चालू घडामोडी : ११ जून

भारत, अमेरिका आणि जपानचा ‘मलबार’ नौदल सराव

  • भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नौदलांनी जपानसह उत्तर प्रशांत महासागरात १० जूनपासून मलबार सरावाला सुरवात केली.
  • या तिन्ही देशांचा दरवर्षी होणारा मलबार नौदल सराव अलीकडच्या काळातील सर्वांत मोठा युद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. 
  • भारतीय नौदलाने सासेबो येथे सुरू झालेल्या या सरावात सातपुडा, सह्याद्री, शक्ती आणि किर्च या चार युद्धनौका उतरविल्या आहेत. हा विसावा नौदल सराव आहे.
  • १९वा सराव चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये जपानी नौदल स्वसंरक्षण दलाचा समावेश करण्यात आला होता.
  • किनाऱ्यावरील सरावाचा टप्पा १३ जून रोजी संपणार असून, त्यानंतर १४ ते १७ जून दरम्यान प्रशांत महासागरात समुद्री टप्प्यात खऱ्या युद्धकौशल्याला सुरवात होईल. 
  • तिन्ही नौदलांची परस्परांमधील कार्यक्षमता वाढविणे आणि नौदल सुरक्षा मोहिमेसाठी एकसमान कार्यपद्धती विकसित करणे, हा या सरावाचा प्राथमिक उद्देश आहे.

ऑलिंपिकसाठी महाराष्ट्राच्या प्रार्थनाची निवड

  • ११ जून रोजी अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील बार्शीची रहिवासी प्रार्थना ठोंबरे हिची संघात निवड करण्यात आली आहे.
  • पुरुष दुहेरीत लिअँडर पेससह रोहन बोपण्णा खेळताना दिसेल. तर, महिला दुहेरीत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जोडीला मराठमोळी प्रार्थना ठोंबरे असणार आहे.
  • मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या जोडीला रोहन बोपण्णा असणार आहे. तर लिअँडर पेसबरोबर प्रार्थना ठोंबरे असणार आहे.
  • २१ वर्षीय प्रार्थनाने आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदे मिळवली आहेत.
  • २०१४साली इन्चिऑन इथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनाने सानियाच्या साथीने कांस्यपदक मिळवले होते.
  • सानियानंतर दुहेरीत भारतीय खेळाडूंमध्ये ती दुसरी आहे. जागतिक क्रमवारीत ती २०९व्या स्थानावर आहे.
  • प्रार्थना हैदराबादमधील सानिया मिर्झाच्या अॅकॅडमीत सानियाचे वडील इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते

रिओ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा ध्वजवाहक

    Abhinav Bindra
  • ऑलिम्पिक इतिहासातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले.
  • ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये बिंद्रा तिरंगा उंचावून भारतीय चमूचे नेतृत्त्व करेल. त्याचप्रमाणे बिंद्रा रिओ स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूतही आहे.
  • याआधी २०१२ ऑलिम्पिकवेळी ध्वजवाहक म्हणून बिंद्राचा विचार झाला होता. परंतु, दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशीलकुमारला आयओएने हा सन्मान दिला होता.
  • बिंद्राची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. तो ऑलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णविजेता भारतीय खेळाडू आहे.
  • २००८ साली १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती.
  • यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू सहभागी होत आहे. १० जूनपर्यंत भारताच्या एकूण ९६ खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रता मिळवली असून २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या चमूमध्ये ८३ खेळाडूंचा समावेश होता.
  • विशेष म्हणजे अजूनही भारतीय संघात खेळाडूंची वाढ होण्याची शक्यता असून ही संख्या १००चा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा