चालू घडामोडी : ४ जून

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा

  • कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संभाषण व भोसरी जमीन गैरव्यवहारामुळे प्रचंड अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रीपदाचा राजीनामा सूपूर्द केला.
 एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप 
  • मंत्रिपदाचा दुरुपयोग करून कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भोसरी येथे पावणेचार कोटींच्या अत्यल्प किमतीत जमीन खरेदी करून १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची भरपाई मिळविण्यासाठी वादग्रस्त निर्णय घेतल्याचा आरोप.
  • तापी खोऱ्यात सिंचनाची कामे मिळालेल्या शिवाजी जाधव या ठेकेदाराशी खडसे यांचे संबंध असून सिंचन कंत्राटांच्या पैशातूनच जाधव यांनी मुक्ताई साखर कारखाना विकत घेतल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
  • पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या ‘कॉल लिस्ट‘मध्ये खडसे यांचा मोबाईल क्रमांक असल्याचा ‘हॅकर‘ मनीष भंगाळे यांचा आरोप. 
  • खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी हरयाणामधून आणलेली लिमोझिन मोटार जळगाव परवाना घेऊन त्यात फेरफार केल्याचा आरोप. 
  • खडसेंचे सहकारी गजानन पाटील यांनी खडसेंचे नाव सांगून सामाजिक संस्थेसाठी शासकीय जागा मिळवून देण्याकरता संबंधितांकडे एक कोटी रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
 एकनाथ गणपतराव खडसे यांची कारकीर्द 
  • मतदार संघ : मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र 
  • शिक्षण : बी.कॉम नागपूर विद्यापीठ 
  • विद्यापीठातील निवडणुकीपासून सुरवात 
  • १९७८-१९८८ : जयकिसान पीक संकर्षण सहकारी संस्था, मुक्ताईनगर (सहकारी संस्थांच्या विकासात भरीव कमागिरी)
  • १९८०-१९८५ : भाजप तालुका उपाध्यक्ष 
  • १९८२-१९९० : पंचायतसमिती सदस्य, मुक्ताईनगर. 
  • १९९१-१९९५ : भाजपचे जिल्हा अध्यक्ष 
  • १९९९-२००४ : पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस 
  • २००४ पासून संपूर्ण भारतातील भाजपच्या कार्यकारिणीत 
 महाराष्ट्र सरकारमध्ये 
  • जून १९९५ ते सप्टेंबर १९९५ दरम्यान उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री 
  • १९९५ सप्टेंबर-१९९७ जून : अर्थ-नियोजन मंत्री 
  • जून १९९७-ऑक्टोबर १९९९ : शिवसेना-भाजप सरकारच्या पाटबंधारे व आदेश क्षेत्र विकास मंत्री 
  • २००९पासून विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष नेते 
  • २०१४नंतर राज्याचे भाजपचे सरकारमध्ये राज्याचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार 

पेस-हिंगिस जोडीला फ्रेंच ओपनचे जेतेपद

  • भारताचा लिअँडर पेस व त्याची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले.
  • फिलिप चार्टरर कोर्टवर पार पडलेल्या मिश्रच्या फायनलमध्ये पेस व मार्टिन या जोडीने दुसऱ्या सीडेड सानिया मिर्झा व इव्हान डॉडिग या जोडीचे कडवे आव्हान ४-६, ६-४, (१०-८) असे परतवून लावले.
  • लिअँडर पेसचे हे फ्रेंच ओपनमधील मिश्रचे पहिले जेतेपद ठरले. हिंगिससह खेळताना पेसने २०१५मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धांत मिश्र दुहेरीची जेतेपदे पटकावली होती.
  • आता यामध्ये २०१६च्या मोसमातील फ्रेंच ओपनची भर पडली आहे. पेसचे हे कारकिर्दीतील १८वे तर मिश्रचे १०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे. 
  • सायना-डॉडिग यांनी पेस-मार्टिना यांना कडवी झुंज दिली. मात्र पेस-मार्टिना यांनी दुसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावत मोक्याच्या क्षणी पुनरागमन सामना जिंकला.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

  • मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
  • चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. 
  • त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी ‘सखाराम बाईंडर’मधील चंपा, ‘शांतता..कोर्ट चालू आहे’ मधील बेणारे बाई, ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिका विशेष गाजल्या.
  • आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविले होते. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या होत्या.
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
  • ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेचा यथोचित गौरव केला.
  • मराठी चित्रपट : जैत रे जैत, भूमिका, हेच माझं माहेर, मला आई व्हायचंय, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट इ.

हेवीवेट चॅम्पीयन महंमद अली यांचे निधन

  • गेली अनेक वर्षे पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेले मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली (वय ७४) यांचे ४ जून रोजी निधन झाले.
  • पार्किन्सनमुळे ते १९८४ पासून त्रस्त होते. त्या रोगाशी तेव्हापासून ते लढा देत होते. २०१४मध्ये ते न्युमोनियामुळे आजारी पडले होते.
  • मुष्टियुद्धमधील महान खेळाडू अली यांची हेवीवेट चॅम्पीयन म्हणून ओळख होती. वयाच्या १८व्या वर्षीच अली यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच सुवर्णपदकाची कमाई केली.
  • जागतिक बॉक्सिंगमध्ये तीनवेळा विजेतेपद पटकावणारे मोहम्मद अली यांचा २०व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवही करण्यात आला होता.
  • अली यांनी १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र सदिच्छादूत म्हणून अली यांची नियुक्ती करण्यात आली.
  • २००५ मध्ये अमेरिकेतल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. २००१मध्ये अली यांच्या कारकीर्दीवर चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 'द ग्रेटेस्ट' अशा टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद अली यांनी १९८१ साली बॉक्सिंग रिंगमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्यांच्या नावावर ५६ विजय (त्यातील ३७ नॉकआउट) आणि अवघे पाच पराभव होते. 
  • मोहम्मद अली यांचे मूळ नाव कॅशियस क्ले असे होते. पहिल्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर ते मॅल्कम एक्सच्या मानवी हक्काच्या काळ्या मुस्लिम चळवळीशी जो़डले गेले.
  • त्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. कॅशियस क्ले हे नाव गुलामीचे प्रतिक आहे असे मोहम्मद अलींना वाटत होते. म्हणून त्यांनी आपले नाव बदलून मोहम्मद अली असे केले.
  • व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या लष्करात सामील होण्यास अली यांनी नकार दिला. नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याने अली यांचे अजिंक्यपद स्पर्धेतील पदक काढून घेण्यात आले.
  • त्यांना १०,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ३ वर्षांनंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा