
  • अमिताभ आणि सलमानची कमाई २ अब्ज १३ कोटी रुपये आहे. सलमान, अमिताभ हे संयुक्तपणे ७१ व्या स्थानी आहेत. अक्षय कुमारही कमाईत या दोघांच्या जवळपास आहे. त्याची कमाई २ अब्ज ७ कोटी आहे. या यादीत तो ७६ व्या स्थानी आहे. तर धोनीची कमाई १ अब्ज ९७ कोटी रुपये असून तो ८२ व्या क्रमांकावर आहे.
  • विशेष बाब म्हणजे यात शाहरुख खान स्थान पटकावू शकलेला नाही.
  • फोर्ब्स यादीत गायिका टेलर स्विफ्ट (८), टेनिसपटू रोजर फेडरर (१६), गायिका बियांसे (२९), किम करदाशियाँ (३३), गोल्फपटू टाइगर वुड्स (३७), अभिनेता टॉम क्रूज (५२), अभिनेता जॉनी डेप (८७) आणि लियोनाडरे डिकैप्रियो (८९) यांचा समावेश आहे.

‘इसिस’ संबंधित कंपन्यांशी व्यवहारावर भारताची बंदी
  • पश्चिम आशियामध्ये दहशतीचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील तेलसाठ्यांच्या व्यापारावर भारताने ३० जून रोजी बंदी घातली. 
  • तेलसंपन्न इराक, सीरियामधील बहुतांश भूभागावर ताबा मिळविलेल्या ‘इसिस’साठी तेलसाठे हे निधी उभा करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी या संघटनेशी तेलासंदर्भातील व्यवहार करू नये, असा ठराव ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (यूएन) केला होता. 
इसिस : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया
  • कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या ‘इसिस’चा उदय सीरिया आणि इराकमध्ये झाला. कट्टरवाद आणि निर्घृण हत्या करत त्यांनी जगभरातील दहशतवाद्यांना आकर्षित केले आहे. 
  • ‘इसिस’कडे भरतीसाठी असलेल्या तरुणांच्या ओढ्यामुळे पाश्चिमात्य देश चिंताक्रांत झाले आहेत. 
  • आता ही कट्टरवादी संघटना युरोपमध्येही हातपाय पसरू पाहत असल्याची चिन्हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसली आहेत. ‘इसिस’ची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी, असे आवाहन इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी केले आहे. 
  • या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने एक परिपत्रक काढून या व्यापारावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले.

जयललितांचा पोटनिवडणुकीत ऐतिसाहिक विजय
    Jayalalitha
  • तमिळनाडूतील आर.के. नगर पोटनिवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि ‘अण्णा द्रमुक’ सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. जयललिता यांना १ लाख ६० हजार ३४२ मते मिळाली आहेत.
  • विक्रमी फरकाने त्यांचा विजय झाला असून सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या विजयामुळे तमिळनाडूमधील विधानसभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • या मतदारसंघातून मुख्य लढत ही जयललिता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सी. महेंद्रन यांच्यात झाली. सी. महेंद्रन यांना अवघी दहा हजार मतेच पडली. जयललिता यांनी महेंद्रन यांचा १ लाख ५० हजार ७२२ मतांनी पराभव केला. 
  • या पोटनिवडणुकीसाठी ७० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीवर मुख्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जयललिता यांचा विजय निश्चित मानला जात होता. 
  • तामिळनाडू राज्यपाल : के. रोसय्या
पार्श्वभूमी 
  • बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाला आणि आमदारकीला मुकावे लागले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली. 
  • उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवित जयललिता यांना निर्दोष ठरविले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 
  • त्यानंतर घटनेप्रमाणे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्यांनी आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली.

विजेंदरसिंग प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये
    Vijender Singh
  • भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला.
  • २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या विजेंदरने आयओएस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून क्वीन्स बेरी प्रमोशन्ससोबत बहुवर्षीय व्यावसायिक करार केला. यानुसार तो मिडलवेटमध्ये पहिल्या वर्षी किमान सहा लढती खेळेल.
  • हरियाणातील भिवानी गावात जन्मलेला ३९ वर्षांचा विजेंदर यापुढे मॅन्चेस्टर शहरात वास्तव्यास असेल.
  • विजेंदरने २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, २००६ च्या आशियाडमध्ये कांस्य, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि २००९च्या विश्व हौशी चॅम्पियनशिप, तसेच २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २००९ साली मिडलवेट गटात तो विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला होता.

भारत, थायलंडमध्ये विविध क्षेत्राशी संबंधित करार
  • भारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर ३० जूनला स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली.
  • भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री तानासाक पातिमप्रगोर्म यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
  • प्रत्यार्पण करारावर २०१३ मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. दस्तऐवजांच्या देवाण-घेवाणीमुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

विश्वचषकासाठी गोवा यजमान
  • २०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक पातळीवरील फुटबॉल विश्वकप स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. 
  • त्यासाठी देशातील सहा शहरांपैकी एक संभाव्य केंद्र म्हणून गोव्याची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा स्पर्धेचे तांत्रिक संचालक जेवियर सिप्पी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
  • गोव्याबरोबरच गुवाहाटी, कोची, कोलकता, नवी मुंबई आणि दिल्ली येथील स्पर्धा केंद्रांचा संभाव्य यादीत समावेश आहे.
  • स्पर्धेसाठी गोव्यात चार प्रशिक्षण मैदान आणि एका मुख्य मैदानाची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मैदाने फिफाच्या दर्जानुसार तयार केली जातील. यामध्ये बाणावली, वास्को, कुंकळ्ळी आणि उत्तोर्डा यांचा समावेश आहे. या चारही केंद्रांवर प्रत्येकी सहा सामने खेळविण्यात येतील.

राष्ट्रपती दक्षिणेच्या दौऱ्यावर
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २९ जून रोजी दहा दिवसांच्या दक्षिण भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 
या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम
  • सिकंदराबाद येथील 'राष्ट्रपती निलयम' येथे ते प्रामुख्याने मुक्कामास असतील.
  • एक जुलैला ते तिरुमला येथील श्री तिरुपती देवस्थानास भेट देणार
  • तीन जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या 'उनिकी' या नव्या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हैदराबादमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे हा समारंभ होणार आहे. 
  • बोलारूम येथे असलेल्या 'राष्ट्रपती निलयम'च्या प्रांगणातील नक्षत्र वाटिकेचे मुखर्जी यांच्या हस्ते सहा जुलै रोजी उद्घाटन होईल. 
  • राष्ट्रपतींचा दक्षिण मुक्काम आठ जुलैला संपणार आहे.

ग्रीस आर्थिक संकटात
  • वारंवार कर्जे घेऊनही आर्थिक बाजू सावरू न शकलेल्या, वित्त पुरवठ्यासाठी बव्हंशी जर्मनीवर अवलंबून राहिलेल्या ग्रीसला आर्थिक दिवाळखोरी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज फेडायचे आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचे पॅकेज नाकारले होते. मात्र, आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.
  • ग्रीसमधील बँका नागरिकांना पैसे देऊ शकत नसल्याने त्या ६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रीक सरकारला घ्यावा लागला आहे.
  • शिल्लक भांडवलावर नियंत्रण ठेवण्याचा अखेरचा प्रयत्न ग्रीस सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे बँका व एटीएम केंद्रे २९ जूनला बंद ठेवण्यात आली होती. 
  • नागरिकांना केवळ ६० युरो पैसे बँकेतून काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पेन्शनरांनी बँकांबाहेर लांबलचक रांगा लावलेल्या दिसत होत्या. 
  • अशी बिकट स्थिती असतानाही ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस त्सीप्रास यांनी २९ जून रोजी ग्रीसच्या आर्थिक सुधारणांसाठी अन्य देशांकडून वित्त पुरवठा व्हावा यासाठी सार्वमत घेण्याची घोषणा केली.
परिणाम 
  • यामुळे युरोपीय संघाचे सामायिक चलन असलेल्या युरोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
  • ग्रीसला भारतातून फारशी निर्यात होत नाही. त्यामुळे भारतावर ‘ग्रीस’ संकटाचा फारसा परिणाम होणार नाही.
  • ग्रीसमधील आर्थिक संकटामुळे भारतात सेन्सेक्स ५३५ अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये १६६ अंशांची घसरण झाली आहे. 
  • युरोपातून भारतात झालेली गुंतवणूक परत जाण्याचा धोका असल्यामुळे शेअर बाजारांना आणखी फटका बसू शकेल.

मॅगीच्या निर्यातीला परवानगी; बंदी कायम
  • केंद्र सरकारने मॅगीमध्ये आरोग्यास हानीकारक घटक असल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मॅगीच्या कोट्यवधींच्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी नेस्ले कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली.
  • यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला परदेशात मॅगीची निर्यात करण्यास परवानगी देत मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे.
  • मॅगीच्या निर्यातीला परवानगी दिल्यामुळे नेस्ले कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जुलैला होणार आहे.

ऍडलेडमध्ये पहिली दिवस-रात्र कसोटी
  • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळविला जाणार आहे.
  • न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यास २७ नोव्हेंबरपासून ऍडलेडच्या मैदानावर सुरवात होणार आहे.
  • हा सामना दिवस-रात्र असा प्रकाशझोतात आणि गुलाबी चेंडूसह खेळविला जाणार आहे.
  • ऍडलेडच्या वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्यास सुरवात असून, तो रात्री साडेनऊपर्यंत खेळविला जावा, असे नियोजन आहे.

विसूभाऊ बापटांची गिनीज बूकमध्ये नोंद
  • गेली ३४ वर्षे विसूभाऊ बापट यांची ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ही काव्यमैफल मराठी रसिकांना मोहिनी घालते आहे. २ हजार ७०८ प्रयोगांचा विक्रम करणाऱ्या या काव्यमैफलीला मराठी रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. 
  • सलग पंधरा तास काव्यवाचन करत विसूभाऊ बापट यांनी काव्य वाचनातला नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासाठी १२ जून रोजी त्यांची गिनीज बूकमध्ये नोंद झाली आहे. 
विसूभाऊ बापट यांच्याबद्दल
  • पूर्ण नाव : विश्वनाथ श्रीधर बापट 
  • मूळगाव : रत्नागिरी | जन्मगाव : सांगली. 
  • रसिक त्यांना आदराने विसूभाऊ म्हणतात. 
  • १९८१ला मराठी कवितांची महती पटविणाऱ्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ची संकल्पना विसूभाऊंनी साकारली. २६ जानेवारी १९८१ ला नगर येथे याचा पहिला प्रयोग झाला. 
  • दहा, शंभर, हजार, दोन हजार अशा अगणित प्रयोगांची वाटचाल करत विसूभाऊ ‘कुटुंब’ घेऊन जग फिरत आहेत.
‘कुटुंब रंगलय काव्यात’ची भव्यता 
  • दहा हजारहून अधिक कविता 
  • एक हजारहून अधिक कवी 
  • दोन हजार सातशेहून अधिक प्रयोग 
  • सत्तरहून अधिक काव्यप्रकार 
  • दहाहून अधिक बोलीभाषा 
  • ४५ तासांचे पाठांतर

गुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर
  • ख्यातनाम कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेला भारत-पाकच्या ६० वर्षांच्या संबंधांवर आधारलेला ‘लकीरें’ या कथा व कवितासंग्रहावर आधारलेले नाटक प्रथमच रंगमंचावर अवतरले आहे. 
  • सलीम आरिफ यांनी दिग्दर्शित केलेली ही नाट्यकृती पाहून खुद्द गुलजारही दंग राहिले.
  • ‘लकीरें’मधील कवितांना आरिफ यांनी नाट्यसूत्रात बांधून त्याचे रंगमंचावर केलेले सादरीकरण पाहून गुलजार कमालीचे सुखावले.

इंडोनेशिया हवाईदलाच्या विमानाला अपघात
  • इंडोनेशिया हवाईदलाच्या हर्क्युलस सी-१३० या विमानाला मेदान शहरात झालेल्या अपघातात २० सैनिकांसह ४५ जण  ठार झाले आहेत. 
  • इंडोनेशिया हवाई दलाच्या विमानामधून सैनिक प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटातच मेदान शहराजवळ विमानाला अपघात झाला आणि अपघातात २० सैनिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
  • जखमी सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

चालू घडामोडी - २९ जून २०१५


जयललितांच्या हस्ते चेन्नई मेट्रोचे उद्घाटन
    Chennai Metro
  • चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेचे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी २९ जून रोजी उद्घाटन केले. यामुळे चेन्नईकरांसाठी प्रथमच मेट्रो सेवा उपलब्ध झाली आहे.
  • चेन्नई मेट्रोचे उद्घाटनाचे यापूर्वी अनेक मुहूर्त चुकले आहेत. अखेर आज चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीला सुरवात झाली. मेट्रो सेवा सुरू झाल्याने चेन्नईतील नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. 
  • कोयंबेदू आणि आलंदूर या दोन स्थानकांदरम्यान १० किलोमीटरच्या अंतरावर ही मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर ७ स्थानके आहेत.
  • या मार्गावर ९ मेट्रो धावणार आहेत. प्रत्येक मेट्रो रेल्वेत १ हजार २७६ प्रवासी नेण्याची क्षमता आहे. 
  • १० रुपये कमीत कमी तर ४० रुपये जास्तीत जास्त भाडे या रेल्वेत आकारले जाणार आहे. अलंदूरपासून हा मेट्रो रेल्वे मार्ग चेन्नई विमानतळापर्यंत वाढविला जाणार आहे.
  • चेन्नईतील पहिली मेट्रो रेल्वे महिला चालक ए. प्रीती ठरली आहे.
  • या मेट्रो मार्गाचे ऑक्टोबर २०१४ मध्ये उद्घाटन होणार होते. त्यानंतर हे उद्घाटन मार्च २०१५ मध्ये लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर २९ जून रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले.
  • मेट्रो सेवा असलेले चेन्नई हे देशातील सातवे शहर ठरले आहे. यापूर्वी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, बेंगळूरू, गुरगाव, जयपूर या शहरात मेट्रो सुरु झालेली आहे.

‘रॅम’मध्ये नाशिकचे महाजन बंधू विजयी
    Doctor brothers from nashik finish worlds toughest cycle race
  • ‘रेस अक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही जगातील सर्वात कठीण सायकल शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात नाशिकचे महेंद्र व हितेंद्र महाजन हे डॉक्टर बंधू यशस्वी ठरले आहेत. महाजन बंधूंनी आठ दिवस १४ तास आणि ५५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली.
  • ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच भारतीय जोडी पात्र ठरली होती. ३२ वर्षांची परंपरा असलेल्या सायकल स्पर्धेत महाजन बंधूंनी ४, ८२८ किलोमीटर अंतर नियोजित वेळेच्या बारा तास अगोदर पार केले.
  • या शर्यतीला मेरीलँड अटलांटिक कोस्ट मधून सुरुवात झाली व त्यांच्या वाटेत कॅलिफोर्नियातील जंगल, मोजावे येथील वाळवंट व कोलोरॅडो येथील उंच पर्वतरांगा आणि मध्य अमेरिकेतील वारे यांचा अडथळा होता. वादळी पाऊस आणि विजांच्या भयावह गडगडाटाशी मुकाबल करत कुबरलॅंड आणि हॅंकॉकचे कठीण अंतर त्यांनी पार केले. स्पर्धेचा वॉशिंग्टन मेरी लॅंड परिसरात समारोप झाला.
  • ३९ वर्षाचे डॉ. हितेंद्र हे व्यवसायाने दंत चिकित्सक आहेत तर त्यांचे ४४ वर्षीय बंधू डॉ. महेंद्र हे भूलतज्ञ आहेत. रेस अक्रोस अमेरिकेच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी ही शर्यत २३.३६ किमी प्रती तास इतक्या वेगाने सायकल चालवत पूर्ण केली.
  • यापूर्वी स्पर्धेतील सोलो म्हणजेच एकट्याने सहभागी होण्याच्या यादीमध्ये बंगळुरू येथील शमीम रिझवी व अलीबाग येथील सुमित पाटील हे सहभागी झाले होते. पण ते ही शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ही शर्यत पूर्ण करण्याचा प्रथम भारतीयांचा मान महाजन बंधूंना मिळाला आहे.
  • ‘टुर-दी-फ्रान्स’प्रमाणे ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही शर्यत अनेक दिवस चालणारी असून या शर्यतीमध्ये स्पर्धकांना सलग सायकल चालवावी लागते. स्पर्धकांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची कठोर परीक्षा घेणारी ही शर्यत जगातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा समजली जाते.

ज्वाला-अश्विनी जोडीला 'कॅनडा ओपन'चे जेतेपद
    Jwala Gutta, Ashwini Ponappa
  • भारताच्या ज्वाला गुट्टा-अश्विनी पुनप्पा जोडीने हॉलंडच्या प्रथम मानांकित मुस्केन्स आणि सेलेना पेईक जोडीचा पराभव करत प्रतिष्ठेच्या कॅनडा ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.  
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ज्वाला आणि अश्विनी जोडीने एफ.जे. मस्किन्स व सेलेने पिएक यांचा २१-१९, २१-१६ असा पराभव करत या स्पर्धेच्या महिला दुहेरीचा खिताब पटकावला.
  • पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी अश्विनी व ज्वालाला कडवी लढत दिल्याने त्यांनी तो सेट २१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जिंकला. 
  • मात्र त्यानंतर अश्विनी व ज्वालाने आपले वर्चस्व राखत दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. अवघ्या ३५ मिनिटांत या सामन्याचा निकाल लागला.

स्मॉल फॅक्टरी विधेयक
  • चाळीस कामगारांहून कमी कामगार असणाऱ्या उद्योगांना छोट्या उद्योगांचा दर्जा देऊन त्यांना कामगार कायद्यांतून सूट देणारे अत्यंत महत्त्वाचे विधेयक केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे. 
  • पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात २१ जुलैपासून सुरू होणार असून या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल. 
  • स्मॉल फॅक्टरी (फॅसिलिटेशन अँड रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस) बिल असे या प्रस्तावित विधेयकाचे नाव आहे. 
  • सध्या हे विधेयक मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठवण्यात आले आहे. एका ठिकाणी किंवा शाखा नसलेल्या छोट्या कारखान्यांना लागू होणाऱ्या कामगार कायद्यांतील तरतुदी एकत्र करून हे विधेयक तयार करण्यात आले आहे. 
  • याच अधिवेशनात बाल कामगार (प्रतिबंधन व नियमन) सुधारणा विधेयक, २०१२ देखील मांडले जाणार आहे. याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे १४ वर्षे वयाखालील मुलांना कारखान्यात कामावर ठेवणे हा गुन्हा समजला जाईल, मात्र अशा मुलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात काम करता येईल. 
स्मॉल फॅक्टरी विधेयकातील तरतुदी 
  • पगार बँक खात्यात जमा करावा. 
  • कामगारांना सामाजिक सुरक्षितता द्यावी. 
  • पाच कामगारांपेक्षा कमी कामगार असलेल्या कारखान्यांना शिफ्ट, हजेरी व लेटमार्क यांचे बंधन राहणार नाही.

भारतीय रेल्वे, लष्कर सर्वाधिक रोजगार देणारे
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वांत मोठ्या रोजगार देणाऱ्या संस्थांचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • त्यानुसार भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या दोन संस्थांची गणना जगातील सर्वांत मोठ्या रोजगार देणाऱ्या पहिल्या दहा संस्थांमध्ये झाली आहे.
  • या अहवालात भारतीय रेल्वेला आठवे स्थान देण्यात आले आहे. रेल्वेने एकूण १४ लाख लोकांना रोजगार दिला आहे. त्याखालोखाल भारतीय लष्कर १३ लाख लोकांना रोजगार देते, असे या अहवालात म्हटले आहे.
  • या अहवालानुसार अमेरिकेचे संरक्षण खाते हे जगातील सर्वांत मोठा रोजगार देत आहे. या खात्यात ३२ लाख लोकांना अधिकृतपणे रोजगार दिला जातो असा दावा करण्यात आला आहे. 
  • तसेच, चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मी (२३ लाख), वॉलमार्ट (२१ लाख) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

कर्जबुडव्यांना अटक करण्यासाठी नियम
  • बँकांकडून कर्जे घेऊन ती योग्य मुदतीत परत न करणाऱ्या, खोटे पत्ते देऊन पोबारा करणाऱ्या आणि त्यायोगे बँकांना फसवणाऱ्या कर्जबुडव्यांवर फौजदारी कारवाई करता यावी आणि वेळ पडल्यास त्यांना अटकही करता यावी व अशी कारवाई करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी रिझर्व्ह बँक केंद्रीय अर्थ मंत्रालयाबरोबर आखणी करत आहे.
  • देशातील बँकांनीही कर्जांची पुनर्रचना करण्यापूर्वी फसवेगिरीला आळा बसावा यासाठी अंतर्गत उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 
  • फसवणूक करणाऱ्या कर्जदारांची माहिती बँकेला असणे आवश्यक आहे. अशा कर्जदारांवर कारवाई करता यावी यासाठी चौकशी पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी असावा, असे रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सुचवले आहे.

तेलंगणाच्या शाळेत नरसिंहरावांवर धडा
    Narasimha Rao
  • माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील इतिहास तेलंगणाच्या शाळेमधून शिकविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे.
  • नरसिंहराव यांच्या ९४ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील शाळेच्या अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनावरील इतिहास समाविष्ट केला जाईल. 
  • राव यांचा जन्म २८जून १९२१ रोजी तेलंगणाच्या करीमनगर येथे झाला होता.

दीपक देशपांडे यांचा राजीनामा मंजूर
  • महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील आरोपी आलेले राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रपतींची मंजूरी दिली आहे. दीपक देशपांडे हे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सहकारी मानले जातात. 
  • गेल्यावर्षी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने आपली कारवाई तीव्र करत दीपक देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर छापे टाकले होते. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते. त्यामुळेच एसीबीने त्यांच्या घरांवर छापा टाकले. 
  • पोलिसांनी मुंबई आणि औरंगाबादमधील घरांची झडती घेतली असता त्यात दीड किलो सोने, २७ किलो चांदी, २.५ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉजिट आणि बॉन्ड्स, अनेक गुंतवणूक कंपन्यांचे ६ हजार शेअर्स असा ऐवज देशपांडेंकडे असल्याचे उघड झाले होते.

चालू घडामोडी - २८ जून २०१५


एमएसएमई क्षेत्रासाठी स्वतंत्र जॉब पोर्टल
    MSME Job Portal
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने १६ जून रोजी www.eex.dcmsme.gov.in हे जॉब पोर्टल सुरू केले. 
  • याचा थेट फायदा देशात सध्या कार्यरत असणाऱ्या, एमएसएमई क्षेत्रातील सव्वा तीन कोटी युनटना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनाही याचा लाभ उठवता येणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
  • डिजिटल इंडिया, स्किल इंडिया व मेक इन इंडिया या तीन योजनांना पाठिंबा देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे हे एक प्रकारे इम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करण्यात आले आहे.
  • सध्या हे पोर्टल फक्त कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रासाठी आहे. हळूहळू अन्य एमएसएमई क्षेत्रांचा समावेश यात करण्यात येईल. आगामी काळात या पोर्टलची रचनाही अधिक सुटसुटीत केली जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना या पोर्टलवर आपली माहिती विनाशुल्क नोंदवता येणार आहे.

लेहमधील ऐतिहासिक हेमिस महोत्सवाला प्रारंभ 
  • सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या (लेह) लडाखमधील ऐतिहासिक बौद्ध मठामध्ये हेमिस महोत्सवाला २८ जूनपासून उत्साहात प्रारंभ झाला. देश-परदेशातील शेकडो पर्यटकांनी या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे.
  • बौद्ध भिक्खू गुरू पद्मसंभव ऊर्फ गुरू रिनपोचे यांच्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भूतान आणि तिबेटमधील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे श्रेय पद्मसंभव यांनाच दिले जाते. .
  • चंद्राच्या गतीवर अवलंबून असणारे तिबेटियन दिनदर्शिकेतील पाचव्या महिन्यात दहा दिवस या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या काळात येथील बौद्ध मठामध्ये धार्मिक पूजाविधी केले जातात.
  • या महोत्सवातील नृत्याविष्कारदेखील तंत्र विद्येशी संबंधित आहेत. जागतिक शांती आणि समृद्धतेसाठी हे नृत्याविष्कार महत्त्वपूर्ण मानले जातात.

श्री श्री रवि शंकर कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
    Shri Shri Ravi Shankar
  • अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर यांना कोलंबियाच्या ‘ओरडेन डी ला डेमोक्रेसिया सिमॉन बोलीवर पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  • त्यांना हा पुरस्कार संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये पुनर्वसन कार्य करण्याबद्दल आणि देण्यात आले शांततापूर्ण उद्देश्यांसाठी कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.
  • श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगची १९८१मध्ये स्थापना केली. या संस्थेचा उद्देश लोकांना दैनंदिन अडचणी, सामाजिक समस्या तसेच हिंसेपासून मुक्ती देणे हा आहे.
  • १९९७मध्ये त्यांनी मानवी गुण वाढविण्याच्या आणि जीवनाशी संबंधित समस्या दूर करण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वैल्यूज़ (IAHV) या संस्थेची स्थापना केली.
  • कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात १९८०मध्ये झाली. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा करणाऱ्या लोकांना दिला जातो.

आता तुम्हीच मोजा तुमचा इन्कम टॅक्स
    Income Tax Department
  • करदात्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र अर्थात रिटर्न स्वत:च भरावे यासाठी आयकर विभाग ई-फायलिंगला प्रोत्साहन देत आहे.
  • नोकरदारांना त्यांचा इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे, हे त्यांच्या कंपनीकडून कळत असते. परंतु याशिवाय अन्य करदात्यांनाही नेमका किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, हे कळावे यासाठी आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर कॅल्क्युलेटर तयार केला आहे.
  • हा ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड प्रोग्रॅम आहे. याचा वापर करून करदात्याला इन्कम टॅक्सचा भरणा किती करावा लागणार आहे हे कळल्याने ३१ ऑगस्ट या कर भरायच्या अंतिम तारखेच्या आत टॅक्स भरणे त्याला शक्य होईल. 
  • गुंतागुंतीच्या प्रक्रिया याच्या साह्याने करता येणार नाहीत. यासाठी प्रत्यक्ष रिटर्न भरताना त्या अर्जामध्ये इन्कम टॅक्सची मोजणी करावी लागणार आहे.
  • आयकर विभागाची वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर हा आयकर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे.

न्यूझीलंडमधील उच्चायुक्तांची उचलबांगडी
    Ravi Thapar
  • न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नी शर्मिला थापर यांनी घरात कामाला असलेल्या नोकराचा छळ केल्यामुळं रवी थापर यांना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. 
  • वेलिंग्टनमधील उच्चायुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी आचाऱ्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी आपल्याला गुलामाची वागणूक देऊन मारहाण केल्याची तक्रार न्यूझीलंड पोलिसांसमोर केली होती. या प्रकरणाची पोलिसांमध्ये अधिकृत तक्रार करण्यात आली नाही. 
  • याबाबतची माहिती मिळताच भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर थापर यांना परत बोलावण्यात आलं आहे.

रशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन
  • रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांचे वयाच्या ८५व्या वर्षी मॉस्को येथे निधन झाले. 
  • अमेरिकेकडे जाणारे त्यांचे विमान अ‍ॅटलांटिकवर असताना सर्बियात नाटोच्या बॉम्बहल्ल्यांमुळे वळवण्यात आल्याची घटना १९९९ मध्ये घडली होती.
  • ते मुरब्बी नेते, वैज्ञानिक होते. त्यांनी बोरिस येल्तसिन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात म्हणजे १९९८-९९ दरम्यान पंतप्रधानपद भूषवले होते. १७ ऑगस्ट १९९८ मध्ये रशिया दिवाळखोरीत असताना ते पंतप्रधान झाले.

‘नासा’च्या यानाचा स्फोट
    SpaceX Falcon 9 Rocket Breaks Up After Launch With Space Station Cargo
  • अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) यानाचा २८ जून रोजी उड्डाणानंतर काही वेळातच स्फोट झाला. 
  • स्पेसएक्स फाल्कन ९ या अवकाशयानाने फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथील तळावरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. मात्र, काही वेळातच त्याचा स्फोट झाला. 
  • अवकाश स्थानकावर साहित्य घेऊन जाणारे हे मालवाहू यान असल्याने जीवितहानी झाली नाही. उड्डाणातील त्रुटींमुळेच यानाचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता नासाने व्यक्त केली आहे.
  • फाल्कन-९ हे रॉकेट २०८ फूट लांबीचे असून या रॉकेटची १९ वी झेप होती. स्पेस-एक्स ही कंपनी ईलॉन मस्क यांची असून अंतराळ क्षेत्रात उतरल्यानंतर या कंपनीच्या वाट्याला आलेली ही पहिलीच दुर्घटना आहे.

पाकिस्तानला कर्जाचा ५० कोटी डॉलरचा हप्ता मंजूर
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ५०६.४ दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा हप्ता मंजूर केला आहे. देशाच्या आर्थिक सुधारणा व वाढीसाठी संपुट योजनेचा भाग म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. 
  • पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असून त्यांना या कर्जामुळे लाभ होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
  • पाकिस्तानच्या जानेवारी ते मार्च २०१५ या काळातील आर्थिक स्थितीचा सातव्यांदा आढावा घेतल्यानंतर हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे इस्लामाबादला पुढील आठवडय़ात कर्जाचा आठवा हप्ता दिला जाणार आहे.
  • सप्टेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन वर्षांसाठी विस्तृत निधी सुविधा म्हणून ६.६ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर केला होता. नव्या कर्ज हप्त्याला मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेली रक्कम २०१३ पासून ४.१ अब्ज डॉलर्स झाली आहे. 

प्रश्नसंच १५७ - चालू घडामोडी


Current affairs quiz[प्र.१] जयपूरची मेट्रो रेल्वेसेवा मानसरोवर - चांदपोल या ९.६ किलोमीटर मार्गावर ४ जून रोजी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. या मार्गावर एकूण किती स्थानके आहेत?
अ] सात
ब] आठ
क] नऊ
ड] दहा


क] नऊ 
या मार्गावर नऊ स्थानके आहेत. मानसरोवर, न्यू आतीश मार्केट, विवेक विहार, श्यामनगर, रामनगर, सिव्हिल लाइन्स, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅंप आणि चांदपोल अशी या स्थानकांची नावे आहेत. या मार्गावरील चांदपोल हे पूर्ण भूमिगत स्थानक आहे.

[प्र.२] भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) ३ जून रोजी कोणत्या देशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली?
अ] बांगलादेश
ब] नेपाळ
क] श्रीलंका
ड] सिंगापूर


अ] बांगलादेश 
सध्या भारताव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये एलआयसीचे काम सुरू आहे.

[प्र.३] नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
अ] १३९
ब] १४१
क] १४७
ड] १४९


ब] १४१ 
यापूर्वी भारत १४७व्या स्थानावर होता. या क्रमवारीत जर्मनी प्रथम तर बेल्जियम द्वितीय क्रमांकावर आहे. आशियाई संघांमध्ये इराणला (४१वा क्रमांक) सर्वोच्च स्थान आहे.

[प्र.४] ई-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या ‘स्कॅवा’ या कंपनीचे नुकतेच कोणत्या कंपनीने अधिग्रहण केले?
अ] विप्रो 
ब] टीसीएस
क] मायक्रोसॉफ्ट
ड] इन्फोसिस


ड] इन्फोसिस

[प्र.५] राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या स्वीडन यात्रेदरम्यान भारत आणि स्वीडनमध्ये किती करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या?
अ] दोन
ब] सहा
क] अकरा
ड] एकवीस


ब] सहा

[प्र.६] १ जून २०१५ रोजी जागतिक शिक्षक पुरस्कार अकादमीचे (ग्लोबल टीचर प्राइज अॅकॅडेमी) सदस्य म्हणून कोणत्या भारतीयाची नेमणूक करण्यात आली?
अ] एस. सी. गोयल 
ब] सुंदरम रवी
क] के. सिवान
ड] बिनॉय जॉब


ड] बिनॉय जॉब 
या अकादमीवर निवड झालेले बिनॉय हे एकमेव भारतीय आहेत. 
सध्या बिनॉय जॉब इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्री असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते ‘डेव्हलपमेंट चॅनेल’ या वाहिनीचे प्रमुख संपादक होते.

[प्र.७] १ जून २०१५ रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (व्हीएसएससी) संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] एस. सी. गोयल 
ब] सुंदरम रवी
क] के. सिवान
ड] बिनॉय जॉब


क] के. सिवान
यापूर्वी के. सिवान लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्राचे (तिरुअनंतपुरम) संचालक होते.

[प्र.८] नुकतेच कोणत्या भारतीय पंचांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे?
अ] एस. सी. गोयल 
ब] सुंदरम रवी
क] के. सिवान
ड] बिनॉय जॉब


ब] सुंदरम रवी 
रवी यांच्यासह न्यूझीलंडचे ख्रिस गॉफनी यांनाही एलिट पॅनेलमध्ये बढती मिळाली आहे.

[प्र.९] जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, यासाठी कोणत्या महानगरपालिकेने जवळच्या स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करणाऱ्याला एक रूपयाचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे?
अ] मुबई 
ब] अहमदाबाद
क] चेन्नई
ड] कोलकत्ता


ब] अहमदाबाद

[प्र.१०] दिल्लीमध्ये सुरु करण्यात आलेली विना चालक मेट्रो कोणत्या देशात तयार करण्यात आली आहे?
अ] चीन
ब] जपान
क] दक्षिण कोरिया
ड] सिंगापूर


क] दक्षिण कोरिया

चालू घडामोडी - २६ व २७ जून २०१५


एकदिवसीय क्रिकेटमधील नियमांमध्ये बदल
    ICC Logo
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या नियम बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. 
  • आयसीसीची वार्षिक बैठक बार्बाडोस येथे पार पडली. आयसीसी क्रिकेट समितीने काही बदल करण्याच्या शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी या बैठकीत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारल्या. 
  • आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवे नियम ५ जुलैपासून लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
  • या नव्या नियमांमुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल राहणार असून, एकदिवसीय क्रिकेट आणखी रोचक होणार आहे. 
एकदिवसीय सामन्यांच्या नियमावलीत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल पुढीलप्रमाणे:
  • पहिल्या १० षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.
  • १५ ते ४० षटकांमध्ये आता बॅटिंग पॉवरप्ले मिळणार नाही.
  • ४१ ते ५० षटकांदरम्यान आता ३० यार्डांच्या सर्कलबाहेर चारऐवजी आता पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी.
  • कोणत्याही नो-बॉलवर आता फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.

२००५पूर्वीच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ
  • सन २००५पूर्वीच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या असलेली ३० जून ही अंतिम मुदतीत रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांनी वाढवली आहे. 
  • आता नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलता येणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी त्या संबंधित ग्राहकांनी आपल्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊन बदलून घ्याव्यात, असे रिझर्व्ह बँकेने सुचवले आहे. 
  • दिलेल्या मुदतीत २००५पूर्वीच्या नोटा बदलून घेणे शक्य न झाल्यास त्यानंतरही या नोटा चलनात राहतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात
  • एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यसह एकूण दहा पदकांची कमाई केली. बँकॉकमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात भारताने एकूण ८ पदके मिळवली होती.
  • भारताच्या इंदरजित सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातही सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताला तिसरे सुवर्ण अरोक्या राजीवने मिळवून दिले. 
  • दुसऱ्या टप्प्यात गोळा फेकमध्ये इंदरजितसिंगने १९.८५ मीटर अशी कामगिरी नोंदवून सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात त्याने १९.८३ मीटर अशी कामगिरी नोंदवली होती. इंदरजितचे हे या महिन्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. 
  • पुरुषांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत जॉन्सनने १ मिनिट ४९.८५ सेकंद अशी कामगिरी नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला. 
  • लांब उडीमध्ये अंकित शर्माने रौप्यपदक मिळवले. त्याने ७.८० मीटर अशी कामगिरी नोंदवली. पहिल्या टप्प्यातही अंकितने रौप्यपदक मिळवले होते.
  • महिलांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत एम. गोमंतीने २ मिनिटे ६.२५ सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. 
  • महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत गायत्री गोविंदराजने (१३.६६ से.), १०० मीटर स्प्रिंटमध्ये एस. नंदाने (११.७२ से.), ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत एम. आर. पूर्वम्मा (५२. ७२ से.) ब्राँझपदक मिळवले. 
  • भारताला दोन ब्राँझपदके पुरुष आणि महिला ४ बाय १०० मीटर रिलेत मिळाली. पुरुष संघाने ३९.६० सेकंद अशी, तर महिलांनी ४५.३३ सेकंद अशी वेळ नोंदवली.

जलतरणपटू रोहन मोरेला ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान
  • पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरे याने इंग्लिश खाडी, कॅटेलिनाखाडीपाठोपाठ मॅनहॅटन आयलंड (न्यूयॉर्क) मोहिम फत्ते करत वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग फेडरेशनच्या ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान मिळविला. 
  • अशी कामगिरी करणारा रोहन दुसराच भारतीय ठरला आहे. ३० वर्षांपूर्वी तारानाथ नारायण शेनॉय यांनी अशी कामगिरी केली होती.
  • न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या भोवतीची ४५.८ किलोमीटर अंतराची मॅनहॅटन आयलंड मोहिम रोहनने ७ तास ४३ मिनिटांत फत्ते केली. 
  • यापूर्वी रोहनने इंग्लिश खाडी (३३.६ कि.मी.) मोहिम १३ तास १३ मिनिटांत, तर दक्षिण कॅलिफोर्नियातील कॅटेलिना खाडी मोहिम (३३.७ कि.मी) १० तास १७ मिनिटांत फत्ते केली होती.

शेअर बाजारात फेसबुक वॉलमार्टच्या पुढे
    Facebook
  • शेअर बाजारात फेसबुकचे बाजारमूल्य वॉलमार्टपेक्षा वाढल्याने फेसबुक ही कंपनी आता वॉलमार्टपेक्षा मोठी ठरली आहे. 
  • जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकच्या या कामगिरीमुळे शेअर बाजारात सर्वोच्च भागभांडवल असणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीतून वॉलमार्ट बाहेर पडली आहे. 
  • अमेरिकी शेअर बाजारात सध्या ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सर्वाधिक भागभांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता फेसबुक त्यांना सामील होण्याच्या मार्गावर आहे. 
  • ‘फॅक्टसेट’च्या आकडेवारीनुसार फेसबुकचे बाजारमूल्य २३८ अब्ज डॉलर झाले आहे. वॉलमार्टचे बाजारमूल्य २३४ अब्ज डॉलर आहे.

व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स 
    Where Borders Bleed
  • १९९२ ते १९९४ या काळात कराचीमध्ये भारताचे वाणिज्यदूत म्हणून काम पाहिलेले राजीव डोग्रा यांनी त्यांच्या ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकात दोन्ही देशांदरम्यानच्या अनेक वादग्रस्त मुद्यांविषयी भाष्य केल्यामुळे हे पुस्तक चेचेत आले आहे.
  • दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक, राजनैतिक आणि लष्करी मुद्‌द्‌यांचा समावेश असलेल्या सुमारे ७० वर्षांतील संघर्ष पुस्तकात मांडण्यात आला आहे. फाळणी, इतिहास, त्यामुळे झालेली भांडणे, लॉर्ड माउंटबॅटन आणि महंमद अली जीनांपासून अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या आकडेवारीवर आधारित दोन्ही देशांच्या कथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
  • कारगिलसारखी लष्करी कारवाई करण्याची तत्कालीन डीजीएमओ मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांची संकल्पना बेनझीर यांनी कशी मोडीत काढली हे डोग्रा यांनी बेनझीर यांच्याच एका मुलाखतीचा हवाला देत स्पष्ट केले आहे. 
  • ऐतिहासिक दिल्ली-लाहोर बसमध्ये बसून प्रवास केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वागत करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केल्याचे ठाऊक होते, असा दावा डोग्रा यांनी केला आहे. 
  • तसेच मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोटांविषयी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना आधीच माहिती होती आणि प्रत्यक्षात त्यासाठी त्यांनीच मान्यता दिली होती, असा दावा लेखकाने केला आहे.
  • भारतीय विदेश सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले राजीव डोगरा यांनी इटाली, रोमानिया, माल्डोव्हा, अल्बानिया आणि सॅन मरिनो या देशांमध्ये राजदूत म्हणून, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम येथील संस्थांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. त्यांचे पुस्तक रूपा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

लिअँडर पेसचा शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम
  • चाळिशीतही ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या लिअँडर पेसने शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम नावावर केला आहे. हा विक्रम प्रस्थापित करणारा तो ४७वा खेळाडू ठरला आहे. सध्या ब्रिटनमधील नॉटिंगहॅमला सुरू असलेल्या ग्रासकोर्टवरील स्पर्धेत तो स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स याच्या साथी सहभागी झाला आहे. ग्रॅनोलर्स त्याचा शंभरावा जोडीदार ठरला आहे.
सर्वाधिक यशस्वी जोड्या
    Leander Paes
  • या शंभर सहकाऱ्यांमध्ये पेसची सगळ्यात यशस्वी जोडी भारताच्या महेश भूपतीशी ठरली.  पेसने भूपतीच्या बरोबरीने खेळताना तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरले. राडेक स्टेपानेक आणि ल्युकास डौल्ही या चेक प्रजासत्ताकच्या सहकाऱ्यांसह पेसने प्रत्येकी दोन तर मार्टिन डॅमसह एका ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
  • नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील विजयासह कारकीर्दीत ७०० विजय मिळवणारा पेस केवळ आठवा खेळाडू ठरला होता. मात्र ५० जेतेपदे आणि ७०० विजय हा विक्रम करणारा पेस एकमेव खेळाडू आहे.
आठ जणांसह अव्वल 
  • जागतिक क्रमवारीत पेसने आठ जोडीदारांसह अव्वल स्थान मिळविले आहे. यात महेश भूपती, डॅनिएल नेस्टर, योनास ब्योर्कमन, मार्क नोल्स, बायरन ब्लॅक, डोनाल्ड जॉन्सन आणि जॅरेड पामर यांचा समावेश आहे. 
सर्वाधिक जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम
  • सर्वाधिक १६८ जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम नेदरलॅंड्‌सच्या सॅंडर ग्रोएनच्या नावावर आहे. त्यानंतर लिबॉर पीमेक (१५५), रॉजर वॅस्सेन (१५१) हे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

‘नो ऍक्सिडेंट डे’
  • देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारने १ जुलै रोजी ‘नो ऍक्सिडेंट डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • या दिवशी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 
  • यासंबंधीचे पत्र राज्य सरकारकडून सर्व राज्य परिवहन आयुक्तांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
  • या दिवशी राज्यातील सर्वच भागातील अपघात रोखणे शक्य होणार नाही. पण अपघातप्रवण भागामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून पोलिस तैनात करण्यात येतील.

अमेरिकेच्या सर्व राज्यांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता
  • समलिंगी व्यक्तींना अमेरिकेतील ५० प्रांतांत कुठेही विवाहबद्ध होण्याचा अधिकार आहे, असा निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने २६ जून रोजी दिला.
  • अमेरिकेच्या ३६ राज्यांमध्ये आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये पुरुष समलिंगी (गे) आणि स्त्री समलिंगी (लेस्बियन) जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी आहे. आता दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागातील उर्वरित १४ राज्यांनाही समलिंगी लग्नांवरील बंदीची अंमलबजावणी थांबवावी लागेल, असा निर्णय न्यायालयाने ५ विरुद्ध ४ अशा बहुमताने दिला आहे. 
  • अनेक राज्यांच्या कायद्यानुसार लग्नाची व्याख्या ‘पुरुष व स्त्री यांचे एकत्रीकरण’ अशी होती व हाच सुप्रीम कोर्टातील अनेक खटल्यांतील वादाचा विषय होता. ‘लग्नापेक्षा कुठलाही संबंध सखोल नाही’, असे न्यायाधीश अँथनी केनेडी यांच्यासह इतर चार लिबरल न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
  • कुठल्याही निकालाच्या फेरविचाराची विनंती करण्यासाठी न्यायालय हरणाऱ्या पक्षाला सुमारे तीन आठवडय़ांची मुदत देते. त्यामुळे या निकालाची अंमलबजावणी लगेचच होणार नाही.

‘अरे यार’, ‘भेळपुरी’ हे शब्द ऑक्सफर्डमध्ये
    Oxford Dictionaries
  • भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ या शब्दाला जागतिक मान्यता मिळाली आहे. जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'अरे यार' या शब्दाला मानाचे स्थान दिले असून त्याबरोबरच चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा या शब्दांनाही ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत अलीकडेच ५०० नव्या शब्दांची भर घालण्यात आली आहे. या सर्वच शब्दांना स्वत:चे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महत्त्व आहे. त्यामुळं या शब्दाला पर्यायी शब्द वापरणं योग्य ठरले नसते. म्हणूनच हे शब्द जसेच्या तसे डिक्शनरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • १८४५पासून आतापर्यंत अनेक शब्दांचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. 'चुडीदार' या शब्दाचा इंग्रजी भाषेतील उल्लेख प्रथम १८८०मध्ये करण्यात आल्याचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. त्यानंतर तब्बल १३५वर्षानंतर या शब्दाला इंग्रजी शब्दांच्या यादीत स्थान मिळाले आहे. 
  • ‘अरे यार’ शब्दाचा इतिहासही पूर्वापार चालत आला आहे. १८४५ मध्ये या शब्दाचा उल्लेख झाल्याचे आढळते. अशाप्रकारे इतर काही ऐतिहासिक आणि रोजच्या वापरातील शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.

भारताचा सतनाम सिंग एनबीए बास्केटबॉल लीगमध्ये
    Satnam Singh
  • भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिला भारतीय असल्याने जागतिक बास्केटबॉल क्षेत्रामध्ये भारताचे नाव चमकले आहे.
  • ७ फूट २ इंच उंचीचा सतनाम एनबीएमध्ये डैलस मैवरिक्स या संघाकडून खेळणार असून एनबीए स्पर्धेच्या एकुण ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये खेळणार तो पहिला भारतीय ठरणार आहे. 
  • सतनाम सिंग भामरा असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू अमेरीकेच्या फ्लोरीडा शहरातील आयएमजी अकादमीमध्ये शिकत असून या कालवधीत कॉलेज स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांत सतनामने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामुळेच डैलस मैवरिक्स संघाने त्याला करारबध्द केले. 
  • विशेष म्हणजे डैलस संघाने २०११ साली एनबीएचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय या संघामध्ये डर्क नोविट्जस्की सारख्या स्टार खेळाडंूचा समावेश आहे.
  • गुरसिमरन ‘सिम’ भुल्लर एप्रिल महिन्यात सैक्रोमेंटो किंग्स संघाकडून एनबीए स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला होता.

सिरियातील कोबाने शहरात इसिसचा हिंसाचार
  • सिरियातील कोबाने शहर ताब्यात घेतल्यानंतर इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी २४ तासात झालेल्या हिंसाचारात १४६ नागरिकांना ठार मारले आहे. इसिस या इस्लामिक संघटनेकडून सिरियात झालेला हा सर्वाधिक भीषण हिंसाचार आहे.
  • कोबाने हे शहर कुर्दिश प्रतिकाराचे प्रतीक बनल्याने इसिसचे क्रौर्य कळसाला पोहोचले आहे. इसिसच्या आत्मघाती बॉम्बरने कोबाने शहराच्या प्रवेशद्वारात स्वत:चे स्फोट घडवून आणले व येणारी वाहने उडविण्यात आली. मागून येणाऱ्या इसिसच्या जिहादींसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. 
  • मृत नागरिकांत महिला व लहान मुले आहेत. त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आहेत. शहरात आलेल्या इसिसच्या जिहादींनी घराघरात शिरून गोळीबार केला.

विश्वनाथन आनंदला उपविजेतेपद
    Viswanathan Anand
  • माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने नॉर्वे क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या आणि अंतिम फेरीत बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवविरुद्ध झटपट बरोबरी स्वीकारली. टोपालोव ६.५ गुणांसह निर्विवाद विजेता ठरला.
  • नॉर्वेमध्ये ही स्पर्धा झाली. 'इंग्लिश ओपनिंग' पद्धतीत झालेला लेव्हॉन अरोनियन - हिकारू नाकामुरा डावात नाकामुराने विजय प्राप्त केला. यामुळे आनंद व नाकामुरा यांचे समान सहा गुण झाले. टायब्रेकमध्ये आनंद सरस ठरल्याने आनंदला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले. 
  • उपविजेतेपदाबरोबरच या स्पर्धेत आनंदने १२ एलो गुणांची कमाई केली. पुढील फिडे यादीत २८१६ एलो गुणांसह आनंद जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसऱ्या स्थानी आरूढ झालेला असेल. 
  • विजेत्या टोपालोवला ७५ हजार, उपविजेत्या आनंदला ५० हजार आणि नाकामुराला ४० हजार डॉलरचे बक्षीस मिळाले.
  • या स्पर्धेत नॉर्वेच्या हॅमरने बुद्धिबळ विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. स्पर्धेत २६७७ एलो गुणांचे सर्वांत शेवटचे मानांकन असलेल्या हॅमरने शांतपणे व एकाग्रतेने जगज्जेत्या कार्लसनला पराभूत केले.

स्मार्ट सिटी, ‘अमृत’ आणि पंतप्रधान आवास योजना

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Smart Cities     देशभरातील ५०० शहरांच्या विकासासाठी अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन ‘अमृत’ योजना, १०० शहरांचा ‘स्मार्ट शहरे’ म्हणून विकास, आणि सन २०२२ पर्यंत शहरांतील प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर यासाठी पंतप्रधान आवास योजना अशी शहरविकासाला मोठे बळ देणारी त्रिसूत्री केंद्र सरकारने २५ जून रोजी जाहीर केली. ही त्रिसूत्री प्रत्यक्षात अंमलात आल्यास बकालीकरण, वाहतुकीची कोंडी, पायाभूत सुविधांची वानवा आदींचा विळखा पडलेल्या शहरांचा चेहरामोहरा पुरता बदलण्याची व शहरवासींचे आयुष्य सुखकर होऊ शकेल. या योजनांसाठी सुमारे चार लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनातील सोहळ्यात या योजनांची औपचारिक घोषणा केली.
या महत्त्वाकांक्षी घोषणेच्या तपशीलांवर टाकलेला प्रकाश.
स्मार्ट सिटींची वैशिष्ट्ये
     स्मार्ट सिटी सर्व मूलभूत सुविधा असलेले, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न असेल. २४ तास वीज आणि पाणीपुरवठा, पर्यावरणपूरक प्रणाली, मलनि:सारण व्यवस्था, सर्व मूलभूत व आवश्यक सुविधांचे व्यवस्थापन, जलद प्रवासासाठी कल्पक वाहतूक, एकात्मिक मल्टिमोडल वाहतूक प्रणाली, ऊर्जाक्षम इमारती, घनकचऱ्यातून खतनिर्मिती, गुन्हेगारीवर व्हिडीओच्या मदतीने देखरेख, जन्म-मृत्यू दाखल्यांसह विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन व्यवस्था, शाळा, कॉलेजे, पार्क, खेळाची मैदाने, आरोग्य सुविधा, उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा, रेल्वेस्थानके आणि विमानतळ.
स्मार्ट शहरे निवडण्याचे निकष
     दोन टप्प्यांमधील स्पर्धेतून विकसित करावयाच्या १०० स्मार्ट शहरांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात शहरातील वेगवेगळ्या नागरी प्रकल्पांचा स्तर, शहरातील स्वच्छतागृहांची संख्या, ऑनलाइन तक्रार निवारणाची स्थिती, ई-माहितीपत्राचे प्रकाशन, गेल्या दोन वर्षांतील अर्थसंकल्पीय खर्चाचा प्रकल्पनिहाय तपशील, सेवा पुरविण्यातील विलंबापोटी केलेला दंड, तीन वर्षांतील महसुली उत्पन्न, शेवटच्या महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील नियमितता, २०१२ सालापर्यंत जेएनएनयूआरएम प्रकल्पांची स्थिती, पाणीपुरवठ्याचे संचालन आणि देखरेखीवरील खर्च आणि उत्पन्नाच्या तपशिलावर दिल्या जाणाऱ्या एकूण १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शहरांची शिफारस राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून केली जाईल. 
      पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या शहरांची दुसऱ्या टप्प्यातील १०० गुणांच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. त्यात इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात लागलेला सरासरी वेळ, संपत्ती कराच्या आकलन आणि संग्रहातील वाढ, पाणीपट्टीतील वाढ, वीजपुरवठ्यातील सुधारणा, वाहतुकीचा ताण कमी करणे, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैधानिक दस्तावेजांविषयी ऑनलाइन उपलब्धता, नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा, सार्वजनिक सेवांमधील सुधारणा, प्रमुख आर्थिक घडामोडींवरील प्रभाव, रोजगारनिर्मिती, गरीब आणि सुविधाहीन लोकांना लाभ, कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती, सार्वजनिक सुविधा पुरविण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांशी चर्चा करून सर्वोत्तम पर्याय निवडणे, स्मार्ट तोडग्यांचा अवलंब आणि संपूर्ण शहराच्या विकासाची मर्यादा निश्चित करणे अशा निकषांच्या आधारे तज्ज्ञांकडून निवड केली जाईल.
योजनेसाठी निवड झालेली शहरे
     केंद्र सरकारने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना स्मार्ट शहरांसाठी आणि ‘अटल मिशन फॉर रिजुविनेशन अँड अर्बन ट्रान्स्फर्मेशन स्कीम’ (अमृत) योजनेंतर्गत तयार होणाऱ्या शहरांसाठी नामांकने देण्यासाठी शहरांची संख्या सांगितली आहे. त्यावरून उत्तर प्रदेशात सर्वाधिक स्मार्ट शहरे तयार होणार असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला १० शहरे आली असून, या शहरांच्या निवडीसाठी केंद्राने काही निकष ठरवले आहेत. ही १० शहरे निवडण्याची जबाबदारी नगरविकास विभागावर आहे. त्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. या शहरांची यादी खालीलप्रमाणे :
संभाव्य स्मार्ट शहरे
राज्य
शहरांची संख्या
संभाव्य शहरे
उत्तर प्रदेश १३ लखनौ, कानपूर, अलाहाबाद, झाशी, फैजाबाद, आग्रा, वाराणसी (अन्य नावे निश्चित व्हावयाची आहेत)
तमिळनाडू १२ चेन्नई, कोइमतूर, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, तिरुनवेल्ली (अन्य नावे निश्चित व्हावयाची आहेत)
महाराष्ट्र १० मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, जळगाव, भिवंडी आणि अन्य दोन
मध्यप्रदेश भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, बऱ्हाणपूर, गुणा आणि जबलपूर
गुजरात अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, जुनागड, गांधीनगर
कर्नाटक बंगळूर, गुलबर्गा, बीदर, विजापूर, बदामी, पट्टदकल्लू, महाकुटा (यांतील सहा)
राजस्थान जयपूर, अजमेर, भरतपूर, बिकानेर, जोधपूर, कोटा (यांतील चार)
पश्चिम बंगाल कोलकता, दुर्गापूर, हल्दिया, हावडा, जंगीपूर
पंजाब लुधियाना, अमृतसर, जालंधर, पतियाळा (यांतील तीन)
बिहार मुझफ्फरपूर, पाटणा, गया, भागलपूर, बिहारशरीफ (यांतील तीन)
हरियाणा फरिदाबाद, गुरगाव, पानिपत, अम्बाला (यांतील तीन)
आंध्रप्रदेश गुंटूर, विजयवाडा, कर्नूल, चित्तूर (यांतील तीन)
उत्तराखंड डेहराडून, हरिद्वार, रुरकी
हिमाचल प्रदेश सिमला
झारखंड जमशेदपूर, रांची, धनबाद (यांतील एक)

‘अमृत’ योजनेचे लाभार्थी राज्ये आणि शहरे
राज्ये
शहरे
राज्ये
शहरे
राज्ये
शहरे
उत्तरप्रदेश
५४
महाराष्ट्र
३७
तामिळनाडू
३३
गुजरात
३१
आंध्रप्रदेश
३१
राजस्थान
३०
पश्चिम बंगाल
२८
बिहार
२७
गुजरात
२१
हरियाणा
१९
ओडिशा
१९
केरळ
१८
पंजाब
१७
तेलंगणा
१५
छत्तीसगड
१०

योजनानिहाय आर्थिक तरतूद
  • स्मार्ट शहरे : ४८ हजार कोटी रुपये 
  • अमृत शहरे : ५० हजार कोटी रुपये 
  • पंतप्रधान आवास योजना (सर्वांसाठी घर) : ३ लाख कोटी रुपये
     केंद्राकडून १०० स्मार्ट शहरांवर ४८ हजार कोटी, तर ५०० शहरांच्या एएमआरयूटीवर ५० हजार कोटी अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेवर तीन लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. या योजने अंतर्गत शहरांमध्ये झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या आर्थिक कमकुवत, तसेच निम्न उत्पन्न गटांसाठी दोन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी पुढच्या सात वर्षांत तीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
     स्मार्ट शहरांना केंद्र सरकारकडून दरवर्षी १०० कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षे अनुदान देण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारसोबत खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून शहरांच्या विकासासाठी लागणारा निधी उभारला जाईल. एकप्रकारे हे शहरांचे खासगीकरण ठरणार असून स्मार्ट शहरांतील निवासी नागरिकांना प्रत्येक सुविधेचे मोल द्यावे लागणार आहे.

चालू घडामोडी - २५ जून २०१५


आणीबाणीची चाळिशी
    Smt. Indira Gandhi
  • २५ जून : आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला चाळीस वर्षे पूर्ण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती.
  • नंतर आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील राजकारण आणि समाजकारणात पुढील १२ महिन्यांत अनेक घटना घडल्या. एकूणच आणीबाणी लादण्याच्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे अवघा भारत देश ढवळून निघाला. या घटनेमुळे देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली.

सचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू
    SACHIN Greatest Test Cricketer of 21st Century
  • भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे. 
  • या सर्वेक्षणासाठी २१व्या शतकातील १०० सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. 
  • या सर्वेक्षणात तब्बल १६००० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २३ टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर १४ टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली. 
  • तब्बल दहा दिवस सुरु असलेल्या या सर्वेक्षणात २००० सालापासूनच्या कसोटी खेळाडुंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, लिटील मास्टर सचिनने या सगळ्यांवर मात करत अग्रस्थान पटकावले. 
  • विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या स्वत: जाहीर केलेल्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर होता. मात्र, सचिनने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस या सर्वेक्षणात काहीसे पिछाडीवर पडल्याची माहिती वेबसाईटकडून देण्यात आली. 
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.

नागपूरसह सहा ठिकाणी आयआयएम 
    IIM Nagpur
  • नागपूरसह देशातील सहा ठिकाणी नव्याने इंडियन ‌इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) (भारतीय व्यवस्थापन संस्था) स्थापना करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
  • विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश,) बोधगया (बिहार), सिरमौर (हिमाचल प्रदेश), संबळपूर (ओडिशा) आणि अमृतसर (पंजाब) येथे अन्य पाच आयआयएम असतील. 
  • येत्या शैक्षणिक वर्षापासूनच या संस्था विविध व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करतील. 
  • प्रत्येक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून कॅट (कॉमन ऍडमिशन टेस्ट) मार्फत प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाईल. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सात वर्षानंतर प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या ५६० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल.
  • देशात याआधी १३ आयआयएम आहेत.

नेपाळला भारताची १ अब्ज डॉलरची मदत
  • नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय दाता परिषद २५ जून रोजी पार पडली. या परिषदेत भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन:उभारणीसाठी भारत तब्बल १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले. 
  • आता एक अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार असून, आणखी एक अब्ज डॉलरची मदत पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असून, एकूण मदतीचा आकडा दोन अब्ज डॉलरवर गेला आहे. नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली. 
  • याच परिषदेत चीनने ४८.३ कोटी डॉलरची मदत जाहीर केली असून, नेपाळच्या शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, चीन ‘सिल्क रोड फंड’मधून वेळोवेळी मदत करणार असून, पुढील वर्षभरात दीड हजार नेपाळी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांनी जाहीर केले. 
  • जपाननेही २६ कोटी डॉलरची मदत नेपाळसाठी जाहीर केली आहे. यातून घरे, शाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
  • २५ एप्रिल भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे ९००० लोक मृत्यूमुखी पडले. त्यावेळी झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे नेपाळ मोठ्या संकटात सापडले. पुरातन मंदिरे, वास्तू, सरकारी कार्यलय, हॉस्पिटल यांचेही प्रचंड नुकसान झाले. 
  • नेपाळच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पण भूकंपामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवल्याने नेपाळला मोठ्या मदतीची गरज असताना भारताने पुढाकार घेतला आहे.

स्मार्ट सिटी आणि अमृत योजना
  • शहरी भारताचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 
  • १०० स्मार्ट शहरांचा विकास, अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन (एएमआरयूटी) तसेच पंतप्रधान आवास योजना, ही शहर विकासाची सुसाट इंजिने मानल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
  • या योजनांबद्दल सविस्तर माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी)
  • केंद्र सरकारने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (सेकी) नोंदणी व्यवसायिक कंपनी म्हणून करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता सेकीचे नाव रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी) असे होईल. 
  • यामुळे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना गती येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • सेकी ही सध्या कायद्यांतर्गत सेक्शन-८ प्रकारची कंपनी आहे. या विभागांतर्गत समाजासाठी काम करणाऱ्या कंपन्यांची स्थापना व नोंदणी करता येते. यामुळे अशा कंपनीला व्यवसाय करण्यास तसेच व्यावसायिक लाभ मिळवण्यास पूर्णपणे बंदी आहे. 
  • अपारंपरिक ऊर्जेसारखे क्षेत्र ही काळाची गरज असल्यामुळे सेकीची नोंदणी बदलून तिला व्यावसायिक कंपनीचा दर्जा देणे आवश्यक होते. 
  • आता सेकीची नोंदणी कंपनी कायद्याच्या सेक्शन-३ अंतर्गत होणार असल्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या रेकी या कंपनीला स्वत:च्या मालकीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्यातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक स्तरावर विकणे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
  • कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे सेकी ही कंपनी कंपनी रजिस्ट्रारकडे सेक्शन-३ अंतर्गत नोंदणी करून घेण्यासाठी अर्ज करेल आणि नाव बदलून रेकी हे नवे नाव धारण करेल. 
  • सेकीला संपूर्णत: व्यावसायिक कंपनी म्हणून वावरताना कोणतीली अडचण येऊ नये, यासाठीच या कॉर्पोरेशनची नोंदणी कंपनी कायदा सेक्शन-३ अंतर्गत नव्याने केली जाणार आहे. 
  • नवी रेकी ही कंपनी आपले कार्यक्षेत्र सौरऊर्जेपुरतेच मर्यादित ठेवणार नसून त्याखेरीज अन्य अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रांमध्येही ही कंपनी काम करणार आहे. यामध्ये जिओथर्मल, ऑफशोअर विंड, टायडल अशा ऊर्जांचाही समावेश असणार आहे.

जोकोविच, सेरेनाला अव्वल सीडिंग
  • सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल सीडिंग देण्यात आले आहे. 
  • ही स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या रफाएल नदालला दहावे सीडिंग आहे. नदालने २००८ आणि २०१०मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
सीडेड खेळाडूंची यादी (अव्वल दहा)
  • पुरुष एकेरी- नोव्हाक जोकोविच (सर्बिया), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मरे (ब्रिटन), स्टॅनिस्लास वॉवरिन्का (स्वित्झर्लंड), निशिकोरी (जपान), बर्डिच (चेक प्रजासत्ताक), रॉनिक (कॅनडा), फेरर (स्पेन), चिलीच (क्रोएशिया), नदाल (स्पेन).
  • महिला एकेरी : सेरेना विल्यम्स (अमेरिका), क्विटोवा (चेक प्रजासत्ताक), हॅलेप (रोमानिया), मारिया शारापोवा (रशिया), कॅरोलिन वॉझ्नियाकी (डेन्मार्क), साफारोवा (चेक प्रजासत्ताक), अॅना इव्हानोविच (सर्बिया), एकतेरिना माकारोवा (रशिया), कार्ला सुआरेझ (स्पेन), अँजेलिक कार्बर (जर्मनी).

मानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस
    National Human Rights Commission
  • मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या दारूकांडप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर नोटिसा बजाविल्या आहेत. या दारूकांडात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.
  • विषारी दारू प्यायल्याने मालवणी येथे अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली. माध्यमातील वृत्तांमध्ये तथ्य असल्यास हा मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले आहे. 
  • राज्याचे मुख्य सचिव, अबकारी विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई पोलिसांवर नोटिसा बजाविण्यात आल्या असून, दोन आठवडय़ात वस्तुस्थिती सादर करण्यास सांगितले आहे. 
  • त्याचप्रमाणे बळींच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे का, त्याची माहितीही आयोगाने संबंधितांकडून मागविली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार दिलीपसिंह भुरिया यांचे निधन
  • भाजपचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे रतलाम-झाबुआ मतदारसंघातील खासदार दिलीपसिंह भुरिया (वय ७१) यांचे गुडगाव येथे निधन झाले. त्यांना मेंदूत रक्तस्राव झाला तसेच हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.
  • त्यांचा जन्म १९ जून १९४४ रोजी झाला व १९७२ मध्ये ते पेटलावद विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. 
  • झाबुआ मतदारसंघातून ते १९८० मध्ये काँग्रेसकडून निवडून आले व १९८० ते १९९६ असे पाच वेळा ती जागा जिंकली. 
  • काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याशी मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलाभाजपात प्रवेश केला. १९९८ मध्ये त्यांना काँग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी पराभूत केले पण २०१४ मध्ये दिलीपसिंह भुरिया परत निवडून आले. 
  • त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना काम केले होते.

शाहीर लीलाधर हेगडेंना बालसाहित्य सन्मान
  • साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले व उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान यांसारख्या देशभक्तिपर गीतांनी राष्ट्रप्रेम जागवणारे शाहीर लीलाधर हेगडे यांना साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वीर राठोड यांना मराठीसाठीचा अकादमी युवा साहित्य सन्मान जाहीर झाला आहे. 
  • येत्या १४ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होईल.
  • साहित्य अकादमीतर्फे यंदा २४ भाषांतील लेखकांना बालसाहित्य, तर २३ भाषांतील ३५ वर्षांखालील लेखकांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. 
  • बालसाहित्य पुरस्कार मिळालेल्यांमध्ये शाहीर हेगडे यांच्यासह निवेदिता सुब्रह्मण्यम (इंग्रजी), शीरजंग गर्ग (हिंदी) व रामनाथ गावडे (कोकणी) यांचाही समावेश आहे. युवा साहित्य पुरस्कार विजेत्यांमध्ये निशा नाईक यांना कोकणीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हेगडे यांना बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल साहित्य अकादमी सन्मान मिळाला आहे. आपल्या गीतातंतून राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागविण्याबरोबरच उमलत्या पिढीत सुसंस्कारांची रूजवात व्हावी यासाठी अखंड धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये शाहीर हेगडे अग्रस्थानी आहेत. मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 
  • ठाणे जिल्ह्यात जन्मलेले शाहीर हेगडे यांनी १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सहभागी झाले. चुनाभट्टीतील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते गेली किमान ४५ वर्षे सांभाळत आहेत. 
  • त्यांना यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्क व केशव गोरे स्मारक ट्रस्ट आदी संस्थांचे सन्मान मिळाले आहेत.

ईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी)
  • केवळ मालवाहतुकीच्या उद्देशाने बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पासाठी ८१,४५९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली.
  • महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि राजस्थान ही नऊ राज्ये या प्रकल्पाद्वारे जोडली जाणार आहेत. 
  • यातील पूर्वेकडील राज्यांमध्ये असलेल्या ‘इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची अंमलबजाणी तीन टप्प्यांत केली जात आहे, तर पश्चिमेकडील राज्यांसाठीच्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची दोन टप्प्यांत अंमलबजावणी केली जात आहे. 
  • या प्रकल्पाचे सर्व टप्पे २०१७ ते २०१९ दरम्यान पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी ८४ टक्के जमिनीचे संपादन झाले असून, त्यासाठी ६९०० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

झहीर अब्बास ‘आयसीसी’चे अध्यक्ष
    Ex-Pakistan and Gloucestershire batsman Zaheer Abbas named ICC president
  • पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला असून अब्बास पुढील एका वर्षासाठी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
  • बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. 
  • एहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे झहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी असतील.
  • आयसीसीने या बैठकीदरम्यान सर्बिया क्रिकेट फेडरेशनलाही मान्यता दिली. 
  • आयसीसीचे चेअरमन : एन. श्रीनिवासन
झहीर अब्बास यांच्याबद्दल
  • शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्बास यांनी १९६९ ते १९८५ या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ७८ कसोटी आणि ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ५०६२ आणि २,५७२ इतक्या धावा केल्या आहेत. 
  • याशिवाय त्यांनी १९७५, १९७९ आणि १९८३ या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ते पाकिस्तानी संघाचे कर्णधार होते. 
  • प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०८ शतके झळकवणारा एकमेव आशियाई खेळाडुचा बहुमानदेखील त्यांच्या नावावर जमा आहे. 
  • आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात अब्बास यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची खेळी केली होती.