चालू घडामोडी : ९ एप्रिल

सचिन तेंडुलकर स्कील इंडिया योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर

  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे.
  • जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचता यावे तसे कौशल्य विकासाप्रती तरूणांमध्ये जागरुकूता निर्माण करता यावी यासाठीच सरकारने सचिनला आपल्या ‘I Support Skill India’ या कॅम्पेनचा ‘चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरू केली आहे.
  • या योजनेंतर्गत २०२२पर्यंत देशातील ४० कोटींहून अधिक तरूणांना कुशल बनवण्याचे लक्ष्य मंत्रालयासमोर आहे. 
  • हे कॅम्पेन समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच कुशल भारत बनवण्याच्या लक्ष्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

मीरा बोरवणकर पोलीस संशोधन आणि विकास महासंचालकपदी

  • महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अ‍ॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबई गुन्हेशाखेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारितील कार्मिक विभागाने बोरवणकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
  • पदभार स्वीकारतील त्या दिवसांपासून ३० सप्टेंबर २०१७ रोजी निवृत्त होईपर्यंत त्या पदभार सांभाळतील.

आसाम रायफल्समध्ये महिलांना संधी

  • देशातील सर्वांत जुने निमलष्करी दल असलेले आसाम रायफल्सने प्रथमच नव्याने सेवेत रूजू झालेल्या २१२ जवानांमध्ये १०० महिलांना संधी दिली आहे.
  • नागालँडमधील शोखुवी येथील आसाम रायफल्स प्रशिक्षण केंद्रामध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आले.
  • आसाम रायफल्स हे केंद्रीय गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त अखत्यारीत येते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिमापूर येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रायफल्सने १२७ महिलांची निवड केली होती.
  • त्यासाठी देशभरातून निवडचाचणी घेण्यात आली होती. यापैकी २७ महिला वैद्यकीय चाचणी; तसेच प्राथमिक चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने १०० महिलांना पुढील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले.
  • या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्करातील तीन महिला अधिकाऱ्यांची मार्च २०१४ पासून प्रशिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. 
  • नव्याने सेवेत रूजू झालेल्या महिला जवानांचा विविध बटालियनमध्ये समावेश करण्यात येईल. महिलांची चौकशी, गर्दीवर नियंत्रण मिळवणे, जमावाला पांगवणे, आंदोलने हाताळणे यांसारखी कामे त्यांना देण्यात येतील.

‘फिनमेकानिका ग्रुप’च्या माजी प्रमुखांना तुरुंगवास

  • इटलीमधील संरक्षण आणि हवाई क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला सर्वांत मोठ्या ‘फिनमेकानिका ग्रुप’चे माजी प्रमुख जुसेप्पे ओरसी यांना साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • तसेच, ‘ऑगस्टा वेस्टलँड’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांनाही कोर्टाने चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. इटलीच्या कंपनीला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. 
  • भारताला विक्री करण्यात आलेल्या ३,६०० कोटी रुपयांच्या १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरमध्ये चुकीचा हिशेब आणि भ्रष्टाचारप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • कोर्टाने यापूर्वी या दोघांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये निर्दोष ठरवले होते. सरकारी वकिलांनी या दोघांना सहा आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती.
  • व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर भारताने १ जानेवारी २०१४ रोजी ‘ऑगस्टा वेस्टलँड’बरोबरील कंत्राट रद्द केले. 
  • हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांचे चुलतभाऊ यामध्ये लाभार्थी असल्याच्या आरोपावरून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा