चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी


आरबीआयद्वारे कर्जवसुलीचे नियम शिथील

    Reserve Bank of India
  • देशभरातील बॅंकांना कर्जवसुली करणे सोपे जावे या उद्देशाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जवसुलीचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कर्जवसुलीसाठी बॅंकांना थकबाकीदार कंपन्या अधिग्रहित कराव्या लागतात. शिथील केलेल्या नव्या नियमानुसार अधिग्रहित केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनात बॅंकेला बदल करावे लागणार आहेत.
  • त्याद्वारे एसडीआर अंतर्गत यापूर्वी आवश्यक असलेली ५१ टक्के हिस्सेदारी विकण्याची अटही शिथील करण्यात आली असून आता केवळ २६ टक्के हिस्सेदारी विकणे पुरेसे ठरणार आहे. 
  • याशिवाय बॅंकांना सामूहिक कर्ज वसुलीचे नियम देखील शिथील करण्यात आले असून आहे. एकाच कंपनीला अनेक बॅंकांनी कर्ज दिले असल्यास कर्जवसुलीसाठी यापूर्वी सर्व बॅंकांपैकी किमान ७५ टक्के बॅंकांची मान्यता घेणे आवश्यक होते. ही अट शिथील करून यापुढे केवळ ५० टक्के बॅंकांची सहमती असल्यास कर्जवसुली करता येणे शक्य होणार आहे.

भविष्यनिर्वाह निधीच्या नियमांत बदल

  • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्यनिर्वाह निधीच्या (पीएफ) नियमांत बदल केले असून नव्या बदलानुसार पीएफ काढून घेण्यासाठी असलेली आताची वयाची अट ५४ वरून ५७ वर्षे करण्यात आली आहे. 
  • कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे देशभरात ५ कोटी पीएफ भागधारक आहेत. ज्येष्ठ नागरिक पेन्शन वीमा योजनेअंतर्गत ५४ वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९० टक्के पीएफची रक्कम काढता येवू शकत होती. मात्र, आता यात बदल करण्यात आला असून ५७ वर्ष पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम काढता येऊ शकते.
  • याआधी निवृत्तीवयाची मर्यादा ५५ किंवा ५६ वर्षे होती. ही वयोमर्यादा ५८ वर्ष झाल्याने या नियमात बदल करण्यात आला आहे.
  • याशिवाय पीएफमधून काढण्यात आलेली रकमेची ज्येष्ठ पेन्शन वीमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी असलेली वयाची अटदेखील ५५ वरून ५७ वर्ष करण्यात आली आहे.

विजय मल्ल्यांचा यूएसएल अध्यक्षपदाचा राजीनामा

  • किंग ऑफ गुड टाईम म्हणून ओळखले जाणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी युनायटेड स्पिरीटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेल्या यूबी ग्रुपवर आता जगातील सर्वात मोठी मद्य कंपनी दियाजियोचे नियंत्रण आहे.
  • तसेच युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या (यूएसएल) अध्यक्षपदाची सूत्रे कंपनीच्या लेखापरिक्षण समितीचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहेत.
  • मल्ल्या यांनी राजीनामा देताना दियाजियोबरोबर करार केला आहे त्यानुसार पुढची पाच वर्ष दियाजियो मल्ल्या यांना ५१५ कोटी रुपये देणार आहे.
  • यूएसएल ग्रुपमधील एका कंपनीकडे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाची मालकी आहे. या कंपनीच्या संचालकपदावर विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थला कायम ठेवण्यात येणार आहे. 
  • काही बँकांनी मल्ल्या यांचा कर्ज थकबाकीदारांच्या यादीत समावेश केला आहे. मल्ल्या यांनी बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी कर्ज घेतले होते. 
  • मल्ल्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर बाजारात यूनाटेड स्पिरीटच्या समभागांच्या मुल्यामध्ये वाढ झाली आहे. 

मुंबई संघाला ४१वे रणजी विजेतेपद

  • पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात सौराष्ट्र संघावर एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवत मुंबई संघाने ४१व्यांदा रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. 
  • मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे सौराष्ट्र संघाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभी करता आली नाही. तर मुंबईकडून शतकी खेळी करणाऱ्या श्रेयश अय्यर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
  • धवल कुलकर्णी (७ बळी), शार्दूल ठाकूर (८ बळी) आणि  श्रीकांत अय्यर (११७ धावा) हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 

चिनी लष्करामध्ये झियांगतान फ्रिगेट दाखल

  • चिनी लष्करामध्ये स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रवाहू ‘फ्रिगेट’ दाखल झाली असून, चीनच्या नौदलाच्या आधुनिकीकरणाचा हा एक भाग आहे. झियांगतान असे या फ्रिगेटचे नाव आहे.
  • या चिनी फ्रिगेटचे वजन तब्बल चार हजार टन एवढे असून, ती दूरपर्यंत टेहळणी करू शकते तसेच लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याची क्षमताही या फ्रिगेटमध्ये आहे.
  • सध्या चीनची लष्करी महत्त्वाकांक्षा मोठ्या प्रमाणावर वाढली असून, दक्षिण चिनी समुद्र आणि भारतीय महासागरामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन सरकारने नौदलाचे आधुनिकीकरण सुरू केले आहे. यासाठी चीनने स्वदेशी शस्त्रनिर्मिती उद्योगामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
  • दक्षिण चिनी समुद्रातून होणाऱ्या जलवाहतुकीमधून चीनला दरवर्षी तब्बल ५ ट्रिलीयन डॉलरचा निधी मिळतो. या समुद्रातील चीनच्या सागरी मक्तेदारीला व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपाईन्स आणि तैवान या देशांनी कडाडून विरोध केला आहे. 

फिफाच्या अध्यक्षपदी गियानी इन्फॅन्टिनो

    Fifa president election 2016
  • स्वित्झर्लंडचे गियानी इन्फॅन्टिनो यांची जागतिक फुटबॉल संघटनेच्या (फिफा) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी दुसऱ्या फेरीच्या मतदानात बहरिनचे शेख सलमान बिन अब्राहम अल खलिफा यांना २७ मतांनी पराभूत केले.
  • गियानी यांना २०७ पैकी ११५ मते मिळाली, तर शेख सलमान ८८ मतांसह दुसऱ्या स्थानी आले. प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना चार मते मिळाली. जेरोम कँपेन यांना एकही मत मिळाले नाही. टोकियो सेक्सवेल यांनी मतदानापूर्वी माघार घेतली.
  • फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गिलानी इन्फॅन्टिनो यांच्यासह पाच जणांमध्ये ही लढत होती. मात्र खरी लढत युएफाचे सरचिटणीस गिलानी इन्फॅन्टिनो आणि आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांच्यात होती.
  • प्रक्षेपण हक्क वितरण, आर्थिक हितसंबंध, विश्वचषक आयोजन अधिकार वितरण तसेच तिकीट विक्री भ्रष्टाचार प्रकरणी अध्यक्षपद सोडावे लागलेले सेप ब्लाटरही स्वित्झर्लंडचे होते.
  • ४५ वर्षीय गियानी युरोपियन फुटबॉल महासंघाचे महासचिवसुद्धा आहेत. ते सॅप ब्लाटर यांच्या जागी फिफाच्या अध्यक्षपदाची जागा सांभाळतील. 
  • युएफाचे सरचिटणीस असताना इन्फँटिनो यांनी आर्थिक पारदर्शकता धोरण राबवले होते. युरो अजिंक्यपद स्पर्धेत संघांची संख्या १६वरून २४वर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इन्फँटिनो यांच्यावर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे वेळापत्रक सोयीनुसार बदलण्याचा आरोप आहे. 

जोकोविकचा ७००वा विजय

  • जगातील नंबर वन नोवाक जोकोविकने आपल्या करिअरमध्ये ७००व्या विजयाची नोंद केली. त्याने दुबई ओपन टेनिस स्पर्धेत या विक्रमी विजयाला गवसणी घातली.
  • यासह तो आता सर्वाधिक सामने जिंकण्याच्या ऑल टाइम यादीत १२व्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिकेचा जिमी कोनर्स करिअरमध्ये सर्वाधिक १२५४ विजयासह अव्वल स्थानावर आहे. तर फेडरर (१०६७) दुसऱ्या स्थानी आहे.
  • सक्रीय खेळाडूंच्या यादीनुसार रॉजर फेडरर (१०६७) आणि राफेल नदाल (७७५) यानंतर जोकोविक तिसऱ्या स्थानी आहे.
  • पुरुष एकेरीत ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीवर मात करत जोकोविकने दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा