चालू घडामोडी : ३० जून

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर

  • सातव्या वेतन आयोगाच्या बहुतांश शिफारशी स्वीकारून देशातील सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांवर केंद्र सरकारने वेतनवर्षांव केला आहे.
  • यामुळे सुमारे २३.५ टक्के वेतनवाढ झाली असून सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५८ लाख निवृत्तिवेतनधारकांना १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
  • या वेतनवाढीचा तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पन्नाच्या ०.७ टक्के इतका भार पडणार आहे. या वेतन आयोगासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • वेतन आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १४.२७ टक्के वाढ सुचवली होती.
  • सहाव्या वेतन आयोगाने २० टक्के वाढ सुचवली होती. पण सरकारने ती २००८ मध्ये अंमलबजावणी करताना दुप्पट केली होती.
  • आता सातव्या आयोगाच्या वेतनवाढीत सर्व भत्ते मिळून २३.५५ टक्के वाढ होत आहे. ७० वर्षांत प्रथमच सर्वात कमी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळाली आहे, असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
 भत्त्यांसाठी स्वतंत्र समिती 
  • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या १९४ भत्ते लागू आहेत. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी ५१ भत्ते पूर्णपणे रद्द करण्याची व आणखी ३७ प्रकारचे भत्ते इतर भत्त्यांमध्ये मिळविण्याची शिफारस आयोगाने केली होती.
  • याचे दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घेऊन आयोगाच्या शिफारशी तूर्तास लागू न करता त्यावर अधिक सखोल विचार करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समिती चार महिन्यांत अहवाल देईल.
  • समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू असलेले भत्ते सध्याप्रमाणेच मिळत राहतील. याखेरीज आणखीही दोन समित्या स्थापन करण्याचे मंत्रिमंडळाने ठरविले आहे.
 वेतन आयोग 
  • सरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते.
  • वेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून शिफारस अहवाल केंद्राला सादर करते.
  • थोडय़ाफार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो व त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.
  • पहिला वेतन आयोग १९४६ साली श्रीनिवास वरदचारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झाला.
  • या आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १० रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. ती ४५० टक्क्यांची वाढ होती.
  • दुसरा वेतन आयोग न्या. जगन्नाथदास यांच्या अध्यक्षतेखाली १९५७ साली नेमला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.
  • १९७० साली न्या. रघुवीर दयाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त तिसऱ्या वेतन आयोगाने १९७३ साली सादर केलेल्या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना २५० टक्के वेतनवाढ मिळाली.
  • १९८३ साली पी.एन. सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौथ्या वेतन आयोगाने ४ वर्षांत ३ टप्प्यांत आपला अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तब्बल ४०० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.
  • १९९४ साली नियुक्त पाचव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. रत्नावेल पांडियन यांनी १९९७ साली सादर केलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना ३५० टक्के वेतनवाढ मिळाली.
  • मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या काळात नियुक्त न्या. बी.एन. श्रीकृष्ण यांच्या सहाव्या आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ४० टक्के वाढ झाली.
  • अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल सादर करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात १४.२७ टक्के वाढ देण्याची शिफारस केली होती.

टोर्पेडो पाणतीर भारतीय नौदलाकडे सुपूर्त

  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अधिकृतपणे ‘वरुणास्त्र’ पाणतीर (टोर्पेडो) भारतीय नौदलाकडे सुपूर्त केले.
  • जड वजनाच्या पाणबुडीविरोधी पाणतीर नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत डीआरडीओ येथे झालेल्या कार्यक्रमात नौदलाकडे सोपविण्यात आले.
  • नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने (एनएसटीएल) हे पाणतीर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वरुणास्त्राची रचना करण्यात आली आहे.
  • भारत डायनामिक्स लिमिटेडने वरुणास्त्राची निर्मिती केली आहे. हे वरुणास्त्र पाणबुडीबरोबरच मोठी जहाजेही उद्ध्वस्त करू शकते.
  • वरुणास्त्राच्या निर्मितीत डीआरडीओला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजीनेही मदत केली आहे.
  • अलीकडेच बंगालच्या खाडीत वरुणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणादरम्यान वरुणास्त्र समुद्रात शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले.
  • लढाऊ विमानानंतर स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीच्या दिशेने देशाची ही एक मोठी कामगिरी आहे. वरुणास्त्र दिल्ली श्रेणी, कोलकाता श्रेणी, कमोर्ता श्रेणी यांसारख्या मोठ्या जहाजांमध्ये बसविले जाईल. 
 वरुणास्त्राची क्षमता 
  • वरुणास्त्र पाणतीर समुद्राच्या आत पाण्यामध्ये ४० समुद्री मैल प्रतितास वेगाने शत्रूच्या पाणबुडीवर तसेच मोठ्या जहाजांवर हल्ला करून ते उद्‌ध्वस्त करू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा