चालू घडामोडी : १० मे

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून देशातून दिल्लीची टीना दाबी प्रथम आली आहे. टिना हिने पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळविले आहे.
  • देशातून जम्मू-काश्मीरच्या अतहर आमीर उल शफी खानने दुसरं स्थान पटकवलं आहे, तर दिल्लीचा जसमीत सिंग संधू तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • महाराष्ट्रातील योगेश कुंभेजकरने राज्यात पहिल्या येण्याचा मान पटकावला आहे. देशपातळीवर कुंभेजकर आठव्या स्थानावर आहे
  • दृष्टिहीन असलेली प्रांजली लहेनसिंग पाटीलही या परीक्षेत ७७३ गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाली आहे. अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला ठरली आहे. 
  • डिसेंबर २०१५ मध्ये झालेली लेखी परीक्षा आणि मार्च-मे २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतींनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात आली.
  • त्यामध्ये आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवांसाठी १,०७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा संपूर्ण निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसची सरशी

  • उत्तराखंड विधानसभेत झालेल्या शक्तीपरीक्षेप्रसंगी अखेर कॉंग्रेसची सरशी झाली. हरीश रावत यांच्या बाजूने ३३ आमदारांनी मतदान केल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. 
  • तत्पूर्वी २८ मार्च रोजी केंद्र सरकारने हरीश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील कॉंग्रेस सरकार बरखास्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
  • यानंतर रावत यांच्यावर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप करण्यात आला होता. दोनदा झालेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
  • पण ज्या नऊ आमदारांनी सरकारविरोधात बंडाचा झेंडा रोवला होता, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने सत्तेचे सगळे गणितच बदलले. 
  • बहुमत चाचणीचे ९० मिनिटांचे रेकॉर्डिंग बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयास सुपूर्त करण्यात आले असून, आता सर्वोच्च न्यायालयच अधिकृत निकाल घोषित करेल.
  • कॉंग्रेसला ३३ आमदारांचे पाठबळ मिळाले, यामध्ये ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट’च्या ६, बसपच्या २ आणि उत्तराखंड क्रांती दलाच्या १ आणि अन्य तीन अपक्ष आमदारांचे पाठबळ मिळाले.

गुगलतर्फे देशातील ५ रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा

  • गुगलतर्फे देशातील उज्जैन, जयपूर, पाटणा, गुवाहाटी आणि अलाहाबाद रेल्वेस्थानकांवर या पाच रेल्वेस्थानकांवर विनामुल्य हाय-स्पीड वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे.
  • वर्षाखेरपर्यंत देशातील १०० रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे गुगलने निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
  • वरील पाच स्थानकांवर सुरू करण्यात आलेली ही सुविधा याच योजनेचा भाग असून, लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सुविधेचे लोकार्पण करतील.
  • गुगलने आपल्या या सेवेसाठी भारतीय रेल्वेच्या रेलटेल या फायबर नेटवर्कचा वापर केला आहे. या पाच रेल्वे स्थानकांची भर पडताच देशभरातील १५ रेल्वेस्थानकांवर ही सेवा उपलब्ध असेल.

पनामा पेपर्सच्या दुसऱ्या टप्प्यातील दस्तावेज प्रसिद्ध

  • इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या संस्थेने पनामा पेपर्सच्या दुसऱ्या टप्प्यातील नवे दस्तावेज प्रसिद्ध केले आहेत.
  • यात दोन हजार भारतीय नागरिक, त्यांचे पत्ते आणि परदेशातील कंपन्यांशी त्यांचे असणारे आर्थिक हितसंबंध उघड झाले आहेत. 
  • करबुडव्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांत त्यांच्या कंपन्या असून, यामध्ये काहींनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे. 
  • यात २२ भारतीय कंपन्या, त्यांच्याशी संबंधित १.०४६ अधिकारी आणि नागरिक, २२ मध्यवर्ती संस्था आणि देशातील ८२८ पत्ते उघड झाले आहेत.
  • आयसीआयजेने जाहीर केलेल्या या माहितीत नेवादापासून हाँगकाँगपर्यंत व ब्रिटिश आइसलँडसह अन्य भागातील सुमारे २ लाख १४ हजार नावे वा कंपन्यांची नावे आहेत.
  • ही माहिती पनामा पेपर प्रकरणाच्या चौकशीचाच एक भाग आहे. विदेशी कंपन्या आणि त्यातील नागरिक यांची जाहीर झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी माहिती आहे.
  • मागील महिन्यात पनामा प्रकरणातील नावे समोर आल्यानंतर ५००पेक्षा अधिक नावांवर तपास करण्यासाठी भारताने एका संस्थेची (एमएजी) स्थापना केली आहे.

प्लाटिनी यांचा युरोपियन फुटबॉलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  • युरोपियन फुटबॉलचे अध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांनी युरोपियन फुटबॉलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) स्वीकारलेल्या कथित २० लाख डॉलरच्या रक्कमेमुळे घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील अपील लवादाने फेटाळल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
  • फेब्रुवारीमध्ये प्लाटिनी यांनी या बंदीविरोधात क्रीडा लवादाकडे (कॅस) अपील केले होते. त्यांच्यावर घालण्यात आलेली ६ वर्षांची बंदी ४ वर्षांवर आणण्यात आली.
  • फिफाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यातून फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर आणि प्लाटिनी या नामांकित व्यक्तीही सुटू शकल्या नाहीत.
  • फिफाच्या निवडणुकीत ब्लॅटर यांच्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे प्लाटिनी यांच्याकडे येतील अशी शक्यता होती पण आता या प्रकरणात अडकल्यानंतर अखेर त्यांना युरोपियन फुटबॉल अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा